जवळपास 2 हजार भारतीय नागरीक हे म्यानमारमधून हाताळल्या जाणाऱ्या सायबर क्राईम कॅम्पमध्ये अडकून पडले आहेत. थायलंड म्यानमारच्या सीमा भागात असलेल्या म्यावाड्डी इथे हे कॅम्प असल्याचं समोर आलं आहे. अनेक भारतीय तरुणांना लाओस, कम्बोडिया, म्यानमार या देशातून खोट्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जबरदस्तीने सायबर क्राईम करणाऱ्या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी अडकवून ठेवलं जात आहे. या अशा कामांना ‘सायबर गुलामी’ असं नाव आहे. या अंतर्गत या तरुणांना वेगवेगळ्या देशातील माणसांना ऑनलाईन पद्धतीने फसवून त्यांचे पैसे हडपण्याचं काम दिलं जातं.
भारत सरकारचा सावधानतेचा इशारा
गेल्या चार -पाच वर्षापासून अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून नागरीकांना वेळोवेळी सावधानतेचा इशारा दिला जात आहे. दक्षिण आशिया देशांतून विशेषत: लाओस, कम्बोडिया आणि म्यानमार या देशांतून नोकरीच्या संधी येत असतील तर त्यांची पूर्ण पडताळणी करुनच कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
29 हजार भारतीय बेपत्ता
सप्टेबर 2024 पर्यंत जवळपास 29 हजार भारतीय हे मानवी तस्करी सारख्या प्रकरणामध्ये बेपत्ता झाल्याची माहिती बिझनेस स्टॅडर्ड वृत्तपत्राने दिली होती.
दरम्यान, या देशातल्या दूतावासांकडून सायबर गुलामगिरीमध्ये अडकलेल्या नागरीकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जातात. मात्र, जे स्व इच्छेने या क्षेत्रात काम करत आहेत, त्यांना सायबर गुन्हेगारी अंतर्गत शिक्षा दिली जाणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
जून 2022 पासून साधारण 600 भारतीय नागरीकांची कम्बोडिया, थायलंड आणि म्यानमार इथल्या सायबर क्राईम कॅम्पमधून सुटका केली आहे.
म्यावाड्डी सायबर क्राईमचं केंद्र
म्यावाड्डी हे म्यानमार देशातल्या कायीन राज्यातलं एक शहर आहे. या शहराला लागूनच थायलंडची सीमा आहे. सायबर गुन्हेगारीचं केंद्र म्हणून उदयास आलं आहे. या शहरामध्ये जगभरातल्या नागरीकांना ऑनलाईन पद्धतीने फसवणाऱ्या अनेक सायबर क्राईम कंपन्या आहेत. आणि या बहुतांशी कंपन्या चिनी नागरीकांकडून चालवल्या जात आहेत.
या कंपन्या वेगवेगळ्या देशातील तरुणांना खोट्या नोकऱ्यांचे आमिष देऊन या देशात बोलावून घेतात. त्यानंतर त्यांची महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्याकडून काढून घेत, त्यांना जबरदस्तीने सायबर क्राईम काम दिलं जातं. या कामासाठी भारतीय तरुणांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केलं जात असल्याचं उघडकीस आलं आहे.
म्यानमार सरकारची कारवाई
मध्यंतरी म्यानमार सरकारने कायदा व सुव्यवस्था विभागाने या शहरावर धाड टाकत झडती घेतली होती. त्यावेळी सायबर गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या सुमारे 270 परदेशी नागरिकांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, या सायबर गुन्हेगारी विरोधात चीन आणि म्यानमार या दोन्ही देशातल्या यंत्रणांनी एकत्र येत थायलंड सीमेलगतच्या भागात सुरू असलेली ही केंद्र उलथावून लावण्यासाठी मिशन सुरू केलं आहे.