घरात किंवा छोट्या पासून मोठ्या हॉटेल्समध्ये खाद्यतेलाचा पुरेसा पुनर्वापर केल्यावर ते फेकून दिलं जातं. पण आता हे तेल फेकून देण्याची गरज नाही. कारण, आता याच तेलापासून विमानासाठी लागणाऱ्या इंधनाची निर्मिती केली जाणार आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) च्या पानीपत इथल्या रिफायनरी प्रकल्पामध्ये हा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आता वापरलेल्या खाद्यतेलापासून विमानाचं इंधन तयार होणार आहे. अशाप्रकारचं इंधन निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटनेचं ISCC CORSIA सर्टिफिकेट इंडियन ऑइल कंपनीला मिळालं आहे. असं सर्टिफिकेट मिळवणारी इंडियन ऑइल ही देशातली पहिली कंपनी आहे.
शाश्वत विमान इंधन म्हणजे नेमकं काय?
शाश्वत विमान इंधन (SAF) हे एक जैव – इंधन आहे. या इंधनाच्या वापराने पांरपारिक विमान इंधनाच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कमी होते. हे इंधन वनस्पती तेल, स्वयंपाकघरात वापरलेले तेल आणि शेतकचरा यासारख्या नॉन-पेट्रोलियम घटकांपासून तयार केलं जातं.
हे जैव इंधन पारंपारिक विमान इंधनांमध्ये 50 टक्क्यापर्यंत मिसळू शकतो. म्हणजे विमान हे पूर्ण जैव इंधनावर किंवा पारंपारिक इंधनावर न चालवता दोन्ही इंधनाचा वापर करता येईल. यामुळे पूर्वी 100 टक्के पारंपारिक इंधन वापरून मोठ्या प्रमाणावर जे कार्बन उत्सर्जन होत होतं त्यात काही प्रमाणात घट होईल. केंद्र सरकारने फेब्रवारी 2027 पासून आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये 1 टक्के शाश्वत विमान इंधनाचा वापर अनिर्वाय केला आहे.
दरवर्षी 35 हजार टन शाश्वत विमान इंधन निर्मिती करणार
इंडियन ऑइलचे अध्यक्ष अरविंदर सिंग साहनी यांनी माहिती दिली की, पानिपत रिफायनरी 2025 च्या अखेरपासून शाश्वन विमान इंधनाची निर्मिती करणार आहे. दरवर्षी या रिफायनरीमधून 35 हजार टन शाश्वत इंधन निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार 2027 पासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणामध्ये 1 टक्के शाश्वत इंधन वापरणं अनिर्वाय केलेलं आहे. यासाठी 2025 पासून उत्पादन केलं जाणाऱ्या इंधनातून पुरेसा साठा निर्माण होईल.
वापरलेल्या तेलाचा स्त्रोत
शाश्वत विमान इंधनासाठी लागणारं वापरलेलं तेल हे मोठ्या हॉटेल्सकडून रेस्टॉरंट चेनमधून आणि हल्दीरामसारख्या स्नॅक आणि मिठाई उत्पादक कंपन्यांकडून गोळा केलं जाणार आहे. एजन्सी या स्रोतांमधून वापरलेलं खाद्यतेल गोळा करतील आणि ते पानिपत रिफायनरीमध्ये नेतील. पानिपतमध्ये या खाद्यतेलाचं इंधनात रूपांतर केलं जाईल. यापूर्वी हे वापरलेलं खाद्यतेल परदेशात निर्यात केलं जायचं. मात्र, यापुढे हे वापरलेलं खाद्यतेल देशातच विमान इंधनासाठी वापरलं जाणार आहे.
घरातून वापरलेलं तेल कसं गोळा करणार?
भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृतीत स्वयंपाकघरात खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. घरातल्या स्वयंपाकात वापरलेलं तेल परत एखाद – दुसऱ्या वेळी वापरून फेकलं जातं. हे फेकून न देता विमान इंधनासाठी गोळा करण्याची गरज आहे. विविध हॉटेल्समधून वापरलेलं तेल गोळा करणं सोपं आहे. पण घराघरातून वापरलेलं तेल गोळा करणं तितकंच कठीण आहे. पण त्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.
भारतात शाश्वत विमान इंधनाचे भविष्य
पंतप्रधान मोदी यांनी यंदा स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात स्वच्छ ऊर्जेच्या वापरावर भर देणार असल्याचं सांगितलं होतं. वापरलेल्या खाद्यतेलापासून विमानाकरता इंधन निर्मिती ही स्वच्छ ऊर्जेच्या दिशेनं एक मोठी झेप आहे. शाश्वत विमान इंधन हे केवळ विमान वाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन कमी करणार नाही, तर कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासात देखील उपयोगी ठरेल. येत्या काळात, शाश्वत विमान इंधनाचा वापर वाढत आहे. तेव्हा या क्षेत्रामध्ये जागतिक विमान इंधन धोरणात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.