‘आवाज मराठीचा’ नांदी ठाकरेंच्या पुनर्मिलनाची!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मराठी माणसाने जी एकजूट दाखवली ती आता सर्वांनी दाखवावी. सर्व पक्षातील मराठी भाषिकांनी एकत्र यावं, असं आवाहन दोन्ही ठाकरे बंधुंनी मुंबईतल्या हिंदी भाषा सक्ती अध्यादेश मागे घेतल्याच्या विजयी सभेत केलं. या सभेत राज ठाकरे यांच्या भाषणाचा भर मराठी भाषा अभिमान, भाषा सक्तीला विरोध असा होता. पण उद्धव ठाकरेंनी या सभेचं व्यासपीठ मराठी भाषेपेक्षा स्वतःच्या राजकीय आकांक्षा आणि भाजपवर टीका करण्यासाठीच वापरला. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधु आता ‘म’ मराठीसोबत ‘म’  महापालिकेचाही गिरवणार असं दिसलं.
[gspeech type=button]

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषासक्तीचा अध्यादेश मागे घेतल्याची विजयी सभा राज आणि उद्धव ठाकरे यांनी शनिवार, 5 जुलै रोजी मुंबईमध्ये आयोजित केली होती. या विजयी सभेत ‘आवाज मराठी’चा घोषणा दिली असली तरी, सभेचा रोख हा मराठी भाषेपेक्षा राजकीय आरोपांवरच जास्त राहिला. सभेच्या अखेरीस सर्व विरोधीपक्षातील नेत्यांना आधी व्यासपीठावर बोलावलं आणि मग ‘शिक्षण अभ्यास आणि कृती समिती’च्या दीपक पवार यांना आमंत्रित केलं गेलं.

देवेंद्र फडणवीसांनी जमवलं!

राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरूवात “कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज 20 वर्षांनी मी आणि उद्धव एकत्र आलो आहोत. जे बाळासाहेबांना आणि इतर कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.”  असं म्हणत महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेनं कोणी पाहायचं नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध करताना दिला.

कोणतीही भाषा वाईट नाही

राज ठाकरेंच्या भाषणाचा मुख्य भर हा हिंदी भाषा सक्तीला विरोध आणि मराठीच्या बळकटीवर होता. राज आपल्या भाषणात म्हणाले की, कोणतीही भाषा वाईट नाही. सर्व भाषा चांगल्या आहेत. प्रत्येक भाषेचा आदर आम्हांला आहे. पण म्हणून मराठीचं खच्चीकरण आम्ही सहन करणार नाही. हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. आम्ही आर्थिकदृष्ट्या प्रगत आहोत. त्या राज्यातील लोक इथं रोजगारासाठी इथं येतात. त्यांची भाषा आम्ही का शिकावी? केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधल्या दुव्यासाठी त्रिभाषा सूत्र आहे. केंद्र आणि इतर राज्यांतही त्रिभाषा सूत्र नाही. महाराष्ट्रातच प्रयोग का करायचा? दक्षिणेकडील राज्य यांना हिंग लावत नाहीत, अशा तिखट भाषेत राज ठाकरे यांनी या हिंदी भाषा सक्तीला विरोध केला.

बाळासाहेब ठाकरेंचं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून

ठाकरेंची मुलं इंग्लीशमध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिकली यावरून सत्ताधारी पक्षाचे लोक टीका करत आहेत. याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे दोघांचंही शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमात झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मराठीवर आणि बाण्यावर शंका घेणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. कोणत्याही माध्यमात शिकलो तरी मातृभाषेबद्दल अभिमान बाळगायचा नाही का? कडवटपणा हा शिक्षण कुठे घेतला यावर नसतो तर तो आतून असावा लागतो. असंही राज ठाकरे म्हणाले.

ऊठसूठ कोणाला मारू नका

मराठी माणसांना आपापसांत भांडवून पुढची खेळी खेळली जाईल. मराठीच्या मुद्द्याला बाजूला पाडण्यासाठी जातीपातीचं राजकारणही खेळलं जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ऊठसूठ कोणाला मारू नका, असं आवाहनही आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

हेही वाचा : ‘हिंदी सक्ती’ ठाकरे बंधूंचं राजकीय मनोमिलन करणार का?

