तुम्ही कधी विचार केलाय का, शिक्षित असूनही नोकरी का मिळत नाही? किंवा ‘डिग्री असूनही कामाच्या ठिकाणी ती का उपयोगाची ठरत नाही? भारतात युवा वर्गाची संख्या प्रचंड मोठी आहे. पण हीच तरुणाई नोकरीच्या शोधात हवालदिल होत आहे. शिक्षण असलं तरीही नोकरी का मिळत नाही, हे प्रश्न आज अनेक तरुणांच्या मनात आहेत.
भारतामध्ये जवळपास 80 कोटींहून अधिक लोक 35 वर्षांखालील गटात येतात. ही आपल्या देशाची ‘डेमोग्राफिक डिव्हिडेंड’ म्हणजे आर्थिक वाढीसाठी संधी मानली जात होती. पण आता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही स्थिती का निर्माण झाली?
शिक्षण आणि नोकरीमधील अंतर
भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवीधर होतात. पण नोकरी क्षेत्रात त्यांना काम मिळत नाही किंवा त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी दर्जाची कामे करावी लागतात. आणि हे फक्त कला किंवा वाणिज्य शाखेत घडतं असं नाही, तर 40-50 टक्के इंजिनिअरिंग पदवीधरही बेरोजगार आहेत.
याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षणपद्धती आणि कंपनींच्या गरजांमध्ये असलेली मोठी तफावत. आजही शाळा आणि कॉलेजमध्ये जुन्या अभ्यासक्रमांवर शिक्षण दिलं जातंय. पण बाहेर नोकरीच्या बाजारात रोज नव्या स्किल्स आणि तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे.
ए.आय. क्रांती आणि नवा धोका
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानामुळे नोकरीत मोठे बदल होत आहेत. एका संशोधनानुसार, जगातल्या 70% नोकऱ्यांवर ए.आय.चा परिणाम होणार आहेतर 30% कामे पूर्णपणे स्वयंचलित होतील. त्यामुळे जुन्या नोकऱ्या हळूहळू नाहीशा होतील आणि त्या जागी एआयशी संबंधित नवीन नोकऱ्या तयार होतील.
आजचे अभ्यासक्रम आणि उद्याची मागणी
आपला शिक्षणाचा अभ्यासक्रम दर तीन वर्षांनी एकदाच बदलतो. यामुळे, जोपर्यंत विद्यार्थी शिकून बाहेर पडतात, तोपर्यंत त्यांना आवश्यक असलेले ज्ञान जुने झालेले असते. त्यामुळे, आता आपल्या मुलांना फक्त जुन्या गोष्टी शिकवून चालणार नाही, तर त्यांना नवीन कौशल्य, क्रॉस-स्किलिंग आणि री-स्किलिंग शिकवणं गरजेचं आहे.
दहावी-बारावीनंतरचा गोंधळ
फक्त कॉलेज नाही, तर दहावी-बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा यावरही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. भारतातील 93% विद्यार्थ्यांना फक्त डॉक्टर, इंजिनिअर, वकील , शिक्षक अशा मोजक्याच करिअर पर्यायांबद्दल माहिती असते. खरंतर, आताच्या आधुनिक जगात 20 हजारपेक्षा जास्त करिअर पर्याय उपलब्ध आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत करिअरबद्दल योग्य मार्गदर्शन मिळत नाही. शाळांमध्ये फक्त 7% विद्यार्थ्यांना फक्त शाळेत करिअर मार्गदर्शन मिळते.
यामुळे आपले अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या आवडीनुसार नव्हे, तर फक्त इतरांचे अनुकरण करून पुढच्या अभ्यासाची निवड करतात. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार, 65 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी अशा पदव्या घेतात, ज्या त्यांच्या आवडीच्या नसतात.
आजकाल शिक्षणासाठी मोबाईल, इंटरनेट, स्मार्ट क्लासरूम उपलब्ध आहेत. पण तरीही, आपल्या शाळांमध्ये आजही जुन्या, परीक्षा-केंद्रीत पद्धतीवर भर दिला जातो. प्रत्यक्षात कामासाठी लागणाऱ्या कौशल्यांकडे दुर्लक्ष होते.
सरकारी योजना आणि त्यांचा परिणाम
भारत सरकारने स्किल इंडिया, प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY), प्रधानमंत्री युवा योजना (PMYY) अशा अनेक योजना राबवल्या. पण अपेक्षित असा परिणाम दिसला नाही. भारताला खरोखरच एक सुसंगत आणि एकात्मिक धोरणाची गरज आहे. जे शिक्षण आणि कौशल्य विकास उद्योगांच्या मागणीनुसार असेल. सरकार, खासगी क्षेत्र आणि शिक्षण संस्था यांनी एकत्र येऊन काम करणे आता आवश्यक आहे.
‘युवा असंतोष’ एक मोठा धोका
भारतामध्ये साक्षर लोकसंख्या जास्त असली, तरी रोजगारक्षम तरुणांची संख्या कमी आहे. हा एक मोठा सामाजिक धोका आहे. 1990 च्या दशकात झालेल्या मंडल आयोगाच्या आंदोलनांनी हे दाखवून दिले आहे की, जर तरुणांना संधी मिळाली नाही तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते
ही समस्या सुटू शकते, फक्त त्यासाठी शिक्षणातील जुन्या पद्धतीत बदल करावे लागतील. आणि नव्या नोकऱ्यांसाठी योग्य कौशल्यं, करिअर गाईडन्स, कंपन्यांच्या मागणीप्रमाणे कोर्सेस आणि इंडस्ट्री-शिक्षण दिलं गेलं पाहिजे.