विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय ही क्षेत्र अजूनही प्रामुख्याने पुरुषांनी व्यापलेली आहेत. मात्र, 1938 मध्ये जेव्हा स्त्रियांना प्राथमिक शिक्षणापासूनही दूर ठेवलं जायचं, अशा काळात कोलकत्ताच्या असिमा चॅटर्जी यांनी सेंद्रीय रसायनशास्त्र (Organic Chemistry) या विषयात मास्टर्सची पदवी घेतली. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर विज्ञान विषयात त्यांनी भारतातीलच विद्यापीठातून पीएचडी शिक्षण पूर्ण करत डॉक्टरेट पदवी घेतली.
भारतातल्या सेंद्रीय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसीन या क्षेत्रात असिमा चॅटर्जी यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला जातो. पाहुयात प्रतिकुल परिस्थितीत विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेत या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या असिमा चॅटर्जी यांचा प्रेरणादायी प्रवास.
कुतूहलाने व्यापलेल्या परिसराची उत्सुकता
असिमा चॅटर्जी यांचा जन्म 23 सप्टेंबर 1917 साली कोलकत्ता इथे झाला. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या असिमा यांच्या समाजात कोणतीही स्त्री शिक्षणासाठी बाहेर पडलेली नव्हती. मात्र, असिमा यांनी शिकावं यासाठी त्यांचे वडील इंद्रा नारायण मुखर्जी खूप आग्रही होते. ते पेशाने डॉक्टर होते आणि वनस्पतीशास्त्र या विषयात ते रुची घेत असत. त्यांच्यामुळे असिमा यांनाही सुद्धा लहानपणापासून या विषयाची आवड निर्माण झाली.
सामाजिक परिस्थिती जरी मुलींच्या शिक्षणासाठी अनुकूल नव्हती तरी असिमा या शिकू लागल्या. त्या केवळ शिकल्या नाहीत तर शैक्षणिक कारकिर्दीत त्या नेहमी अव्वल असत.
1936 साली त्यांनी कोलकत्ताच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमधून रसायनशास्त्र ( केमिस्ट्री) विषयात पदवी घेतली.
उच्च शिक्षणात कर्तृत्व सिद्ध करत सामाजिक बंधने मोडली
असिमा चॅटर्जी या केवळ पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन थांबल्या नाहीत. पुढे त्यांनी याच विषयात पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणाला सुरुवात केली. सन 1938 साली त्यांनी सेंद्रीय रसायनशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली. आणि त्यानंतर 1944 साली त्यांनी विज्ञान क्षेत्रात पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. विज्ञानासारख्या विषयात डॉक्टरेट मिळवणाऱ्या असिमा या पहिल्या भारतीय महिला होत्या. आणि अभिमानाची बाब म्हणजे पीएचडीसाठी त्या परदेशात गेल्या नाहीत तर भारतातल्याच विद्यापीठातून त्यांनी ही पदवी मिळवली.
भारतातले रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल चंद्रा राय आणि भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांनी असिमा चॅटर्जी यांना मार्गदर्शन केलं होतं.
असिमा चॅटर्जी यांनी वनस्पतीतील रसायनशास्त्र या विषयामध्ये विशेष प्राविण्य मिळवलं होतं. डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर त्यांनी विस्कॉन्सिन आणि कॅलटेक विद्यापिठातून वनस्पतीमध्ये उपलब्ध असलेल्या अल्कलॉइड्स घटक, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जैविकदृष्ट्या सक्रिय सेंद्रीय संयुगे आणि त्याचा औषध निर्मितीसाठी होणारा उपयोग यावर संशोधन केलं.
आर्थिक आव्हाने
असिमा या सामान्य कुटुंबातील होत्या. तरी कुटुंबियांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं होतं. पण हे एक आव्हान संपलं असलं तरी आर्थिक आव्हानं मात्र संपलं नव्हतं. विविध विषयावर संशोधन करण्यासाठी आर्थिक पाठबळाची खूप गरज असते. असिमा यांना हे आर्थिक पाठबळ लाभलं नव्हतं. त्यामुळे अनेकदा त्यांच्या संशोधनामध्ये अडथळे येत. अनेकदा असिमा यांनी स्वखर्चाने संशोधनाची एक एक पायरी पूर्ण केली आहे. या कामामध्ये त्यांना सहकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पगार त्या स्वखर्चातून देत असत.
