संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 21 जुलै 2025 पासून सुरूवात झाली आहे. 21 ऑगस्ट 2025 पर्यंत हे अधिवेशन सुरू असणार आहे. पहलगाम इथे झालेला दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर यासारख्या महत्त्वपूर्ण घटनांनंतर होणारं हे पहिलं पूर्ण अधिवेशन असणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात पुन्हा एकदा सीमाभागातील सुरक्षा यासारखे मुद्यांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वूभूमीवर मणिपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या मुदतवाढीला मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या ठरावावरही चर्चा होणार आहे.
पावसाळी अधिवेशनातील महत्त्वपूर्ण विधेयकं
या अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण अशा 17 कायदेविषयक विधेयकांवर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये बिल ऑफ लॅडिंग बिल, 2024, सी बिलद्वारे वस्तूंची वाहतूक, 2024, कोस्टल शिपिंग विधेयक, 2024, व्यापारी शिपिंग विधेयक, 2024, भारतीय बंदरे विधेयक, 2025, आयकर विधेयक, 2025, कर कायदा (सुधारणा) विधेयक, 2025, भू -वारसा स्थळे आणि भू-अवशेष (संरक्षण आणि देखभाल) विधेयक, 2025, खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) सुधारणा विधेयक, 2025, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक, 2025, राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक सुधारणा विधेयक, 2025 अशा विधेयकांचा समावेश आहे.
तर मणिपूर संदर्भात आर्थिक विधेयक (2025-26 च्या अनुदान मागण्या (मणिपूर) वर चर्चा आणि मतदान आणि संबंधित विनियोग विधेयकाची ओळख आणि मणिपूर राज्याच्या संदर्भात भारतीय संविधानाच्या कलम 356(1) अंतर्गत 13 फेब्रुवारी 2025 रोजीपासून लागू असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीच्या मुदतवाढीला मान्यता देण्याची मागणी करणारा ठरावावर चर्चा केली जाणार आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षिय बैठक
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (20 जुलै 2025 रोजी) संसदिय कामकाज मंत्री किरण रिजीजू यांनी सर्वपक्षिय बैठकीचं आयोजन केलं होतं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत संसदेतील 40 राजकीय पक्षाचे 54 खासदार सहभागी झाले होते.
दरम्यान, अधिवेशनाचा कालावधी हा 21 जुलै ते 21 ऑगस्ट असा पूर्ण एक महिना असणार आहे. मात्र, सगळ्या खासदारांना स्वातंत्र्यदिनानिमित्त आपापल्या मतदारसंघात जायचं असतं त्यामुळे संसदेची दोन्ही सभागृह हे 12 ऑगस्ट रोजी तहकूब करुन पुन्हा 18 ऑगस्ट रोजी अधिवेशन सुरू केलं जाईल. तसेच अधिवेशनाच्या या संपूर्ण 32 दिवसांमध्ये 21 बैठका आयोजित केल्या जातील, अशी माहिती जे.पी. नड्डा यांनी दिली.