‘चित्ता प्रकल्पा’ अंतर्गत दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना इथून 8 चित्यांना भारतात आणले जाणार आहे. त्यांना दोन टप्प्यात भारतात आणले जाईल. यापैकी 4 चित्ते मे महिन्यापर्यंत भारतात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं वृत्त पीटीआयने कडून सांगण्यात आलं. हे चित्ते गांधी सागर अभयारण्यात सोडले जातील. यानंतर आणखी 4 चित्ते काही महिन्यांनंतर भारतात येणार आहेत.
या संदर्भात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथे नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते. या वेळी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे (NTCA) अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच चित्त्यांवर काम करणारे तज्ज्ञ सहभागी होते.
केवळ बोत्सवाना नव्हे, तर केनिया आणि दक्षिण आफ्रिकेहूनही चित्ते येणार
फक्त बोत्सवानातूनच नव्हे तर केनिया आणि दक्षिण आफ्रिकेहूनही चित्ते भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. सर्व चित्ते गांधी सागर अभयारण्यात ठेवण्यात येणार असून, हे अभयारण्य मध्य प्रदेशात राजस्थानच्या सीमेलगत आहे.
सध्या कुनो राष्ट्रीय उद्यानात 26 चित्ते
सुरुवातीला आणलेले चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले होते. सध्या तिथे 26 चित्ते आहेत. यापैकी 16 चित्ते जंगलात मुक्तपणे फिरतात तर 10 चित्ते पुनर्वसन केंद्रात आहेत. ज्वाला, आशा, गामिनी आणि वीरा या मादी चित्त्यांनी पिल्लांना जन्म दिला आहे. पर्यटकांच्या संख्येतही यामुळे मोठी वाढ झाली आहे. तसंच गेल्या दोन वर्षांत कॅम्पमधील पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली असल्याचेही अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितलं
चित्तांसाठी गांधी सागरची निवड
आता नव्याने येणाऱ्या चित्त्यांसाठी गांधी सागर वन्यजीव अभयारण्याची निवड करण्यात आली आहे. हे अभयारण्य सुरक्षित आणि विस्तीर्ण असून, या ठिकाणी चित्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन सोयी-सुविधा उभारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकार यांच्यात सहकार्याचा एक करार झाला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांत चित्त्यांसाठी एक मोठं संरक्षित क्षेत्र तयार होणार आहे.
चित्ता मित्रांची तयारी
चित्त्यांचे रक्षण आणि व्यवस्थापन सुकर होण्यासाठी ‘चित्ता मित्र’ म्हणून स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे स्वयंसेवक स्थानिक रहिवासी किंवा वनविभागाचे कर्मचारी असून, त्यांना चित्त्यांचे निरीक्षण, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि चित्ते मानवी वस्तीकडे जाणार नाहीत यासाठी मार्गदर्शन दिलं जात आहे.
चित्ता सफारीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज
कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते सफारी सुरू करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जात नमूद करण्यात आले आहे की, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात सफारी सुरू करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असून, लवकरच या अर्जावर निर्णय अपेक्षित आहे.
‘चित्ता प्रकल्पा’ मागील प्रवास
भारतामध्ये चित्ते संपूर्णपणे नामशेष झाले होते. 1952 मध्ये त्यांना अधिकृतपणे नामशेष घोषित करण्यात आले. मात्र 2022 मध्ये ‘चित्ता प्रकल्पा’अंतर्गत नामिबियामधून 17 सप्टेंबर 2022 रोजी 8 चित्ते भारतात आणण्यात आले. त्यात 5 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश होता. हे चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते भारतात आणण्यात आले.
भारत सरकारसाठी चित्ता प्रकल्प ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. आतापर्यंत या योजनेसाठी सुमारे 112 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यातील 67% निधी केवळ मध्य प्रदेशात चित्त्यांचे व्यवस्थापन आणि पुनर्वसन यासाठी वापरला गेला आहे.