जॅग्वार लढाऊ विमानाचा अपघात; या लढाऊ विमानांची कार्यक्षमता संपुष्टात येत आहे का?

Jaguar fighter jet : बुधवार दिनांक 9 जुलै रोजी राजस्थानमध्ये जॅग्वार या लढाऊ विमानाचा अपघात झाला. या वर्षभरातला हा तिसरा अपघात आहे. या तीन अपघातामुळे या लढाऊ विमानतील तांत्रिक समस्या, देखभाल, कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. 
[gspeech type=button]

राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवार दिनांक 9 जुलै रोजी भारतीय हवाई दलाचं जॅग्वार लढाऊ विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात भारतीय हवाई दलाच्या दोन पायलटचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी 1.25 वाजता सुरतगड हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर भानोदा गावातील शेतजमिनीत विमान कोसळल्याची माहिती स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय हवाई दलाने (आयएएफ) दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमानातील दोन्ही पायलटना गंभीर दुखापत झाली होती. प्रशिक्षक पायलटला प्रशिक्षण देतेवेळी हा अपघात झाला. 

या वर्षभरातला जॅग्वार लढाऊ विमानाचा हा तिसरा अपघात आहे.  यापूर्वी, एप्रिलमध्ये गुजरातमध्ये आयएएफचे जॅग्वार कोसळलं होतं. या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला होता. तर मार्चमध्ये हरियाणामध्ये आणखी एक विमान कोसळलं होतं. या तीन अपघातामुळे या लढाऊ विमानतील तांत्रिक समस्या, देखभाल, कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. 

भारतात जॅग्वारची एंट्री

1968 मध्ये ब्रिटिश एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन आणि फ्रेंच ब्रेगेट या दोन कंपन्यांनी संयुक्तरित्या सेपेकॅट हे लढाऊ विमान विकसीत केलं. फ्रेंच एअरफोर्स आणि रॉयल एअरफोर्ससाठी एक नवीन सुपरसॉनिक जेट ट्रेनर विकसित करणं हा त्यामागचा उद्देश होता.  सुरुवातीला या लढाऊ विमानाच्या साहाय्याने जमिनीवर हल्ला करता येईल अशा पद्धतीनं विकसित केलं. मात्र, हळूहळू त्यामध्ये बदल करीत त्यामध्ये अत्याधुनिक तंत्राचा समावेश केला. या दोन आसनी लढाऊ विमानामध्ये AIM-9 साइडविंडर, ASRAAM आणि R.550 मॅजिक सारख्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या वैशिष्ट्यांसह विविध क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.

1979 मध्ये, भारताने पहिलं जॅग्वार विकत घेतलं. त्याचं नाव शमशेर (फारसीमध्ये न्यायाची तलवार) असं दिलं. 27 जुलै 1979 रोजी पहिली दोन जॅग्वार लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन ग्रुप कॅप्टन कपिल भार्गव यांनी हवाई दलाच्या मासिकातील एका लेखात असं नमूद केलं की, यामुळे भारतीय हवाई दलाच्या विमानचालन क्षमतेत एका नवीन युगाची सुरुवात झाली.

अल्पावधीतच या लढाऊ विमानाने कमी उंचीवरुन हल्ले करण्यासाठी हे विमानं उत्तम असल्याची विशेष ओळख मिळवली.  1999  मध्ये कारगिल युद्धादरम्यान या जेटने गुप्तचर आणि उच्च-उंचीवरील अचूक लक्ष्य साधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्यातही, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-16 ला भरकटवण्यासाठी आणि त्यांना इच्छित लक्ष्य क्षेत्रापासून दूर नेण्यासाठी या लढाऊ विमानांचा वापर केला होता. आज भारतीय हवाई दलाच्या 6 ताफ्यात 120 जॅग्वार विमानं आहेत. 

हे ही वाचा : मरीन राफेल करार : भारताचा सर्वात मोठा संरक्षण करार!

जॅग्वारची सद्यस्थिती

जॅग्वार हे आयएएफच्या ताफ्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. पण अलीकडे त्यामध्ये अनेक समस्या आढळून येत आहेत. 2025 या एका वर्षातच या विमानाशी संबंधित तीन अपघात झाले आहेत. 7 मार्च रोजी, हरियाणातील अंबाला एअरबेसवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते विमान कोसळलं. हरियाणा-हिमाचल प्रदेश सीमेजवळील हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील रायपूर राणीजवळच्या डोंगराळ प्रदेशात हा अपघात झाला होता. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत निवेदनात म्हटलं होतं की, “आज नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अंबाला येथे भारतीय हवाई दलाचे एक जॅग्वार विमान कोसळले. विमानाच्या सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड लक्षात येताच पायलटने नागरी वस्तीपासून हे विमान दूर नेले आणि मग त्यातून सुरक्षित बाहेर पडले. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.”

