परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट हे अत्यंत महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. भारतात पासपोर्ट देण्याचं काम परराष्ट्र मंत्रालय करतं. आता मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव जोडायचं असेल तर त्यासाठी आता मॅरेज सर्टिफिकेट द्यायची गरज भासणार नाही.
यापूर्वी, पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्य एकमेकांचं नाव जोडायचं असल्यास, मोठी किचकट प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. त्यात मॅरेज सर्टिफिकेट सादर करणं अनिवार्य होतं. अनेकदा नोकरी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी पासपोर्टची गरज असताना, मॅरेज सर्टिफिकेट वेळेवर न मिळाल्याने पती-पत्नीला खूप अडचणींचा सामना करावा लागत होता.
आजही भारतात अनेक ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट सहजपणे मिळत नाही. विशेषतः उत्तर प्रदेश (UP), बिहार आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मॅरेज सर्टिफिकेटला तितकं महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे या राज्यांतील लोकांना त्यांच्या पासपोर्टमध्ये जोडीदाराचं नाव समाविष्ट करताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता भारत सरकारने मॅरेज सर्टिफिकेट सादर करण्याची अट पूर्णपणे रद्द केली आहे.
कोणते नवीन कागदपत्र लागेल ?
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की लग्नानंतर पासपोर्टमध्ये पत्नी किंवा पतीचं नाव जोडण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक नसेल. त्याऐवजी, अर्जदाराला स्वतःचं एक घोषणापत्र (self-declaration certificate) द्यावं लागेल. यासाठी मंत्रालयाने ‘Annexure J’ हा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
या ‘Annexure J’ मध्ये अर्जदारांना त्यांच्या लग्नाचा फोटो आणि एकत्र काढलेले फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन असेल. त्यासोबतच, दोघांच्याही स्वाक्षऱ्या आवश्यक असतील आणि काही आवश्यक माहिती भरावी लागेल. हे घोषणापत्र लग्नाच्या प्रमाणपत्रासारखंच ग्राह्य धरलं जाईल. आणि याच आधारावर पती-पत्नीचं नाव पासपोर्टमध्ये जोडलं जाईल.
काय आहे हे ‘Annexure J’ ?
हा एक प्रकारचा संयुक्त घोषणापत्र फॉर्म आहे. जो विवाहित जोडप्यांना त्यांच्या पासपोर्टवर एकमेकांचं नाव जोडण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये दोन्ही जोडीदारांची नावे,पत्ता ,ओळखपत्र तपशील आणि त्यांच्या वैवाहिक स्थितीची आणि एकत्र राहण्याची औपचारिक घोषणा नमूद केलेली असते.
अर्ज भरताना काही गोष्टी लक्षात ठेवा
- फॉर्मवर पती-पत्नीचा एकत्र सही केलेला एकत्र फोटो (self-attested) लावावा
- घोषणापत्राचं ठिकाण आणि तारीख स्पष्टपणे नमूद करावी
- आधार कार्ड, वोटर आयडी आणि पासपोर्ट क्रमांक असल्यास वैयक्तिक ओळख क्रमांक भरावे
- घोषणापत्र वैध ठरण्यासाठी फॉर्ममधील सर्व माहिती अचूकपणे भरणं आवश्यक
हा नियम महत्त्वाचा का आहे?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पासपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हा नवीन नियम देशातील प्रादेशिक असमानता दूर करण्यासाठी मदत करेल. महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील अनेक राज्ये विवाह नोंदणीला अधिक महत्त्व देतात. आणि तिथे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सहज उपलब्ध होते. मात्र, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया तितकी सोपी नाही. त्यामुळे या भागातील लोकांना पासपोर्टसाठी अर्ज करताना विवाह प्रमाणपत्र सादर करणं कठीण जात होतं.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘Annexure J’ विशेषतः अशा राज्यांतील अर्जदारांसाठी खूप उपयुक्त ठरेल जिथे विवाह नोंदणी अनिवार्य नाही. यामुळे या भागातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा: तुम्हांला भारतीय पासपोर्टच्या पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगांचा अर्थ माहीत आहे का?
इतर बदल: जोडीदाराचे नाव बदलणे किंवा हटवणे
जरी ‘Annexure J मुळे जोडीदाराचं नाव जोडण्याची प्रक्रिया सोपी झाली असली, तरी ते पासपोर्टमधून काढण्यासाठी किंवा बदलण्यासाठी काही विशिष्ट कायदेशीर कागदपत्रं आवश्यक असतील:
- पती/पत्नीचं नाव काढण्यासाठी: घटस्फोटाचा अधिकृत आदेश (decree of divorce) सादर करणं आवश्यक असेल.
- पती/पत्नीचं नाव बदलण्यासाठी (पुनर्विवाह किंवा मृत्यू झाल्यास): अर्जदारांना खालील कागदपत्रं सादर करावी लागतील
- मागील जोडीदाराचा घटस्फोटाचा हुकूम किंवा मृत्यू प्रमाणपत्र.
- पुनर्विवाह प्रमाणपत्र किंवा नवीन Annexure J
- QR-कोड असलेले आणि अद्ययावत ओळखपत्रं.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने ‘Annexure J सुरू करण्याचा निर्णय पासपोर्ट प्रक्रिया अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ज्या अनेक भारतीयांना विवाह नोंदणीमध्ये अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी हा बदल एक मोठा अडथळा दूर करणारा ठरेल आणि त्यांच्या पासपोर्ट अर्जाची प्रक्रिया अधिक सोपी होईल.