बाळासाहेबांच्या स्वप्नाची आन

राज ठाकरें यांनी अप्रत्यक्षरित्या ठाकरे बंधू आता राजकारणातही एकत्र येणार याचं सूतावोच केलं. सर्वांनी सावध आणि सतर्क राहायला हवं. मराठीसाठीची एकजूट कायम राहू देत. ‘बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा एकदा साकार करुयात’ असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

उद्धव ठाकरेंचं भाषण पूर्ण राजकीय

उद्धव ठाकरे यांनीही भाषणाची सुरूवात देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा करत केला. एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत, असं खणखणीतपणे सांगून राज आणि आपल्यामधील दुरावा दूर झाल्याचं सूचक वक्तव्य केलं. भाषेवरचा विषय वरवरचा निघून चालणार नाही, मधल्या काळात ठाकरे बंधूंना सर्वांनी वापरलं पण आता आम्ही वापरणार आणि फेकणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. भाषेच्या नावाखाली फडणवीसांची गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही. तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करू, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव यांच्या भाषणात मराठी भाषेपेक्षा राजकीय गोष्टींवर जोर

संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान तत्कालीन काँग्रेस नेते दिल्लीचे तळवे चाटत होते. त्याप्रमाणे सध्याचे महाराष्ट्रातील सत्ताधारी दिल्लीचे तळवे चाटत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यांच्या भाषणाचा पूर्ण रोख भाजप आणि फडणवीस, वन नेशन याच्यावर होता. उद्धव ठाकरेनी हिंदुत्व सोडलं नाहीये. ‘तोडा आणि राज्य करा’ यांची ही पिलावळ असल्याची टीका उद्धव यांनी केली.

हिंदीची सक्ती चालू देणार नाही

मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली. त्याचा अभिमान आहे. त्याविरुद्ध काही लोक कोर्टात गेले. मराठी भाषा भवनाचं मी भूमीपूजन केलं ते दालन कुठे गेलं? असा सवाल त्यांनी विचारला. मराठी रंगभूमी दालनाचा त्यांनी मंजूर केलेल्या आराखड्याला केरात टाकल्याचं उद्धव यांनी सांगितलं. उद्धव म्हणाले की, आमचं कोणत्याही भाषेशी वाकडं नाही. सगळ्यांचा आदर आहे. पण मराठीचा अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांना सवाल केला की, “फडणवीस, मराठी माणूस दाखवा जो इतर राज्यात जाऊन दादागिरी करतोय. तर आम्ही आमच्या राज्यात मराठीबद्दल अभिमान नाही बाळगायचा”.

उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर पाठवले

मराठी माणूस मुंबईबाहेर गेला असं तुम्ही म्हणता पण तुम्ही सर्व उद्योगधंदे तुम्ही महाराष्ट्राबाहेर घालवले. दोन व्यापाऱ्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे करत आहेत, असं म्हणत उद्धव यांनी बोचरी टीका सुरूच ठेवली. प्रत्येकवेळी काही झालं की भांडाभांडी लावायचं. आम्ही एकत्र येणार निवडणुकीपर्यंत असं म्हणतात पण तसं नसल्याचंही उद्धव म्हणाले.

आमचा  महाराष्ट्राचा

आमचा ‘म महाराष्ट्र’चा आहे. भाजप आमच्यावर टीका करतात की आमचा ‘म’ महापालिकेचा आहे. पण बाळासाहेब नेहमी म्हणत की, बाळासाहेब म्हणायचे सत्ता येईल जाईल आपली ताकद असली पाहिजे. त्यानुसार आम्ही आपली ताकद आता एकवटली असल्याचंही उद्धव आपल्या भाषणात म्हणाले.

मराठीला पालखीत बसवणार

भाषणाच्या शेवटाला अखेर उद्धव यांनी मराठीबद्दल वक्तव्य केलं. पण त्या आधीही भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, मराठे आणि मराठेत्तरांमध्ये भाजपने दुही माजवली. गुजरातमध्ये पटेल, हरयाणात जाट असं करत सत्ता काबीज केली. बटेंगे तो कटेंगे असं केलं. मराठी माणूस मराठी माणसासोबत भांडला. पण आता आम्ही पालख्यांचे भोयी होणार नाही तर मराठीला पालखीत बसवणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

महाराष्ट्राच्या 65 वर्षांच्या इतिहासात ‘ठाकरे’ हे आडनाव वर्चस्व गाजवत राहिलं. ठाकरेंच्या दोन्ही पक्षांची स्थापना ‘मराठी’च्या मुद्द्यावरून झाली. पण मधल्या काळात
Pardhi Samaj : काही चळवळीतील नेतृत्वांनीच पारधी समाजाच्या प्रश्नांचं भांडवल केलं आहे. आजही या समाजातील पुरुषांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवलं जातं.
ऊसतोड महिला कामगार : बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी हंगामाला जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर सर्व कामगारांची आरोग्य तपासणी केली जाते. यंदा या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