डिजिटल इंडिया या मोहिमेचाच एक भाग म्हणून भारत सरकारने सप्टेंबर 2025 पासून डिजिटल जन्म दाखल्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे नागरिक आता घरबसल्या आपला जन्माचा दाखला घरबसल्या अगदी 5 मिनिटात मिळवू शकतात. यासाठी सरकारी कार्यालयामध्ये मोठ्या रांगांमध्ये थांबण्याची गरज आता संपुष्ठात येणार आहे. जाणून घेऊयात कशाप्रकारे या दाखल्यासाठी अर्ज दाखल करायचा आहे.
सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम
केंद्र सरकारने नागरिकांना डिजिटल पद्धतीने जन्म आणि मृत्यूचे दाखले देण्यासाठी सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम या नावाने पोर्टल सुरू केलं आहे. अलीकडे नवजात बाळाचा जन्म होताच रुग्णालयामध्ये त्याची नोंद केली जाते. त्यानंतर दर महिन्याला रुग्णालयात जन्मलेल्या बाळाच्या या नोंदी स्थानिक सरकारी कार्यालयात नोंदविण्यासाठी पाठवल्या जातात. त्यानंतर महिन्याभरात सरकारी कार्यालयातून जन्मदाखल्याची नोंद करण्यासाठी अर्ज भरुन द्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला बाळाचा जन्मदाखला मिळत असतो. रुग्णालयात आपल्या जन्माची नोंद असेल तर हा दाखला आपल्याला सहज मिळतो. मात्र, नोंद नसल्यावर अनेक समस्या येतात. सरकारने हीच अडचण दूर केली आहे.
सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम या पोर्टलवर आपल्याला आधार कार्डच्या साहय्याने आणि अन्य काही आवश्यक कागदपत्रे जमा करुन हा दाखला मिळवता येऊ शकतो. या सुविधेमुळे सहजपणे, पारदर्शकरित्या आणि जलगगतीने आपल्याला जन्मदाखला हे महत्त्वपूर्ण कागदपत्र मिळवता येऊ शकते.
पोर्टल कसं हाताळावं?
नागरिक म्हणून या पोर्टलवर आपल्या जन्माची नोंदणी आपल्याला करता येते. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिमच्या https://dc.crsorgi.gov.in/crs/ या पोर्टल लिंकवर क्लिक करुन हे पोर्टल सुरू करायचं आहे.
त्यानंतर या पोर्टलच्या उजव्या बाजूला लॉग इन असा पर्याय दिलेला आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर आपल्यासमोर तीन पर्याय येतात. आपण सामान्य नागरिक म्हणून नोंदणी करत आहोत की रजिस्टर फक्शनरिज म्हणून की या पोर्टलचे तांत्रिक विभाग हाताळणारे म्हणून नोंदणी करत आहोत हे पर्याय निवडून स्पष्ट करावं लागतं.
सगळ्यात पहिला पर्याय निवडून आपण या पोर्टलवर आपली नोंदणी सुरू करायची आहे. या नोंदणीमध्ये पाच टप्पे आहेत. इथे आपलं नाव, पत्ता, जन्म तारिख, आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादी माहिती द्यायची असते. या पोर्टलवरून येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून आपली ही माहिती तपासली जाते.
ही प्राथमिक नोंदणी पूर्ण झाल्यावर पोर्टलचं मुख्य पान उघडते. त्यावर आपल्याला होम (पोर्टलचं होम पेज), जन्म, मृत्यू आणि दत्तक अशी चार पानं दाखवली जातात. आपल्याला जी नोंदणी करायची आहे त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग खाली दिलेला अर्ज भरायचा असतो. तिथे विचारलेली, आवश्यक असलेली सगळी कागदपत्रे सादर केल्यावर आपल्याला आपला दाखला मिळतो.
पोर्टलचं वैशिष्ट्य
या पोर्टलवर प्रत्येकांना सहजपणे नोंदणी करुन आपलं डिजिटल जन्माचा दाखला, कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचा मृत्यूचा दाखला सहजपणे काढता यावा यासाठी अनेक भाषेत हे पोर्टल हाताळता येणार आहे. ज्यांना संगणक वा डिजिटल कामाची माहिती नाही अशांना मदत व्हावी यासाठी स्थानिक भाषांचा आणि हेल्पलाईनची सुविधा दिलेली आहे.
कोणत्या राज्यातील नागरिक या सुविधांचा लाभ घेऊ शकतात?
हे पोर्टल जरी राष्ट्रीय पातळीसाठी सुरू केलेलं असेल तरी सध्या ठरावीक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी या पोर्टलची सुविधा सुरू केलेली आहे. यामध्ये चंदीगड, छत्तीसगड, अंदमान- निकोबार, लक्षद्विप, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, दादरा नगर हवेली, आणि दमण द्वीव, आंध्र प्रदेश, मिझोराम, आसाम, मध्यप्रदेश, त्रिपूरा, उत्तराखंड, बिहार, उत्तरप्रदेश, लडाख, महाराष्ट्र, सिक्कीम, हरयाणा, जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश, झारखंड, मणिपूर आणि गुजरात इथल्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने जन्म, मृत्यू वा दत्तक दाखला मिळू शकतो.
या पोर्टलचा प्रवास
जन्म नोंदणी कायद्यामध्ये 2023 साली दुरुस्ती केल्यामुळे डिजिटल पद्धतीने हे दाखले देणं शक्य झालं. देशभरातील जन्म, मृत्यूंची एकत्रितरित्या नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा झाला. या माहितीमुळे शिक्षण, आरोग्यसेवा आणि कल्याणकारी योजना आखण्यासाठी आणि राबवण्यासाठी या माहितीचा उपयोग होईल.
या माहितीचा सरकारी कामासाठी उपयोग झाला तर उत्तम आहे. मात्र, एवढ्या नागरिकांची ही वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्याची जबाबदारी ही सरकारवर आहे. तेव्हा याबाबत सरकारचे धोरण, योजना ही स्पष्ट असणं अत्यावश्यक आहे.