आपल्यापैकी अनेकजण यावेळेस पहिल्यांदाच आयटीआर फाईल करणार असाल, आणि इन्कम टॅक्स भरण्याची प्रक्रिया ही खूप जटील असणार असा आपला समज असेल. तर तसं मुळीच नाही. थोडा संयम आणि आवश्यक ती कागदपत्रे आधीपासूनच तुम्ही तयार ठेवली तर मग तुम्ही ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करु शकता.
आयटीआर कोणाला दाखल करावा लागतो?
तुमचं वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असलं तरीही, तुम्हाला आयटीआर दाखल करणं आवश्यक आहे:
- जर तुम्ही बँक खात्यात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल.
- जर तुमचा परदेश प्रवासावर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला असेल.
- जर तुमचा वीज वापर वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
आर्थिक व्यवहारांमध्ये सुस्पष्टता आणि पारदर्शकता राहावी यासाठी विभागाने हे निकष दिले आहेत.
तुम्ही कर मर्यादेपेक्षा कमी असला तरीही तुम्ही आयटीआर दाखल करावा का?
अनेकदा आपला पगार कमी आहे, त्यावर कर लागत नाही तर मग का आयटीआर दाखल करावा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. पण करपात्र मर्यादेपेक्षा जरी कमी उत्पन्न असलं तरीही आयटीआर दाखल न करणे ही एक चूक आहे. आयटीआर हा केवळ कर भरण्यासाठी दाखल केला जात नाही. तर तुमच्याबद्दल आर्थिक विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आयटीआर दाखल केल्याने सरकारकडे आर्थिक रेकॉर्ड तयार होतो. तसेच वित्तीय संस्थांमध्ये विश्वासार्हता निर्माण होते. जसं की, तुम्ही बँकेमध्ये कर्ज घ्यायला गेलात आणि तुम्ही दरवर्षी आयटीआर फाईल करता ते दाखवलं तर कर्ज घेताना ती तुमची जमेची बाजू ठरते. परदेशात फिरण्यासाठी, वा शिक्षणासाठी जात असतानाही व्हिसा प्रक्रियेवेळी आयटीआरची विचारणा होते. जर तुम्ही कर भरणा करण्याची ही प्रक्रिया करत असाल तर तुम्ही आर्थिक बाबतील सतर्क आसून पारदर्शक आहात असा तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होतो.
हेही वाचा: आयटीआर रिटर्न्ससाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ
आयटीआर दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
आयटीआरजी प्रक्रिया करायला सुरुवात करण्याआधी मागच्या लेखात सांगितल्यानुसार आवश्यक असलेली सगळी कागदपत्रे तुमच्याजवळ तयार ठेवा.
- पॅन आणि आधार कार्ड
- फॉर्म 16
- बँक खात्याची माहिती
- गुंतवणुकीचा पुरावा (80 C, 80 D सारख्या कलमांखालील वजावटीसाठी)
- बँका किंवा पोस्ट ऑफिसमधील व्याज प्रमाणपत्रे
आयटीआर दाखल करण्यासाठी चरण-दर-चरण मार्गदर्शक
पहिल्यांदा ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणी करा. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जायचं आहे. त्या पोर्टलची लिंक – https://www.incometax.gov.in/iec/foportal
पोर्टलवर गेल्यावर ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा आणि ‘व्यक्तीगत’ निवडा. मग तुमचा पॅनकार्ड नंबर तिथे द्यायचा आहे. हाच पॅनकार्ड क्रमांक तुमचा युजर आयडी असणार आहे. त्यानंतर तिथे विचारलेली माहिती तुम्हाला देत जायचं आहे. अशा पद्धतीने तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसऱ्या टप्पा – तुमची नोंदणी झाल्यावर तुमच्या खात्यात लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुमचा पॅनकार्ड क्रमांक युजर आयडी आणि नोंदणी दरम्यान सेट केलेला पासवर्ड वापरायचा आहे. आणि मग कॅप्चा तपासणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
तिसऱ्या टप्यामध्ये ‘इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करा’ हा पर्याय निवडायचा आहे. ‘ई-फाइल’ मेनूवर जाऊन ‘फाइल इन्कम टॅक्स रिटर्न’ वर क्लिक करायचं आहे. योग्य मूल्यांकन वर्ष निवडायचं आहे. (उदा., 2024-25 आर्थिक वर्षासाठी 2025-26). फाइलिंगचा मार्ग म्हणून ‘ऑनलाइन’ हा पर्याय निवडा.
चौथ्या टप्यामध्ये आयटीआर फॉर्मची निवड करायची आहे. बहुतेक पगारदार व्यक्तींसाठी, आयटीआर-1 (सहज) लागू आहे. जर तुमचे उत्पन्न अनेक स्रोतांमधून असेल, जसे की भांडवली नफा, तर आयटीआर-2 किंवा आयटीआर-3 हे पर्याय निवडू शकता.
पाचव्या टप्यात आवश्यक तो तपशील भरायचा आहे. तुमची वैयक्तिक माहिती जसं की नाव, पत्ता, संपर्क आदी. फॉर्म 16 आणि इतर स्रोतांमधून उत्पन्नाचे तपशील. विविध कलमांखालील वजावट (उदा., 80 सी, 80 डी). आणि कर परतफेडीसाठी बँक खात्याचे तपशील.
शेवटच्या सहावा टप्पा – या टप्यामध्ये तुम्ही दिलेली संपूर्ण माहिती पुन्हा एकता नीट तपासून घ्यायची आहे. त्यानंतर सबमिट या बटणवर क्लिक करायचं आहे.
तुमचा आयटीआर कसा पडताळायचा
फाईल सबमिट केल्यावर तुम्ही ही प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी पुढील पर्याय आहेत. 1 ) आधार ओटीपी द्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासायचं आहे. 2) इंटरनेट बँकिंगद्वारे आणि 3) बेंगळुरूमधील सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) ला ITR-V ची स्वाक्षरी केलेली डिजीटल प्रत पाठवून.
आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत
आर्थिक वर्ष 25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी, आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या तारखेनंतर दाखल केल्यास दंड होऊ शकतो.