शहरांमध्ये पेइंग गेस्ट (पीजी) हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चांलतो. मात्र, बेंगळुरूमध्ये या व्यवसायाला घरघर लागली आहे. यामागे दोन कारणं आहेत एक बेंगळुरू महानगरपालिकेचे नवीन नियम आणि दुसरं आयटी क्षेत्रात सुरु असलेली नोकरकपात.
महादेवपुरा आणि मारताहळ्ली सारख्या भागात, पीजी व्यवसाय 25 टक्क्यापर्यंत घटला आहे. दररोज निदान दोन तरी पीजी बंद होत आहेत. सोशल मीडियावर बेंगळुरूमधील या समस्येवर खूप चर्चा सुरु आहेत. या पीजी व्यवसायामध्ये होणाऱ्या या बदलांचा हजारो लोकांवर परिणाम होत आहे.
शहरातले पीजी कायद्याच्या परीघात
बृहत बेंगळुरू महानगरपालिकेने (बीबीएमपी) ‘बीबीएमपी कायदा, 2020 च्या कलम 305 अंतर्गत गेल्या वर्षी पीजी संदर्भात नवे नियम लागू केले. या नियमांमुळे अनेक पीजी बंद झाले आहेत.
या नियमांनुसार जर तुम्हाला पीजी सुरु करायचं असेल तर त्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. स्वच्छता आणि अग्निसुरक्षा मानकांचे पालन करणे आणि पीजी सुरु करायचं असेल तर पेईंग गेस्ट म्हणून येणाऱ्या प्रत्येकांना राहायला कमीतकमी 70 चौरस फूटाची जागा देणे बंधनकारक केलं आहे. 40 चौरस फूटांपेक्षा कमी जागा असलेल्या पीजींना आता परवानगी नाकारली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात पालिकेने महादेवपुरा या भागातले शहर नियोजन आणि परवाने कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी 100 हून जास्त पीजी कीचन बंद केले.
पीजी म्हणून घराची जागा देत असाल तर तिथे सीसीटिव्ह कॅमेरा बसवणे, दररोज 135 लीटर पाणी पुरवठा निश्चित करणे. जेवणाचे डब्बे वा तत्सम सुविधा देत असाल तर त्यासाठी अन्न सुरक्षा विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. या सगळ्या सुविधा उपलब्ध करणे, परवानग्या घेणे या सगळ्या गोष्टींमुळे खर्च वाढत आहे. त्यामुळे अनेकांनी हा पीजीचा व्यवसाय बंद केला आहे.
“शहरातील 12 हजाराहून अधिक पीजींपैकी फक्त 2,500 पीजी अधिकृतपणे नोंदणीकृत आहेत. 10 हजाराहून अधिक पीजी अजूनही योग्य मान्यतांशिवाय बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत. बीबीएमपीने आता नियमावली तयार केल्यामुळे कधीही या अनधिकृत पीजींवर धाड टाकली जाऊ शकते. यामुळे अनधिकृत पीजींमध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं बनलं आहे, अशी माहिती बेंगळुरू पीजी ओनर्स असोसिएशनच्या सेक्रेटरी सुखी सेओ यांनी दिली आहे.
पीजीचं बदलतं अर्थकारण
पूर्वी या पीजींच्या व्यवसायातून 6-8 टक्के परतावा मिळत होता. पण आता या व्यवसाय क्षेत्रातली गुंतवणूक तोट्याची ठरत आहे. पीजी असलेल्या घरांवर वीजेवर व्यावसायिक दर लावले जातात. भरीस भर म्हणून बेंगळुरू पाणीपुरवठा आणि सांडपाणी मंडळाने पाण्याचे शुल्क वाढवले आहेत. त्यामुळे खर्चात आणखीन भर पडत आहे. हा खर्चाचा भार ते भाडेकरुंना देऊ शकत नाहीत म्हणून अनेक पीजी मालक आता तोट्यात चालले आहेत.
नव्या नियमांचा स्थलांतरित तरुणांनाही फटका
बेंगळुरूमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. शैक्षणिक संस्था सुद्धा आहेत. अनेक तरुण तिथे नोकरी वा शिक्षणाच्या निमित्ताने स्थलांतर करतात. त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणं, जेवण आणि तत्सम सुविधा निर्माण करत या शहरातले काही भाग विकसित झाले होते. बेंगळूरू महापालिकेच्या या नविन नियमांमुळे पीजींना राहण्यासाठी योग्य त्या सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे हे दिसत आहे. मात्र, दुसरीकडे आता अधिकृत पीजींची संख्या कमी होईल, परिणामी पीजींचे भाडे वाढू शकते, राहण्यासाठी जागा मिळणं त्यामुळे कठीण होऊ शकेल. त्यामुळे या नव्या नियमांचा जितका परिणाम पीजी व्यावसायिंकावर होत आहे तितका परिणाम शहरात स्थलांतर करणाऱ्या तरुणांनाही होणार आहे.