अजित पवारांनी रेशीमबागेत जाणं दोनवेळा टाळलं. प्रत्येक वेळी या टाळाटाळीची बातमी झाली. आता यावेळीही अजितदादा रेशीमबागेसाठी नॉट रिचेबल राहणार का? दादा रेशीमबाग टाळणार की तिथे जाणार, यावर काही लोक अटकळी लावून एकमेकांना टाळी देत पैजाही लावत असतील.
अजितदादा रेशीमबागेत जाणं का टाळतात? कारण अजितदादांची आणि त्यांच्या पक्षाची अशी पक्की धारणा आहे की ते फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीचं राजकारण करतायत. या त्रयीच्या आधी गेल्या वर्षीपासून शिव जोडलं जातं. अर्थात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. ते अपरिहार्य आहे.
या शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेऊन केलेल्या राजकारणामुळे रेशीमबागेत जाण्याने शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीचे लोक दुरावले जातील अशी दादांची अटकळ असावी. म्हणून ही टाळाटाळ. तसंही आता कोणत्याच पक्षाला कोणत्याच विचारसरणीबद्दल स्वारस्य उरलेलं नाही. आणि त्यांनी स्वारस्य दाखवावं असं लोकांनाही वाटत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) लोकसभेच्या निवडणुकीत उताणा पडल्याचं चित्रं होते. तिथेही फुले-शाहू-आंबेडकर नावाची पायाखालची सतरंजी खेचली गेली होती. मुस्लीम मतंही दोलायमान झाली होती. राष्ट्रवादी (अ.प.) गटाची एकुलती लोकसभेची जागा निवडून आली. त्यासाठी रायगडमध्ये तटकरेंना तिथल्या मतदारसंघातील परिणामकारक मुस्लीम मतांसाठी बऱ्यापैकी आटापिटा करावा लागला. कधी नव्हे ते रायगडमधील मुस्लीम मतदार उघड उघड मशालीला मत देण्याची भाषा निवडणूकपूर्व तरी करत होता. मौलवींनी काढलेले फतवे महायुतीच्या कामी आले आणि मग धार्मिक ध्रुवीकरणाचे मेसेज पसरवून ही जागा फिरवली गेली.
विधानसभा निवडणूकपूर्व अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रणनीती बदलून पूर्णतः भारतीय जनता पार्टीचं मांडलिकत्व स्वीकारल्याचं चित्र दिसलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत जे काही घवघवीत स्ट्राइक रेटचं यश मिळालं आहे ते अर्थातच भारतीय जनता पार्टी आणि त्यामागे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अदृश्य महाशक्ती सक्रिय झाल्यामुळेच. पिन्क पोझिशनिंगमुळे लाडक्या बहिणींनी मदत केली असं आपण म्हणू शकतो. पण ती रणनीतीही आता देवाभाऊंच्या आणि पर्यायी भाजपाच्या नावावर चढली आहे. त्यामुळे अदृश्य महाशक्ती व संघ परिवार नाइलाजाने घड्याळाच्या मागे उभं राहण्याचं यश आता एन्कॅश करण्याचा प्रयत्न करणारच. त्यांचं एन्कॅशमेण्ट म्हणजे अजितदादांना बौद्धिकासाठी रेशीमबागेत बोलावून घेणं हे ओघाने आलंच. संघ परिवार अजितदादांच्या मार्फत नवं ऑप्टिक प्रस्थापित करणार आणि ब्रिगेडी भूमिकेवर स्कोअर सेटल करणार हे अध्याहृत आहे. म्हणूनच अजितदादा रेशीमबागेत बौद्धिकासाठी जाणं टाळतायत.
तसंही फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणी मानणारा मतदार विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या मागे उभा होता कुणी म्हणू शकणार नाही. नव्या राजकीय संरचनेत ब्रिगेडी पाइकांचा वैचारिक गोंधळ तर मोठा असणार आहे. मग अशा नजीकच्या काळात फार राजकीय नुकसान न करणाऱ्या रेशीमबागेतल्या बौद्धिकाला जायला काय हरकत असावी? रंगात रंगुनि साऱ्या दोर माझा वेगळा ही दादांची भूमिका कशासाठी?
अजितदादांनी रेशीमबागेत जायला हरकत नाही असं म्हणण्यामागे आणखी एक सांस्कृतिक पदरही आहे. रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृति मंदिराच्या खाली डॉ. हेडगेवारांनी मृत्युसमयी आपल्या हस्ताक्षरात संत तुकाराम महाराजांचा एक अभंग लिहिला होता. तो अभंग असा आहे…
शेवटची विनवणी | संतजनी परिसावी ||
विसर तो न पडावा | माझा देवा तुम्हासी ||
आता फार बोलो कायी | अवघे पायी विदित ||
तुका म्हणे पडतो पाया | करा छाया कृपेची ||
रेशीमबागेतल्या हेडगेवार स्मृति मंदिराच्या खाली संगमरवरामध्ये डॉ. हेडगेवारांच्या हस्ताक्षराची मुद्रा उमटवून हा अभंग कोरलेला दिसून येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक धारणेला अजितदादांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी संत तुकारामांचे अभंग बुडवणाऱ्या मंबाजी प्रवृत्तीची उपमा अनेकवेळा दिलेली आहे. दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याबाबतच्या भूमिकेबद्दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनाजी पंतांची उपमा देण्याबद्दल अजितदादांच्या प्रवक्त्यांचा व पाठिराख्यांचा उत्साहही अनेकवेळा दिसून आलेला आहे. संत रामदास स्वामींच्या बाबतीतले ब्रिगेडी पवित्रे जाहीरपणे व्यक्त झाले आहेत. त्यामुळेच प्रत्यक्ष डॉ. हेडगेवारांना मृत्युसमयी जगद्गुरू श्री तुकोबारायांचे अभंग आठवावेत आणि त्या लिखित अभंगाची कोरीव संगमरवरी प्रतिमा रेशीमबागेत असावी हा अजितदादांना रेशीमबागेत जाण्यासाठी मोठाच दिलासा आहे. दादांनी गेल्या दीड वर्षांत इतकी लवचिकता दाखवलीय. जानव्याचं सव्य-अपसव्य अंगिकारलं तर फार तर टेचात राहता येणार नाही, पण फार ठेचाही लागणार नाहीत.
जब जलील होकर सब्र आ जाए तो तो मोहब्बत भी मोहब्बत नही लगती…



