ताण तणाव हा केवळ तरुणांना आणि प्रौढांनाच असतो आणि त्यामुळे साहजिकच रक्तदाबाचा आजार हा केवळ प्रौढांनाच होऊ शकतो असा आपला समज आहे. पण कर्नाटकमध्ये अलिकडे लहान मुलांच्या आरोग्य तपासणीमध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कर्करोग, मधुमेह याप्रमाणेच हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाब हा आजारही आता प्रौंढापुरता मर्यादित राहिलेला नाहीये.
कर्नाटकातील 6 आठवड्यांच्या बालकापासून ते 18 वर्षांच्या मुलांपर्यंत जवळपास 7.2 लाख बालकं ही उच्च रक्तदाब आजाराला सामोरे जात असल्याचं उघड झालं आहे.
नियमित आरोग्य तपासणीतून उघड झाली माहिती
कर्नाटक राज्याच्या आरोग्य विभागाकडून राज्यभरात लहान मुलांची नियमीत आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सहा आठवड्याच्या बाळांपासून 18 वर्षाच्या मुलं आणि मुलींचा यात समावेश होता. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाड्या, सरकारी शाळा, सरकारी अनुदानित शाळा या ठिकाणी या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 1.23 कोटी मुलांच्या 40 प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. दरवर्षी या चाचण्या केल्या जातात. यावर्षी पहिल्यांदाच रक्तदाबाची चाचणी केली गेली.
या चाचणीमध्ये जे जे मुलं हायपरटेंशनग्रस्त आहेत अशा मुलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात नेऊन त्यांची पुर्नतपासणी करुन त्यांना योग्य ती औषधे देण्यात आली. तसेच त्यांच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे मार्गदर्शन पालकांना करण्यात आलं.
वैद्यकीय तज्ज्ञांची चर्चा
लहान मुलांमध्ये हायपरटेंशनची स्थिती असणे ही धक्कादायक गोष्ट आहे. त्यामुळे या आजाराला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी आणि आजारी मुलांना वेळीच योग्य उपचारपद्धतीने बरं करण्यासाठी कर्नाटकातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी या विषयावर विशेष चर्चा आयोजीत केली. एम्स, ऋषिकेश आणि पोलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने या चर्चेचं नेतृत्व केलं.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून अधिकृत माहिती घेऊन या विषयावर धोरण राबविणार असल्याची माहिती या संस्थांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : सायलेंट किलर्स
खाण्याच्या सवयी कारणीभूत आहेत
बालपणातील उच्च रक्तदाब आजार ही एक छुपी महामारी आहे. लहान मुलांमध्ये हायपरटेंशन असणं आणि त्याचं प्रमाण लाखाच्या घरात असणं हे धक्कादायक आहे. कर्नाटकाप्रमाणे अन्य राज्यातील लहान मुलांचीही तपासणी करणं अत्यावश्यक आहे. यावरुन हायपरटेंशनग्रस्त असलेले लहान मुलांचं प्रमाण समजेल. त्यानंतर यामागची कारणं शोधणंही सोपं होईल.
दरम्यान, अलिकडच्या खाद्यसवयीमध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ, साखर आणि मोठ्या प्रमाणावर प्रक्रियायुक्त पदार्थांच्या सेवनामुळेही उच्च रक्तदाबाचा आजार निश्चितच होऊ शकतो. याशिवाय चुकीची जीवनशैली आणि अतिलठ्ठपणामुळेही उच्च रक्तदाब होण्याची शक्यता आहे.
एकिकडे लहान वयात या आजाराचं निदान झाल्याने वेळीच उपचार करुन ते रोखता येणं शक्य आहे. जर ओबेसिटी – अतिलठ्ठपणा किंवा आनुवांशिक कारणामुळे उच्च रक्तदाबाचा आजार होत असेल तर त्यांची सर्वात आधी तपासणी केली पाहिजे. यासाठी सरकारकडून किंवा अन्य संबंधित संस्थांकडून विविध मनोरंजनात्मक मार्गातून याबद्दलची जनजागृती करता येईल. यातुनच योग्य ती काळजी कशी घ्यावी, याविषयीची माहितीही पालक आणि मुलांपर्यंत पोहोचविता येईल.
घर – घर आरोग्य तपासणी शिबिर
कर्नाटकमध्ये सध्या गृह आरोग्य योजने अंतर्गत घराघरात आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमध्ये लहान मुलं आणि तरुणांची मुख्य तपासणी केली जात आहे.
या मोहिमेमध्ये तरुणांच्या आरोग्य तपासणीवरही लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. शाळकरी आणि लहान मुलांची तपासणी अंगणवाड्या आणि शाळांमध्ये केलेली आहे. 17-18 वर्षांच्या मुलांची तपासणी महाविद्यालयात केली आहे. मात्र, 18 ते 30 या वयोगटातील तरुणांची तपासणी होणं गरजेचं आहे असं मत डॉ. ओम प्रकाश बेरा यांनी व्यक्त केलं आहे.
या मोहिमांशिवाय खाद्यसवयी आणि जीवनशैलीशी संबंधित असलेल्या आजाराविषयी जनजागृती करुन प्रतिबंधात्मक उपचारांची माहिती तळागळापर्यंत पोहोचवणंही तितकचं आवश्यक आहे. जेणेकरुन योग्य वेळी आहारात आणि जीवनशैलीत बदल करुन स्वास्थ पिढी घडवता येईल.