अनेकदा आरोग्य विम्याचा दावा करायचा असेल तर रुग्णाला कमीतकमी 24 तास हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होणं बंधनकारक होतं. तरच तुम्ही आरोग्यविम्यावर दावा करु शकत होतात. मात्र, आता सरकारने आणि काही आरोग्यविमा कंपन्यांनी ही अट रद्द केली आहे. त्यामुळे तुम्ही काही ठराविक उपचारांसाठी दोन तास जरी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असाल तरी, तुम्हाला आरोग्य विम्यासाठी दावा करता येणार आहे.
आधुनिक उपचार पद्धतीशी सुसंगत बदल
सरकारने आणि काही आरोग्य विमा कंपन्यांनी बदलत्या उपचार पद्धतीचा आढावा घेऊन हा बदल केला आहे. पूर्वी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एखाद्या आजारावर उपचार घेताना जर काही सर्जरी करावी लागली तर त्यासाठी फार वेळ लागायचा. त्यामुळे 24 तासाची अट योग्य होती.
मात्र, आज अनेक सर्जरींसाठी खूप कमी वेळ लागतो. काही वेळेला 2 तासातही सर्जरी पूर्ण होतात. त्यानंतर रुग्णाला घरी पाठवलं जातं. या सर्जरीसाठी वेळ जरी कमी लागत असला, तरी उपचार खर्च हा जास्त असतो. मात्र, यापूर्वी कमी कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होतात हे कारण देऊन विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा टाळला जायचा. त्यामुळे रुग्णाचं मोठं नुकसान व्हायचं. पण आता तसं होणार नाही. तुम्ही उपचारांसाठई केवळ दोन तासही हॉस्पिटलमध्ये दाखल असाल आणि तुमच्यावर काही सर्जरी वा तत्सम उपचार झाले असतील तरी तुम्हाला आरोग्यविम्यावर दावा करता येईल.
आता 24 तास नाही फक्त 2 तास हॉस्पिटलायझेशन
पूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा अँजिओग्राफीसारख्या उपचारांसाठी पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागायचं. मात्र, आज वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हे सर्व उपचार काही तासाच पूर्ण होतात. हे ध्यानात घेऊन, अनेक विमा कंपन्यांनी त्यांच्या विमा पॉलिसीमध्ये 2 तासांच्या हॉस्पिटलायझेशनलाही कव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पूर्ण 24 तास हॉस्पिटलमध्ये न थांबल्यामुळे कोणत्याही रुग्णाला विम्याचा लाभ नाकारला जाऊ नये हा या मागचा उद्देश आहे.
हे ही वाचा : वृद्धांना आरोग्यविम्याचा आधार
रुग्णांना मोठा दिलासा
मोतीबिंदू, डायलिसीस, पित्ताशयातील खडे काढणे, केमोथेरेपी, अँजिओग्राफीसारखे उपचार हे खूप खर्चिक असतात. मात्र, या उपचारांसाठी वेळ कमी लागायचा म्हणून हॉस्पिटलकडून या रुग्णांना उपचार पूर्ण झाल्यावर घरी पाठवलं जायचं. परिणामी, विमा कंपन्यांच्या 24 तासाच्या अटीमुळे या रुग्णांना विम्यावर दावा ही करता यायचा नाही. त्यामुळे त्यांना हे पैसे भरावे लागायचे. याशिवाय वर्षाला विम्याचा हफ्ता ही भरावा लागायचा. एकूणच अशा रुग्णांचा वार्षिक आरोग्य खर्च हा वाढायचा.
मात्र, सरकारच्या आणि आरोग्य विमा कंपन्यांच्या या एकत्रित निर्णयामुळे आता अशा रुग्णांच्या आरोग्य खर्चात बचत होईल. त्यांना खऱ्या अर्थाने आरोग्य विम्याचा लाभ घेता येईल.
कोणत्या विमा कंपन्या देतात हा लाभ
सध्या तीनच आरोग्य विमा कंपन्यांनी ही सुविधा सुरू केली आहे.
1 – आयसीआयसीआय लोम्बार्ड एलिवेट प्लॅन – 10 लाख रुपयाचं कव्हर, 30 वयोवर्षाखालील व्यक्तीसाठी वार्षिक प्रीमीयम 9 हजार 195 रुपये.
2- केअर सुप्रीम हेल्थ इन्शुरन्स – 10 लाखाचं कव्हर, प्रीमीयम 12 हजार 790 रुपये.
3 – नीवा बूपा हेल्थ इन्शुरन्स – 10 लाख रुपयांचा कव्हर प्लॅन प्रीमीयम, 14 हजार 199 रुपये.