2 एप्रिल 2025 रोजी, रात्रीच्या मोहिमेदरम्यान जामनगर एअरफील्डजवळ आणखी एका जॅग्वारचा कोसळून अपघात झाला. या अपघातात फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. आयएएफच्या अधिकृत निवेदनानुसार, विमानातला बिघाड लक्षात आल्यानंतर दोन्ही पायलट बाहेर पडले. ज्यामुळे जेट गर्दीच्या ठिकाणी नसून मोकळ्या मैदानात कोसळलं. तरी, विमानातून बाहेर पडल्यानंतर, फ्लाइट लेफ्टनंट यादव यांचा मृत्यू झाला.

सूत्रांनी सांगितले की, यापूर्वी, जॅग्वारशी संबंधित अनेक घटना घडल्या आहेत. या विमानांच्या ताफ्याला आयएएफसोबतच्या 45 वर्षांच्या सेवेत 50 हून जास्त अपघाती  घटनांना सामोरं जावं लागलं आहे. त्यापैकी काही घटना प्राणघातक ठरल्या आहेत.

जॅग्वार उडवण्यात भारतीय हवाई दलासमोरील आव्हाने

बुधवारी राजस्थान इथे झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. हे लढाऊ विमान आता खरोखरच उड्डाणासाठी सुरक्षित आहे की त्याची क्षमता संपलेली आहे. खरं तर, जागतिक पातळीवर भारतीय हवाई दल हे एकमेव प्रमुख हवाई दल आहे जे अजूनही जॅग्वार विमान वापरते.  ब्रिटन, फ्रान्स, इक्वेडोर, नायजेरिया आणि ओमान या देशांकडेही ही लढाऊ विमानं होती. त्यांनी ती खूप पूर्वी निवृत्त केलेली आहेत. तर काही जेट विमाने हवाई संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत.  

तज्ज्ञांच्या मते, जॅग्वार लढाऊ विमानातील अनेक अपघात हे रोल्स-रॉइस/टर्बोमेका अ‍ॅडोर एमके 804 आणि एमके 811 इंजिनमधील बिघाडामुळे झाले होते. अनेक तज्ज्ञांच्या मते, या इंजिनांमधील सर्वात मोठी चिंता म्हणजे थ्रस्ट आउटपुट, जो भारताच्या उष्ण आणि उंच उड्डाण परिस्थितीत, विशेषतः हिमालयाजवळील अग्रेसर हवाई तळांवरून अपुरा पडतो. द प्रिंटने एका अहवालात नमूद केल्याप्रमाणे, पूर्ण पेलोड परिस्थितीत टेक-ऑफ, क्लाइंबिंग आणि कमी-पातळीवरील मॅन्युव्हरिंग यासारख्या महत्त्वाच्या मोहिमेच्या टप्प्यांमध्ये इंजिनची कार्यक्षमता कमी होते. तसेच एमके 804/811 इंजिनसाठी सुटे भाग हे आता सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हे लढाऊ विमान जितकं जुनं होईल तितके धोके वाढण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : समुद्री तटावरील हवाई क्षेत्रावर भारताची सत्ता !

आयएएफची घटणारी ताकद

2031 पर्यंत जॅग्वार विमानं ही ताफ्यातून टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याची भारतीय हवाई दलाची योजना आहे. तथापि, HAL तेजस Mk2, राफेल आणि MRFA (मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट) खरेदी करण्यात होणाऱ्या विलंबामुळे याला वेळ लागत आहे. 

आज, भारतीय हवाई दलाकडे त्यांच्या लढाऊ स्क्वाड्रनची कमतरता आहे.  एकूण 42 विमानं मंजूर केली आहेत. पण सध्या फक्त 30 विमाने आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये, एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी लढाऊ विमानांच्या कमतरतेचा मुद्दा चर्चेत आणला होता. ते म्हणाले होते की,  “आमच्याकडे आता असे विमानांचे ताफे आहेत जे पुढील पाच ते दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने बंद करावे लागणार आहेत.  त्या ताफ्यांना नवीन विमानांची गरज आहे. दरवर्षी 35 ते 40 विमानं कुठेतरी तयार करण्याचा विचार करत आहोत.  लढाऊ विमानांची ही क्षमता एका रात्रीत वाढू शकत नाही, पण त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Chennai Chess Hub : ‘नॉर्वे चेस 2025’ च्या स्पर्धेत डी. गुकेश यांच्याकडून पराभव झाल्यानंतर आता जगज्जेता मॅग्नस कार्लसनला आर.प्रज्ञानंद याच्याकडूनही
UPI Payment Banned : आयटी हब म्हणून ओळख असलेल्या बेंगळुरूमधले छोटे दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेते मात्र, ‘नो युपीआय, कॅश ओन्ली’
India’s fertility rate dropped : पुढील पिढीच्या वाढीसाठी किमान 2.1 टक्के प्रजनन दर असावा लागतो. यापूर्वी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