तंदुरूस्त राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण खाण्यावर नियंत्रण म्हणजे डाएट करतात. या डाएटचे वेगवेगळे प्रकार आले आहेत. कोणी दिवसातून फक्त दोन वेळाच खातात, कोणी दर दोन तासांनी प्रथिनेयुक्त पदार्थ खात असतात, कोणी आठवड्यातून दोन दिवस फक्त लिक्विड डाएट करतात, तर कोणी साधा उपवास (अन्न वर्ज्य करण्याचा उपवास) करतात. काहीजण फक्त शाकाहारीच अन्नपदार्थ खातात तर काही जण फक्त मांसाहारचं खायचं असाही डाएट करतात. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार डाएट करुन फीट राहण्याचा प्रयत्न करतात.
या डाएटच्या वेगवेगळ्या प्रकारापैकी इंटरमिडीएट डाएट म्हणजे दिवसातून फक्त एकदा किंवा दोनदाच खाण्याच्या पद्धतीमुळे हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचं समोर आलं आहे. संशोधकांच्या अभ्यासानुसार जरी अधूनमधून उपवास केल्याने काही लोकांना फायदा होऊ शकतो. पण त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्यासह हृदयरोगांचा धोका 135 टक्क्यांनी वाढत असतो. जाणून घेऊयात यामागचं नेमकं कारण काय आहे.
इंटरमिडीएट डाएट पद्धत
इंटरमिडीएट डाएट पद्धतीमध्ये तुम्हाला कोणते अन्नपदार्थ खावेत हे न सांगता दिवसातून किती वेळा आणि कधी खावं हे सांगत असतो. लोकं या डाएट अंतर्गत वेगवेगळ्या खाण्याच्या वेळा पाळतात. एकदा का वेळ निश्चित केली की दररोज त्याचवेळी जेवण करतात. काही जण त्यांचे सर्व जेवण 8, 10 किंवा 12 तासांच्या अंतराने करुन बाकी दिवस काहिही न खात नाहीत.
यामध्ये सामान्यत: 16 – 8 ही पद्धत आहे. ज्यामध्ये 16 तास उपवास करणं आणि 8 तासांच्या आत सर्व जेवण केलं जातं. तर काही जण याच पद्धतीमध्ये दिवसांचा उपवास करतात. म्हणजे आठवड्यातील पाच दिवस ते खातात, आणि दोन दिवस पूर्ण उपवास करतात.
या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या शरिराला पुरेसं अन्न खायला देऊन जास्त वेळ विश्रांची देता. ज्यावेळी शरिराला ऊर्जेची गरज असते त्यावेळी शरीर स्वत:हून साठलेल्या चरबीचा वापर करून ऊर्जा निर्माण करते. यामुळे शरीरात साठलेल्या चरबीचं प्रमाण कमी होतं. तुमचं चयापचन क्रिया सुधारते आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळू शकतं. काहीकांना अशाप्रकारच्या उपवासाचे अल्पावधीत रिझल्ट मिळून त्यांचं वजन नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळते. याशिवाय आरोग्याच्या अनेक तक्रारीही कमी झाल्याचं दिसून येतं.
हे ही वाचा : इंटरमिटंट फास्टिंग: प्राचीन पद्धती ते आधुनिक ट्रेंड
इंटरमिडीएट डाएटचा हृदयाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
डायबिटीज अँड मेटाबॉलिक सिंड्रोम या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात अधूनमधून उपवास केल्याने हृदयावर कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
संशोधकांनी आठ वर्षांपर्यंत अमेरिकेतील प्रौढ नागरिकांच्या आरोग्याचा अभ्यास केला. या प्रौझ व्यक्तिंनी सुमारे दोन आठवड्यांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या दिवशी जे काही खाल्ले आणि प्यायले ते त्यांना आठवयला सांगितलं. या माहितीचा वापर करून, शास्त्रज्ञांनी प्रत्येक व्यक्तीच्या सरासरी खाण्याच्या कालावधीचा अंदाज काढला आणि तो त्यांच्या दीर्घकालीन सवयींचं प्रतिनिधित्व म्हणून वापरला. यातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. जवळपास 19 हजारहून अधिक प्रौढ व्यक्तिंच्या माहितीचं विश्लेषण करताना संशोधकांना असं आढळून आलं की, जे लोक आठ तासांच्या अंतराने जेवतात त्यांना 12 ते 14 तासांच्या अंतराने जेवण करणाऱ्या लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या हृदयरोगांमुळे मृत्यू होण्याचा धोका 135 टक्के जास्त असतो.
