2025 हे वर्ष आतापर्यंत भारतासाठी आणि आपल्या खेळाडूंसाठी कधी गोड तर कधी कडू अनुभवांचं होतं. एकीकडे नीरज चोप्राने भालाफेकीत 90 मीटरचा टप्पा ओलांडून इतिहास रचला, तर दुसरीकडे आपल्या पुरुष फुटबॉल टीमची कामगिरी काही खास दिसली नाही. पण, जेव्हा आपण भारतीय महिला खेळाडूंकडे पाहतो, तेव्हा मात्र चित्र पूर्णपणे बदलून जातं. या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत त्यांनी जी जबरदस्त कामगिरी केली आहे, ती पाहून फक्त क्रीडाप्रेमीच नाहीत, तर देशातील अनेक मुलींना खेळाडू बनण्याची प्रेरणा मिळत आहे. भारतीय महिला फुटबॉल टीमने पहिल्यांदाच स्वतःच्या बळावर आशियाई कपसाठी पात्रता मिळवली. आणि महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाचा अंतिम सामना दोन भारतीय खेळाडूंमध्ये होणार आहे. आणि क्रिकेटमध्ये भारतीय महिला टीमने इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी विजय मिळवला आहे. हे सगळं पाहता, हे वर्ष खऱ्या अर्थाने आपल्या महिला खेळाडूंसाठी ‘ड्रीम इयर’ ठरलं आहे.
फुटबॉलमध्ये मुलींचा ‘जलवा’
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (AIFF) कारभाराचा परिणाम पुरुष टीमवर झाला असला तरी, आपली भारतीय महिला फुटबॉल टीम ‘ब्लू टायग्रेसेस’ या सगळ्यापासून लांबच आहेत असं दिसतंय. त्यांनी अलीकडेच AFC आशियाई कपसाठी पात्रता मिळवली आहे आणि तेही पहिल्यांदाच स्वतःच्या हिंमतीवर. यावेळी त्यांनी आपली खरी ताकद दाखवून दिली.
थायलंडमध्ये झालेल्या क्वालिफायिंग राऊंडमध्ये कोच क्रिस्पिन छेत्री यांच्या टीमने धमाकेदार कामगिरी केली. त्यांनी 4 पैकी 4 सामने जिंकले आणि ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान पटकावलं. त्यांनी थायलंडला 2-1 ने हरवलं आणि मंगोलिया, इराक, टिमोर-लेस्टे विरुद्ध तब्बल 22 गोल केले. या जबरदस्त कामगिरीनंतर, पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या मुख्य स्पर्धेत त्या किती कमाल करतात, हे पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. आपल्या महिला फुटबॉल टीमने हे सिद्ध केलंय की, योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास त्या कोणत्याही मोठ्या संघाला टक्कर देऊ शकतात.
बुद्धिबळात दिव्या आणि हम्पीने घडवला इतिहास
जॉर्जियातील बाटुमी इथे सुरू असलेला महिला बुद्धिबळ विश्वचषक भारतासाठी आणखी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला आहे. या स्पर्धेतून पुढच्या वर्षीच्या कॅंडिडेट्स टूर्नामेंटसाठी तीन जागा मिळतात. याआधी, हरिका द्रोणावल्ली ही एकमेव भारतीय खेळाडू होती जी मागच्या दोन स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली होती.
पण यावर्षी, उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्यांपैकी अर्ध्या खेळाडू आपल्याच देशाच्या होत्या. हरिका, कोनेरू हम्पी, आर वैशाली या ग्रँडमास्टर्स आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख या चौघींपैकी, दिव्या आणि हम्पी या दोघी अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच दोन भारतीय महिला खेळाडू विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने असणार आहेत.
काही अविश्वसनीय विजयांनी या स्पर्धेला आणखी खास बनवलं आहे. दिव्याने जगातील टॉप-10 मधील दोन चीनी ग्रँडमास्टर्सना या स्पर्धेत हरवलं आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवालने माजी विश्वविजेत्या ॲना उशेनिनाला दुसऱ्या फेरीत हरवून मोठा विजय मिळवला. या जबरदस्त यशामुळे आता हे निश्चित झालं आहे की, पुढच्या वर्षी होणाऱ्या महिला विश्व अजिंक्यपदासाठी किमान दोन भारतीय खेळाडू आव्हान देणार आहेत. हे आपल्या देशासाठी खूप अभिमानास्पद आहे आणि यामुळे भारतात बुद्धिबळाला आणखी प्रोत्साहन मिळेल.
हेही वाचा: फिडे महिला विश्वचषक अंतिम सामना : हम्पीचा अनुभव विरुद्ध दिव्याची युवा प्रतिभा
क्रिकेटमध्ये हरमनप्रीत आणि टीमचा इंग्लंडमध्ये ‘डबल धमाका’
क्रिकेटमध्येही आपल्या भारतीय महिला क्रिकेट टीम काही मागे नाहीत. मागच्या वर्षीच्या निराशाजनक T20 विश्वचषकानंतर यावर्षी इंग्लंडमध्ये त्यांनी T20 आणि ODI दोन्ही मालिका जिंकल्या आहेत.
सर्वात खास गोष्ट म्हणजे, भारताने T20 मालिका एक सामना बाकी असतानाच जिंकली. आणि इंग्लंडच्या भूमीवर T20 फॉरमॅटमधील हा त्यांचा पहिला मालिका विजय होता. हा विजय भारतीय महिला क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण याआधी त्यांना इंग्लंडमध्ये फारसे यश मिळाले नव्हते. भारतीय महिला क्रिकेट टीमने 50 षटकांची मालिका जिंकून, या वर्षाच्या शेवटी आपल्याच देशात होणाऱ्या वनडे विश्वचषकाआधी इतर सर्व संघांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील टीम आता एक वेगळ्याच आत्मविश्वासाने खेळत आहे.
अनाहत आणि श्रेयासी
फक्त सांघिक खेळातच नाही, तर वैयक्तिक खेळांमध्येही आपल्या महिला खेळाडू चमकत आहेत. अनाहत सिंग हिने स्क्वॉश आणि श्रेयसी जोशी हिने रोलर स्केटिंग मधील चमकदार कामगिरीमुळे भारतीय खेळाचे भविष्य खूपच उज्वल दिसत आहे. उभरती स्टार अनाहतने कैरो, इजिप्त येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून उत्तम कामगिरी केली.
श्रेयसी जोशीने दक्षिण कोरियात झालेल्या एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये दुहेरी सुवर्णपदक पटकावले. तिने इनलाइन फ्रीस्टाईल क्लासिक स्लॅलोम आणि बॅटल स्लॅलोम या दोन्ही प्रकारात हे यश मिळवले. तिची ही कामगिरी रोलर स्केटिंगसारख्या कमी प्रसिद्ध असलेल्या खेळातही भारतीय महिला किती पुढे आहेत हे दाखवून देते.
हे वर्ष अजून संपलेलं नाही, अजून बरेच खेळ बाकी आहेत. पण आपल्या महिला खेळाडू ज्या प्रकारे एकमागून एक यश मिळवत आहेत, ते पाहून निश्चितच देशातील लोकांना भविष्यातही यशाची खात्री वाटत आहे. 2025 हे वर्ष भारतीय महिला खेळाडूंसाठी खरंच ‘सोन्याचं वर्ष’ ठरलं आहे.