संसदेचं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी (दि. 21 जुलै 2025) रोजी उपराष्ट्रपती, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याची वेळ, काळ पाहता सगळ्यानाच याचं फार आश्चर्य वाटलं. यावर चर्चाही अनेक झाल्या. तब्येतीच्या कारणाने जरी राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी सांगितलं असलं तरी विरोधकांनी मात्र शंका व्यक्त केली.
जवळपास महिना झाला तरी उपराष्ट्रपती यांच्याशी माध्यमांचा काहीच संपर्क होऊ शकला नाही. उपराष्ट्रपती पदावरून उतरल्यावर धनखड हे कोणत्याच सामाजिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यामुळे धनखड नेमके कुठे गेले, कुठे गायब झाले असे प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केले. यावर जगदीप धनखड यांच्या प्रकृतीविषयीची माहिती सर्वांना देऊ, असं उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं होतं.
राजकारण, समाजकारण आणि माध्यमांपासून अचानक दूर गेलेल्या माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा ठावठिकाणा अखेर सापडला आहे.
कुठे आहेत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड?
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राजीनामा देऊन पदमुक्त झाल्यापासून दररोज योगाभ्यास करतात. तसेच घरातील सदस्य, मित्र व उपराष्ट्रपतींच्या एन्क्लेव्हमधील कर्मचाऱ्यांसोबत टेबल टेनिस खेळतात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम असल्याचं सांगितलं आहे. याविषयीची बातमी पीटीआयने दिली आहे.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक
दरम्यान 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. एनडीएकडून सी.पी.राधाकृष्णन आणि युपीए आघाडीकडून बी.सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे दोन्ही अर्ज वैध झाले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात आलेले. मात्र, युपीए आघाडीने आपला उमेदवार उभा करत निवडणूकीचा पाठिंबा दिला आहे.
राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक अधिकारी पी.सी.मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवणूकीसाठी एकूण 46 उमेदवारांनी 68 नामांकन पत्र दाखल केले होते. यापैकी सी.पी.राधाकृष्णन आणि बी.सुदर्शन रेड्डी यांचेच उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत. यामुळे युपीए आणि एनडीएमध्ये ही निवडणूक रंगणार आहे.