गुजरातमधल्या अमरेली जिल्ह्यातला भरतभाई बरैया दररोज संध्याकाळी काळोख होताच आपल्या पाच मुलींना 8 बाय 6 लोखंडी पिंजऱ्यात बंद करतात. आपल्याला ही क्रूरता वाटेल. पण बरैया हे रागापोटी नाही तर मुलांच्या संरक्षणासाठी करत आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यापासून सुरक्षेसाठी पिंजऱ्याचा आधार
भरतभाई बरैया हे अमरेली जिल्ह्यामध्ये भाडेतत्त्वावर शेती करतात. त्यांना पाच मुली आणि सहावा मुलगा आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळं त्यांच्या नवजात बाळाला त्यांनी पत्नीच्या माहेरी ठेवलं आहे. पाच मुलींसह बरैया हे शेतावर राहतात. शेतावर एका बाजूला ताडपत्री आणि दोन बाजूंनी सिंमेटच्या विटा अशा स्वरुपातलं कच्च घर आहे.
ही शेतजमीन गीर राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. त्यामुळे त्यांच्या शेताच्या आजूबाजूला सिंह अगदी सहज पाहायला मिळतात. मात्र, बरैया सांगतात की, “त्यांना किंवा त्यांच्या मुलींना या सिंहाची भिती वाटत नाही. जेव्हा सिंह शेताच्या बाजूला येतात तेव्हा त्यांच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकून आम्ही सावध असतो. ते माणसांवर हल्ला करत नाहीत. पण बिबट्यांची या भागात खूप दहशत आहे. बिबटे हे शांतपणे येऊन हल्ला करतात. अनेकदा कुत्र्याची पिल्लं आणि लहान मुलांवर बिबटे हल्ला करतात.”
ते पुढे सांगतात की, “माझ्या पत्नीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि माझ्या मुलींना मी बिबट्याच्या हल्ल्यात मरताना नाही पाहू शकत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी हा मानवी पिंजरा तयार केला आहे.”
बरैया यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी, नीलगाय आणि रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतावर जावं लागतं. यावेळेत मुलींचं रक्षण करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. या पिंजऱ्यासाठी त्यांनी 9 हजार रुपये खर्च केले आहेत.
बिबट्याचा वावर
बरैया यांचं हे शेतातलं घर गुराच्या गोठ्याप्रमाणेच आहे. एका बाजूला ताडपत्री आणि दोन बाजूला सिंमेटच्या विटा या केवळ एकमेकांवर रचल्या आहेत. या घराला तीनच बाजू आहेत. आणि त्यात हा मुलींसाठी तयार केलेला पिंजरा आहे. या घराच्या आजूबाजूला बिबट्याचा कायम वावर असतो. दररोज एक किंवा दोन बिबटे हे त्यांच्या घराबाजूला असलेल्या वडाच्या झाडांवर बसलेले असतात.
एकदा बरैया यांच्या 10 वर्षाच्या मोठ्या मुलीनं घराच्या बाजूला बिबट्याला पाहिलं. तेव्हापासून ती एवढी घाबरलेली असते की, दिवसाच्या वेळीसुद्धा ती त्या पडक्या घरातून एकटी बाहेर पडण्याचं धाडस करत नाही.
बिबट्याची वाढती संख्या
या गीर उद्यानात, 2023 सालच्या वन्यजीव गणनेत 2 हजार 274 बिबट्यांची नोंद झाली आहे. एकट्या अमरेली जिल्ह्यामध्ये 2016 च्या वन्यजीव गणनेत 105 बिबट्यांची नोंद झाली होती. 2023 मध्ये यात वाढ होत 126 बिबटची नोंद झाली आहे. या बिबट्यांपासून मुलींचं रक्षण करण्याचं मोठं आव्हान बरैयासमोर आहे.