कोणत्याही देशातील दीर्घकाळ चाललेल्या सर्वकष युद्धाची सर्वात जास्त झळ त्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्यांना, संरक्षण दलातील लोकांना, त्यांच्या कुटुंबीयांना, सीमेलगतच्या गावांना / शहरांना, ज्याठिकाणी शत्रूचे बॉम्ब आणि मिसाईल पडतात तेथील लोकांना बसत असते. ज्याची रुपयातील किंमत कधीच काढता येणार नाही. त्याच बरोबर त्या देशाच्या स्थूल / मॅक्रो अर्थव्यवस्थेवर गंभीर आघात होतो. देशाची जीडीपी, व्याजदर, महागाई, परकीयचलन साठे अशा अनेक गोष्टींवर परिणाम होतो.
शेयर बाजारावर परिणाम होतो का?
सेन्सेक्स गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी 400 अंकांनी आणि शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी 880 अंकांनी खाली आला आहे. अनेक कारणे आहेत. महत्वाचे कारण आहे: अनिश्चितता!
शेअर मार्केट सर्वात अस्वस्थ कशामुळे होत असेल तर ते भविष्यकाळाबद्दलच्या अनिश्चिततेमुळे. आणि हे समजण्यासारखे आहे. कारण शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार भविष्यात आपल्याला किती नफा मिळवता येईल या एकमेव निकषावर गुंतवणुकी करायच्या की नाही, करायच्या तर किती करायच्या हे ठरवत असतात.
शेयर मार्केटमधील अस्वस्थता भय निर्देशांकात Volatility Index (VIX) मोजला जातो. काही दिवसापूर्वी 15 च्या आसपास असणारा हा निर्देशांक ऑपरेशन सिंदूर नंतर 21 वर पोहचला आहे. (जास्त निर्देशांक जास्त अस्वस्थता).
शेअर मार्केट लवकर सावरते
युद्धामुळे स्थूल अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामातून बाहेर येण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना अपेक्षित यश मिळण्यासाठी दीर्घकाळ जावा लागतो. शेयर मार्केटचं तसं नाही. इतिहास असं सांगतो की, शेयर मार्केट युद्धानंतर लगेच सावरते आणि अनेक वेळा वधारते.
कारण एकूण अर्थव्यवस्थेत वस्तुमाल, सेवा पुरवणाऱ्यांच्या तुलनेत शेयर मार्केटमध्ये लिस्टेड झालेल्या कंपन्या संख्येने खूपच मूठभर असतात. शेयर मार्केट या लिस्टेड झालेल्या कंपन्यांची विक्री आणि नफा यांच्यावर युद्धाचा काय परिणाम झाला किंवा होऊ शकेल एवढ्या पुरताच इंटरेस्टेड असते. शेयर मार्केटला सामान्य लोकांच्या हाल अपेष्टांशी काही देणं घेणं नसतं.
एक बेसिक वैश्विक सत्य लक्षात ठेवूया. आपल्याला वाटते की, वस्तुमालाचा ग्राहकांमध्ये खप झाला की नवीन वस्तुमालाची मागणी वाढते. पण तो मागणीचा एक स्रोत झाला. वस्तुमालाचा विध्वंस झाला, नाश झाला तरी देखील नवीन वस्तुमालाची मागणी वाढत असते. आणि युद्धात नेमकं हेच होते.
दुसरे वैश्विक सत्य हे की, आपण उत्पादन करीत असलेल्या वस्तुमालाची मागणी नक्की कशामुळे आली आहे याबद्दल औद्योगिक/वित्त भांडवलाला काही देणे घेणे नाही. कशाबद्दल म्हणजे कशाही बद्दल नाही. माणसाने अनेक एन्टिटी तयार केल्या आहेत. पण त्या सर्वांमध्ये वित्त भांडवलाएवढी हृदयशून्य एन्टिटी दुसरी नसेल.
त्यामुळे युद्धानंतर मोठ्या कंपन्या उत्पादन करीत असलेल्या अनेक वस्तूमालाला नव्याने मागणी तयार होते. त्यामुळे शेयर मार्केट सावरते आणि वधारते देखील.
हे ही वाचा : सिंधूचा प्रवाह रोखणं भारताला महागात पडेल का?
युद्धजन्य काळात कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात
ज्यावेळी आपण म्हणतो की सेन्सेक्स कोसळला किंवा वधारला त्यावेळी जरुरी नाही की शेअर मार्केट वरील सर्वच कंपन्या एकाच तीव्रतेने कोसळतील किंवा वधारतील. कोणत्या क्षेत्रातील कंपन्यांवर युद्धाचा विधायक किंवा विपरीत परिणाम होईल याचा अंदाज घेत गुंतवणुकी केल्या जातात. उदा. संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपन्या.
सेन्सेक्स हा 30 कंपन्यांच्या शेअर्सचा पॅक आहे. ते पत्ते पिसल्यासारखा अधूनमधून पिसला जातो. 20 वर्षापूर्वी सेन्सेक्स पॅक मध्ये ज्या कंपन्या होत्या त्यामध्ये बरेच बदल झाले आहेत.
त्याशिवाय देशातील केंद्रीय बँक, आपली रिझर्व बँक, शेयर मार्केट सावरण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावत असते. कर्जाचा, पैशाचा पुरवठा, व्याजदर अशी उपाययोजनांच्या माध्यमातून शेअर मार्केट स्थिर केला जातो.