संशोधकांनी कर्करोग आणि एकूण मृत्युदर यांच्यातील संबंधांची तपासणी केली. पण त्यांना यासंबंधीत काही माहिती मिळाली नाही. उपवास करणाऱ्या या लोकांचा हृदयरोगाशी असलेला संबंध ही समोर आला. याला वंश, वांशिकता आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीसह आठ वेगवेगळी कारणं ही होती. बीबीसीच्या बातमीनुसार, आहाराची गुणवत्ता, जेवण आणि स्नॅक्सची वारंवारता आणि इतर जीवनशैलीच्या सवयी यासारख्या घटकांमध्ये समन्वय राखला तरिही उपवासामुळे हृदयरोग होतोय ही गोष्ट कायम राहिली.
तरीही, लेखक त्यांच्या अभ्यासात हेही स्पष्ट करतात की, उपवास केल्यामुळे थेट हृदयरोग होतात हे त्यांचे निष्कर्ष सिद्ध होत नाहीत. हे ठामपणे सांगण्यासाठी आणखीन जास्त काळ त्या-त्या व्यक्तिचं परिक्षण करुन चाचण्या घेणं गरजेचं आहे.
“जरी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य किंवा दीर्घायुष्य मिळवण्यासाठी लोकांनी अनेक वर्षापासून खाण्याचा कालावधी कमी करत असतील तर त्यात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कारण आजपर्यंत मानवी अभ्यासातून उपवास केल्याने हा फायदा मिळतो याला कोणताही शास्त्रिय पुरावा मिळालेला नाही,” असे अभ्यासाचे वरिष्ठ लेखक व्हिक्टर वेन्झे झोंग यांनी नमुद केलं आहे.
आपले आरोग्य जाणून उपवास करा
वजन कमी करण्यासाठी, शरिरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी इंटरमिडीएट डाएटचा फायदा होत असल्याचं निष्पन्न झालं आहे. “पण, संभाव्य तोटे म्हणजे पोषक तत्वांची कमतरता, वाढलेले कोलेस्ट्रॉल, जास्त भूक, चिडचिड, डोकेदुखी याचं प्रमाण त्याचवेळी वाढलेलं दिसून आलं आहे,” असं एंडोक्राइनोलॉजिस्ट प्रोफेसर अनूप मिश्रा यांनी बीबीसीला सांगितलं.
त्यांनी पुढे म्हटलं की, मधुमेह असलेल्या लोकांसाठी, वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय उपवास केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक प्रमाणात कमी होऊ शकतं. वृद्ध प्रौढांसाठी किंवा दीर्घकालीन आजार असलेल्यांसाठी ही ते धोकादायक आहे. यामुळे ते अशक्त होऊ शकतात. परिणामी स्नायूंचं नुकसान वाढू शकते.
बेंगळुरू इथल्या स्पर्श रुग्णालयातील प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रंजन शेट्टी यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “जर एखादी व्यक्ती लठ्ठ असेल, तर त्या व्यक्तिचं वजन एका मर्यादेपर्यंतच कमी करणं योग्य असेल. जास्त वजन नसलेल्या दुसऱ्या व्यक्तीसाठी अशाप्रकारचा डाएट लागू नाही. प्रत्येक व्यक्तिला त्यांच्या स्नायूंच्या वस्तुमानातील घट याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. स्नायूंमधील चरबी ही हृदयासाठी वाईटच असते.”
सध्या तरी, तज्ञांचं म्हणणं आहे की, उपवास हा एक सामान्य उपाय म्हणून पाहू नये. सर्वोत्तम दृष्टिकोन म्हणजे तुमचे आरोग्य, जीवनशैली आणि जोखीम लक्षात घेऊन तयार केलेला उपाय. त्यामुळे इंटरमिडीएट डाएटचा नेमका फायदा काय याविषयी जोपर्यंत अधिक पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत, घड्याळाकडे लक्ष न देता, तुमच्या ताटात संतुलित आहाराला पुरक असे अन्नपदार्थ घेऊन खाणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे.



