भारतातल्या पांडूलिपी साहित्याचं संवर्धन, जतन आणि प्रसार करण्यासाठी भारत सरकारने ‘ज्ञान भारतम्’ या डिजिटल पोर्टलची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजी या पोर्टलचं लोकार्पण करण्यात आलं. या पोर्टलच्या माध्यमातून भारतातले प्राचीन पांडूलिपी साहित्य डिजिटल स्वरुपात जतन केलं जाणार आहे.
या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून भारतातील पांडूलिपी स्वरुपातील साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचवून या साहित्याला सुरक्षित करणं असा उद्देश आहे. दिल्ली इथल्या विज्ञान भवनामध्ये ‘ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय संमेलन’ सुरू आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने या 11 ते 13 सप्टेंबर असं तीन दिवसीय संमेलनाचं आयोजन केलं आहे. तर जाणून घेऊयात काय आहे पांडूलिपी साहित्य आणि कसं असणार आहे ‘ज्ञान भारतम्’ पोर्टल.
पांडूलिपी म्हणजेच हस्तलिखित साहित्य
पांडूलिपी असं म्हणताच आपल्याला ही एखादी प्राचीन भाषा असावी असं वाटेल, मात्र पांडूलिपी हे भाषा नाही. तर, प्राचीन भारतात जे- जे साहित्य हाताने लिहून निर्माण केलं गेलं त्याला पांडूलिपी असं म्हटलं जातं. मराठी मध्ये या साहित्याला ‘हस्तलिखित’ असा शब्द वापरला जातो.
छपाई तंत्रांचा शोध लागण्यापूर्वी जो मजकूर, साहित्य, पत्रं दगडावर, ताम्रपटावर, कापडांवर लिहून निर्माण केली त्याला हस्तलिखित म्हणून संबोधलं जातं. हा शब्द ‘पांडू’ (पिवळा किंवा पांढरा) आणि ‘लिपि’ (लिहिणे) या संस्कृत शब्दांपासून बनला आहे, ज्याचा अर्थ एका विशिष्ट पृष्ठभागावर लिहिलेला ग्रंथ असा आहे. भारतात उपलब्ध असलेल्या अनेक जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाची पाने सापडली आहेत, जी पांडू लिपी स्वरूपात आहेत.
'ज्ञान भारतम्' देश की भावी पीढ़ियों के साथ ही विश्व को भारत का एक अनमोल उपहार है। नई दिल्ली में इससे जुड़े अंतर्राष्ट्रीय सम्मेलन का हिस्सा बनकर बहुत प्रसन्नता हुई है। pic.twitter.com/w33D6JOzJS
— Narendra Modi (@narendramodi) September 12, 2025
‘ज्ञान भारतम्’ पोर्टल कसं असणार?
‘ज्ञान भारतम्’ हा एक डिजिटल पोर्टल आहे. जिथे भारतातलं प्राचीन हस्तलिखित साहित्याचं जतन केलं जाणार आहे. हे सर्व साहित्य डिजिटल स्वरुपात रुपांतरीत करुन ते सामान्य वाचकांपर्यंत पोहोचविलं जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून प्राचिन हस्तलिखित साहित्याची नोंदणी आणि दस्ताऐवजीकरण केलं जाणार आहे. दुर्मिळ आणि जीर्ण झालेल्या ग्रंथांचं संरक्षण करुन पूनर्निर्मिती केली जाणार आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन हे साहित्य डिजिटलमध्ये रुपांतरीत केलं जाणार आहे. अशाप्रकारे या राष्ट्रीय साहित्याची जपणूक केली जाईल. या साहित्याचं अनुवादन, प्रकाशन आणि शोधाला प्रोत्साहन दिलं जाईल. या क्षेत्रातले संशोधक, शिक्षक आणि जतन करणाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाईल. शिक्षणामध्ये हस्तलिखितांविषयीची माहिती एकत्र करुन ते सादर केलं जाईल. तसेच जागतिक पातळीवर विविध देशांशी करार करुन हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविलं जाईल.
पारंपारिक ज्ञान पूर्नस्थापित करणे
सांस्कृतिक मंत्रालयाच्या या तीन दिवसीय संमेलनामध्ये देश – विदेशातील 1,100 साहित्यकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये साहित्य क्षेत्रातील विद्वान, संस्था आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांनी भारतातल्या या प्राचीन ग्रंथांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी उपयुक्त सूचना दिल्या. 2047 च्या विकसीत भारतामध्ये भारतातील या प्राचीन साहित्याची कशाप्रकारे पूर्ननिर्मिती करता येईल, हे सर्व ज्ञानाचं भांडार कसं जपता येईल, पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल याविषयीचे विचार स्पष्ट केले.