जून महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे आता आयटीआर फाईल रिटर्न्सच्या तयारीला सुरुवात करावी लागणार आहे. या तयारीचा पहिलाच टप्पा आहे तो म्हणजे फॉर्म 16 मिळवणं. तर समजून घेऊयात काय आहे फॉर्म 16, तो कुठे आणि कधी मिळतो आणि त्याचं करायचं काय?
फॉर्म 16 काय असतो?
फॉर्म 16 यालाच टीडीएस म्हणजे ( Tax Deducted at source ) असं म्हटलं जातं. या टीडीएस सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला मिळणारा वार्षिक पगार, कर कपातीसाठी निवडलेली करपद्धत कर्मचाऱ्याने पगाराच्या उत्पन्नातून दावा केलेल्या वजावटीची आणि सूट याची माहिती दिलेली असते. त्यामुळे इन्कम टॅक्स भरताना हे प्रमाणपत्र अत्यावश्यक असते.
फॉर्म 16 कधी मिळतो?
हा फॉर्म 16 वा टीडीएस सर्टिफिकेट हे आपल्याला कंपनीकडून मिळते. इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार, कंपन्यांना त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा चालू आर्थिक वर्षाचा शेवटच्या तिमाहीतला म्हणजे जानेवारी ते मार्च महिन्याचा ई-टीडीएस मे 31 पर्यंत भरावा लागतो. ई-टीडीएस भरल्यावर पुढच्या 15 दिवसांमध्ये ( 15 जूनपर्यंत) कर्मचाऱ्यांना हे टीडीएस सर्टिफिकेट द्यावं लागतं.
कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वतीने टीडीएसच्या माध्यमातून अधिकृत अशी कर कपात केलेली असते. त्यामुळे या करकपातीसंदर्भातलं हे टीडीएस सर्टिफिकेट 15 जूनपर्यंत कंपनीने कर्मचाऱ्यांना देणं अनिर्वाय आहे. जर कंपनीने हे सर्टिफिकेट कर्मचाऱ्यांना वेळेत दिलं नाही तर कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाई शकते. नियमांनुसार, अशा प्रकरणात कंपनीकडून प्रती दिवस 500 रुपये दंड आकारला जातो. यानुसार, जितक्या कर्मचाऱ्यांचं सर्टिफिकेट कंपनीने दिलेलं नसेल तितक्या कर्मचाऱ्यांनुसार प्रति कर्मचारी 500 रुपये दंड कंपनीला भरावा लागतो. ही दंडाची रक्कम कर्मचाऱ्याला मिळत नाही तर ती कंपनीला थेट केंद्र सरकारच्या खात्यात भरावी लागते.
फॉर्म 16 शिवाय आयटीआर भरता येतो का?
फॉर्म 16 शिवाय आयटीआर फाईल करता येतो. पण तुमच्याजवळ जर फॉर्म 16 असेल तर ही प्रक्रिया सोपी आणि जलद होते. फॉर्म 16 मिळाल्यावर आयटीआर फाईल करताना तुम्हाला इतर कोणती कागदपत्रे जमा करावी लागत नाहीत. पण, जर तुम्ही फॉर्म 16 शिवाय आयटीआर फाईल करत असाल तर मग तुम्हाला सॅलरी स्लीप, अॅन्यूएल इन्फार्मेंशन स्टेटमेंट आणि फॉर्म 26एएस द्यावा लागतो.
इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरुन टीडीएस सर्टिफिकेट परस्पर डाऊनलोड करता येतो का?
कर्मचारी हे इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरुन परस्पर पॅनकार्डचा वापर करुनही टीडीएस सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकत नाही. फक्त कंपनीचं हे सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकते. कारण या सर्टिफिकेटमध्ये
कंपनीसुद्धा TRACES पोर्टलवरुन सर्टिफिकेट डाऊनलोड केल्याशिवाय कर्मचाऱ्यांना देऊ शकत नाही.