अशा अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी फायटोमेडिसीन आणि सिंथेटिक सेंद्रीय रसायनशास्त्र या विषयातलं संशोधन पूर्ण केलं.
रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील असिमा चॅटर्जी यांचं योगदान
एपिलॅप्सी आजारावरील औषधांची निर्मिती – असिमा चॅटर्जी यांनी मर्सिलिया मीनुटा या वनस्पतीपासून ‘आयुष 56’ हे औषध विकसीत केले. या औषधांचा उपयोग एपिलप्सी आजारावर करता येतो.
मलेरियावरील औषध – औषधी वनस्पतीच्या माध्यमातून त्यांनी मलेरिया प्रतिरोधक औषधही विकसित केलं आहे.
कॅन्सर संशोधन – कॅन्सर आजारावरील उपचारावर त्या तब्बल चार दशके काम करत होत्या. या संशोधना अंतर्गत त्यांनी अल्कलॉइड्स या वनस्पतीमध्ये उपलब्ध असलेल्या घटकाचा वापर केमोथेरपीमध्ये कसा करता येईल यावर संशोधन केलं आहे.
औषधी वनस्पती – भारतीय उपखंडातील औषधी वनस्पती, त्यांचा वापर आणि नैसर्गिकरित्या त्यांची उत्पादकता वाढवणं या विषयावर ही त्यांनी संशोधन केलं आहे.
वनस्पतीमधल्या अल्कलॉइड्समध्ये दोन प्रकार असतात. एक इंडोल आणि दुसरा आयसोक्विनॉलिन. इंडोल अल्कलॉइड्स म्हणजे जे अल्कलॉइड्स अमिनो एसिड ट्रायप्टोफॅन पासून वनस्पतीमध्ये तयार होतात. तर आयसोक्विनॉलिन अल्कलॉइड्स हे नैसर्गिकरित्या वनस्पतीमध्ये उपलब्ध असतात. या दोन्ही अल्कलॉइड्समध्ये औषधी गुणधर्म असतात. वनस्पतीतील या दोन्ही घटकांच्या रचनांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यानंतर वनस्पतीतील कुमारिन घटकाचा अभ्यास आणि सेंद्रीय रसायनशास्त्र विषयाचा नाविन्यपूर्ण विश्लेषणात्मक अभ्यास करण्याचं तंत्र त्यांनी विकसित केलं.
शिक्षणप्रसार कार्य
असिमा चॅटर्जी यांनी आपल्या विविध संशोधन कार्यादरम्यान शिक्षणाचा प्रसार आणि स्तर उंचवण्यासाठीही योगदान दिलं. त्यांनी लेडी ब्रेबॉर्न कॉलेजमध्ये महिला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रसायनशास्त्र विभागाची निर्मिती केली.
असिमा चॅटर्जी यांचं लग्न बरदानंदा चॅटर्जी यांच्यासोबत झालं होतं. ते भौतिक रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्याची जबाबदारी खूप उत्तमपणे सांभाळत अनेक महिलांना या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी उद्द्युक्त केलं.
कार्यकर्तुत्वाचा गौरव
असिमा चॅटर्जी यांना विज्ञान आणि वैद्यक शास्त्रातल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
शांती स्वरुप भटनागर पुरस्कार 1961 – रसायनशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा हा पुरस्कार मिळवणाऱ्या असिमा चॅटर्जी या पहिल्या महिला होत्या.
पद्म भूषण 1975 – सन 1975 साली त्यांनी भारत सरकारच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
राज्यसभा पद – विज्ञान शाखेतील त्यांच्या कार्यासाठी त्यांना 1982 ते 1990 या कालावधीत राज्यसभेमध्ये खासदार म्हणून कार्य करण्याची संधी दिली होती.
देशभरातील अनेक नामांकित विद्यापीठातून त्यांना फेलोशिप आणि सन्मानजनक डॉक्टरेट पदवी दिली आहे.
अखंड आयुष्य त्यांनी भारतातचं व्यतित केलं. तरिही जागतिक पातळीवर सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. याचीच पोचपावती म्हणून सन 2017 मध्ये त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्ताने गुगल डूडलच्या माध्यमातून आंदराजली वाहिली होती.