भारतातले अतिश्रीमंत लोकं आजही रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात. जागतिक इक्विटी रिसर्च अँड ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनच्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे. या अहवालामध्ये देशातल्या संपत्तीमध्ये असलेली असमानता ही समोर आली आहे. भारतातील 60 टक्के संपत्ती ही देशातल्या एक टक्के लोकांकडे आहे. घरगुती संपत्तीच्या या अत्यंत केंद्रित स्वरूपामुळे श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत राहणार असं या अहवालात म्हटलं आहे.
भारतातील अतिश्रीमंतांची संपत्तीची गुंतवणूक
भारतातील अतिश्रीमंतांकडे असलेली जवळपास 60 टक्के संपत्ती ही रिअल इस्टेट आणि सोन्यात गुंतवलेली आहे. या अतिश्रीमंतांमध्ये अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स (UHNI), हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स (HNI) आणि श्रीमंत यांचा समावेश आहे. बर्नस्टाईनच्या अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंतांकडे सुमारे 2.7 खरब डॉलर सेवायोग्य मालमत्ता आहे, तर सुमारे 60 टक्के संपत्ती अजूनही रिअल इस्टेट आणि सोन्यात आहे.
भारताच्या एकूण घरगुती मालमत्तेचे मूल्य 19.6 खरब (ट्रिलियन) डॉलर आहे. ज्यापैकी 59 टक्के म्हणजे 11.6 खरब डॉलर्स स्थावर मालमत्ता ही अतिश्रीमंताकडे आहे.
या अतिश्रीमंत लोकांची लोकसंख्या ही फक्त 1 टक्का आहे. या 1 टक्का लोकसंख्येकडे एकूण मालमत्तेचा 60 टक्के हिस्सा आणि देशाच्या आर्थिक मालमत्तेची 70 टक्के मालकी आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींकडे असलेली सुमारे 8.9 खरब डॉलर संपत्ती ही रिअल इस्टेट (स्थावर मालमत्ता), सोने, प्रमोटर इक्विटी आणि चलन यासारख्या अ-सेवायोग्य मालमत्तेच्या स्वरूपात आहे. पारंपारिकपणे हे संपत्ती व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केली जात नाही. तसेच त्यांचं पुनर्वाटप करणं ही कठीण आहे.
अतिश्रीमंतांच्या या एकूण संपत्तीपैकी फक्त 2.7 ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती ही थेट इक्विटी, म्युच्युअल फंड, विमा आणि बँक किंवा सरकारी ठेवींसारख्या सेवायोग्य वित्तीय मालमत्तेत आहे.
अतिश्रीमंतांची संपत्तीचं प्रमाण
भारतात सुमारे 35 हजार अल्ट्रा हाय नेट वर्थ व्यक्ती आहेत ज्यांची एकूण संपत्ती 12 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या अतिश्रीमंत कुटुंबांचे सरासरी उत्पन्न 4.8 दशलक्ष डॉलर आहे. त्यांची सरासरी मालमत्ता 54 दशलक्ष डॉलर आहे. या संपत्तीत 24 दशलक्ष डॉलरच्या आर्थिक मालमत्तेचाही समावेश आहे.
एकत्रितपणे, भारतातील सर्वात श्रीमंतांकडे 4.5 खरब डॉलर्सची आर्थिक मालमत्ता आहे, जी एकूण आर्थिक मालमत्तेच्या जवळपास 70 टक्के आहे.
बर्नस्टाईनच्या अहवालात असंही नमूद केलं आहे की, या अतिश्रीमंत लोकांना त्यांच्या संपत्तीचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करता यावं यााठी सल्ले देण्यासाठी आणि हे प्रत्यक्षात हाताळण्यासाठी भारतीय संपत्ती व्यवस्थापक या क्षेत्राला मोठी मागणी आहे.
योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे, गुंतवणूकीतील क्लिष्ठ पद्धत यासाठी व्यावसायिक सल्लागारांना मागणी आहे. याचा संपत्ती व्यवस्थापन काम करणाऱ्यांना फायदा होत आहे.
येत्या काळात संपत्तीच्या दीर्घकाळ वाढीसाठी विशेष संपत्ती व्यवस्थापकाची नियुक्ती करणं खूप फायदेशीर ठरणार आहे.
सध्या ज्या पद्धतीने या संपत्तीत वाढ होत आहे त्यानुसार येत्या काळात संपत्ती व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये ज्याचा हिस्सा सध्या 11 टक्के आहे, तो 300 अब्ज डॉलर्सवरून 1.6 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढेल. म्हणजे वार्षिक 18 टक्के वाढ होईल, अशी आशा बर्नस्टाईन कंपनीने व्यक्त केली आहे.
भारतातील संपत्तीतील विषमता
अहवालानुसार, भारतात उत्पन्नातील तफावत खूपच मोठी आहे. एक टक्का लोकांकडे एकूण उत्पन्नाच्या 40 टक्के कमाई आहे तर उर्वरित लोकांकडे उत्पन्न आणि मालमत्तेचा एक छोटासा भाग आहे.
एका अभ्यासानुसार, भारतातील उत्पन्न असमानता ही जगात सर्वाधिक आहे. अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक स्तरात जेव्हा वाढ होत जाते तेव्हातेव्हा या एक टक्का लोकांची संपत्ती आणखीन वाढत जाते.