अमित कटारिया, देशातले सगळ्यात श्रीमंत आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. 8.9 कोटी रुपये ही त्यांची एकूण संपत्ती आहे आणि त्यांचा पगार आहे फक्त 1 रुपया. अमित कटारिया यांनी आयआयटी दिल्लीमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर त्यांनी स्पर्धात्मक परिक्षेची तयारी सुरू केली. 2004 साली त्यांनी आयएएस म्हणून काम करायला सुरूवात केली. छत्तीसगड राज्यात आणि केंद्रातही त्यांचा चांगला प्रभाव आहे.
जाणून घेऊयात आयआयटी दिल्ली मधून शिकल्यानंतर अमित कटारिया हे या क्षेत्रात कसे आले? आणि ते सरकारकडून 1 रुपयाचं पगार का घेतात?
अमित कटारिया यांचं शिक्षण
अमित कटारिया यांनी दिल्लीतल्या आरके पुरम या नामांकित पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढे आयआयटी दिल्लीमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. अमित यांचे समस्या समजून घेणं, त्याचं आकलन आणि त्या जलदगतीने सोडविण्यात हातखंडा आहे. या कौशल्याचा उपयोग त्यांना प्रशासकीय सेवेत उत्तमरित्या होतो.
प्रशासकीय सेवक म्हणून करिअर
2003 साली अमित यांनी यूपीएससीची परिक्षा दिली. या परिक्षेत ते 18 व्या क्रमांकाने पास झाले. या यशानंतर त्यांनी देशाच्या सेवेसाठी, विकासासाठी राज्यात आणि केंद्रात विविध पदांवर काम केलं.
छत्तीसगडमधल्या अनेक राज्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्य केलं
केंद्र सरकारमध्ये ग्रामीण विकासखात्यात सहसचिव म्हणून भूमिका पार पाडली आहे.
केंद्र सरकारमध्ये सलग सात वर्ष काम केल्यानंतर आता ते पुन्हा त्यांच्या छत्तीसगड राज्यात कार्य करत आहेत.
हेही वाचा : ठाण्याचे स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे…
अमित कटारिया यांचं उत्पन्न
अमित कटारिया हे सर्वात श्रीमंत प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांना मोठ्या आकड्यांचा पगार असेल असा आपला समज असेल. पण तसं नाहिये. कटारिया यांनी जेव्हापासून प्रशासकीय सेवेला सुरूवात केली आहे, तेव्हापासून त्यांनी दर महिन्याला फक्त 1 रूपया पगार घेतला आहे.
कटारिया यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही खूप वेगळी आहे. कटारिया याच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. संपूर्ण दिल्लीत त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय पसरलेला आहे. त्यामुळे ते जरी प्रशासकीय सेवक असले तरी कौटुंबिक व्यवसायातून त्यांच्या हिश्याला मिळणारं उत्पन्नचं त्यांचं मुख्य उत्पनांचा स्त्रोत आहे. या उत्पन्नाच्या गुंतवणूकीतून त्यांनी ही संपत्ती उभी केली आहे.
अमित कटारिया यांचं वैयक्तिक जीवन
अमित कटारिया यांचं अस्मिता हंडा यांच्याशी लग्न झालं आहे. अस्मिता हंडा या पेशाने कमर्शियल पायलट आहेत. ते अनेकदा त्यांचे फिरण्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
आयआयटी पदवीधर आणि प्रभावशाली प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. व्यावसायिक कुटुंब, आयआयटी दिल्लीमधून शिक्षण अशा सगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या अमित कटारिया यांना नक्कीच उच्च पदाची नोकरी किंवा स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू करता आला असता. पण देशासाठी काम करण्याची जिद्द मनात असल्यामुळे वैयक्तिक लाभापेक्षा सामाजिक सेवेला त्यांने प्राधान्य दिलं आहे. यातून त्यांनी देशसेवेचा नवा कित्ता घालून दिला आहे.