फॉर्म 16 हा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळतो
ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कर कपात केली जाते त्याच कर्मचाऱ्यांना कंपनी फॉर्म 16 देते. आर्थिक वर्ष 2024 – 2025 मधल्या आयकर नियमांनुसार, कर्मचाऱ्यांनी नवीन कर प्रणाली निवडली असेल आणि करपात्र रक्कम 12 लाखाहून जास्त नसेल तर त्या कर्मचाऱ्यांला कर भरावा लागत नाही. तसंच जर का कर्मचाऱ्यांने जूनी कर पद्धत निवडली असेल तर आणि करपात्र रक्कम ही 5 लाखापेक्षा जास्त नसेल तर त्याही अतिरिक्त रकमेवर कर लागत नाही. त्यामुळे कंपनीला ही कर कपात करता येत नाही.
या नियमांनुसार तुमचा वार्षिक पगार आणि तुम्ही कोणती कर पद्धत निवडली आहे, यानुसार जर तुम्ही कर पात्र नसाल तर कंपनी फॉर्म 16 देत नाही.
एकूणच फॉर्म 16 हा तुमच्या पगारातून किती कर कापला गेला हे दर्शवणारं सर्टिफिकेट असतं. पण जर तुमचा पगार कमी असेल तर त्यावर कर कापला जात नाही. त्यामुळे कंपनी तुम्हाला टीडीएस सर्टिफिकेट द्यायला बांधिल असू शकत नाही. पण काही वेळेला कंपनी ही आपल्या कर्मचाऱ्यांना शून्य टीडीएस फॉर्म 16 देत असते. हे शून्य टिडीएस सर्टिफिकेट द्यायचं की नाही हा सर्वस्वी त्या कंपनीचा निर्णय असतो.
हेही वाचा : UPI ट्रान्जेक्शनवरही भरावा लागणार कर!
फॉर्म 16 मध्ये काय तपासायचं असतं?
फॉर्म 16 मध्ये दोन भाग असतात पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए मध्ये कर्मचारी आणि कंपनीची माहिती दिलेली असते. यामध्ये तुमचं आणि कंपनीचं नाव, पत्ता, पॅन कार्डची माहिती, टॅन कार्ड (टॅक्स डिडक्शन आणि कलेक्शन अकाऊंट नंबर) आणि आर्थिक वर्षातल्या चार तिमाहीमध्ये किती कर कापला गेला याची माहिती दिलेली असते.
पार्ट बी मध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांला आर्थिक वर्षामध्ये दिलेला एकून पगाराची रक्कम नमूद केलेली असते. कर्मचाऱ्यांने कोणती कर पद्धत निवडलेली आहे, त्यानुसार पगारावर किती कर कपात केली आहे आणि कर्मचाऱ्याने पगाराच्या उत्पन्नातून दावा केलेल्या वजावटीची आणि सूट याची माहिती दिलेली असते. या दोन्ही कागदपत्रांवर ( पार्ट ए आणि पार्ट बी) वर TRACES चा लोगो असणं अनिर्वाय असतं.
फॉर्म 16 साठी पासवर्ड काय असतो?
फॉर्म 16 हा पासवर्डने सुरक्षित केलेला असतो. तुम्हाला कंपनीकडून आलेल्या मेलमध्ये तुम्हाला दिलेला फॉर्म 16 ला पासवर्ड आहे की नाही हे दिलेलं असतं. हा पासवर्ड तुमचा पॅन कार्ड नंबर (इंग्रजी कॅपिटल किंवा लोअर केस), तुमच्या वाढदिवसाची तारीख (DD/MM/YY) किंवा तुमचा पॅन कार्ड आणि वाढदिवस असं एकत्रीत ही असू शकतो.
एका आर्थिक वर्षासाठी तुम्हाला दोन फॉर्म 16 मिळतात का?
जर तुम्ही एका आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 दरम्यान नोकरी बदलली असेल तर मग तुम्हाला वेगवेगळे फॉर्म 16 मिळतात. या संपूर्ण आर्थिक वर्षात तुम्ही एकदा असो दोनदा असो की तीनदा तुम्हाला त्या त्या कंपनीकडून वेगवेगळे फॉर्म 16 दिले जातात.