आपण जेव्हा एखाद्या खेळाडूला जिंकताना पाहतो, तेव्हा आपल्याला फक्त त्यांचा खेळ, त्यांची चमक आणि त्यांचा विजय दिसतो. पण या विजयामागे, त्यांच्या यशामागे एका व्यक्तीची खूप मेहनत असते , त्याग आणि अतूट विश्वास असतो ती म्हणजे त्यांची आई.
आई फक्त आपल्याला जन्म देत नाही, तर ती आपल्या मुला-मुलींच्या स्वप्नांना पंख देते. ती त्यांची पहिली प्रशिक्षक असते, त्यांची सर्वात मोठी चाहती असते. आपल्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात आई खंबीरपणे पाठीशी उभी असते. कधीकधी खेळादरम्यान पराजयामुळं निराश व्हायला होतं. तेव्हा आईच आपल्या मुलांना पुन्हा उभं राहायला बळ देते. कधी मायेनं जवळ घेत तर कधी ओरडून ती आपल्याला प्रोत्साहन देते. तिचा एकच उद्देश असतो, आपल्या मुलाने किंवा मुलीने हार मानू नये, स्वप्न पूर्ण करावं.
आपल्या भारतात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी देशाचं नाव मोठं केलं आहे. आणि त्यांच्या यशात त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा आहे.
दिव्या देशमुख आणि डॉ. नम्रता देशमुख
दिव्या देशमुख ही भारतीय बुद्धीबळातील एक उगवता तारा आहे. नुकतीच तिनं FIDE वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. वयाच्या 19 व्या वर्षीच तिने हे यश मिळवले आहे. या अद्वितीय यशाचं श्रेय दिव्याने आपल्या आईला दिलं आहे. जिंकल्यानंतर तिने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘मला नाही वाटत की जर आई नसती तर मी इथंपर्यंत पोहोचू शकले असते.’
दिव्याची आई, डॉ. नम्रता देशमुख, या पूर्णवेळ डॉक्टर आहेत. तरीही, त्यांनी जॉर्जियामध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेळ काढला. पूर्ण स्पर्धेत त्यांनी दिव्याला साथ दिली आणि प्रत्येक क्षणी तिला धीर दिला. आईच्या या साथीमुळेच दिव्या आज या उंचीवर पोहोचू शकली आहे.
डी. गुकेश आणि पद्मा कुमारी
भारतीय बुद्धीबळाचा आणखी एक चमकता तारा म्हणजे डी. गुकेश. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने इतिहास रचला. त्याने सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन चीनच्या डिंग लिरेनला हरवून सर्वात तरुण विश्व बुद्धीबळ चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे.
तो जिंकल्यावर एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला. त्यात गुकेशची आई, डॉ. पद्मा कुमारी, आपल्या मुलाला ट्रॉफी घेताना पाहून भावूक झालेल्या दिसतात.हे क्षण फक्त विजयाचे नव्हते, तर एका आईने आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण होताना पाहण्यासाठी केलेल्या त्यागाची आणि प्रेमाची ती झलक होती.
पद्मा कुमारी या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि अनेक मुलाखतींमध्ये त्या गुकेशसोबत दिसल्या आहेत. गुकेश आपल्या आई-वडिलांना आपला सर्वात मोठा आधार मानतो. ChessBase India ला दिलेल्या मुलाखतीत पद्मा यांनी सांगितलं की, ‘गुकेश भावनिक होतो तेव्हा आधारासाठी तो नेहमी माझ्याकडे येतो. कठीण काळात तो स्वतःला सावरतो, पण माझा थोडासा धीर त्याला आणखी स्ट्राँग करतो. मी त्याला शांत आणि संयमित राहायला सांगते.’
हेही वाचा: संपूर्णपणे महिलांकडून चालवलं जाणार गोव्यातलं रिसॉर्ट
मनु भाकर आणि सुमेधा भाकर
शूटर मनु भाकरचा 2021 च्या ऑलिम्पिकमधील प्रवास तिच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाल्यामुळे थांबला होता. या घटनेमुळे ती इतकी निराश झाली की तिने खेळातून ब्रेक घेतला. पण योग्य मार्गदर्शन आणि आईच्या पाठिंब्यामुळे तिने पुन्हा जोरदार पुनरागमन केलं. कठीण काळात तिची आई सुमेधा भाकर तिच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या.
आज याच मेहनतीचं फळ म्हणजे मनूने पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारतासाठी दोन ऐतिहासिक कांस्यपदके जिंकली आहेत. सुमेधा यांनी सांगितलं की, मनू हे लक्ष्य मिळवण्यासाठी रोज 9 तासांपेक्षा जास्त सराव करायची. आपल्या देशासाठी अभिमानाचा क्षण आणण्यासाठी तिने खूप त्याग केले आहेत.
मनिका बत्रा आणि सुषमा त्यागम
मनिका बत्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास घडवला. ती राऊंड ऑफ 16 मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय टेबल टेनिस खेळाडू बनली आहे. जगातील टॉप खेळाडूंमध्ये येण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. 29 वर्षांच्या मनिकाला तिच्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी कॉलेजही सोडावं लागलं. पण तिच्या आई-वडिलांनी नेहमी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला.
SheThePeople ला दिलेल्या मुलाखतीत मनिकाने सांगितलं की, ‘माझ्या आईने मला नेहमी सुरक्षित ठेवलं. माझ्या बहिणीने आणि आजीनेही मला उत्तम प्रगती करण्यासाठी प्रवृत्त केलं. कुटुंबाची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं.’
सुषमा त्यागम यांनी मुलीच्या यशासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं. कोणताही निर्णय घेण्यात साथ देण्यापासून ते अनेक त्याग करण्यापर्यंत, त्यांनी प्रत्येक अडचणीत मुलीला साथ दिली. मनिकाचे वडील आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असतानाही त्यांनी मनिका आणि तिच्या वडिलांना खंबीर साथ दिली. सुषमा या एक फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी कुटुंबाला आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या सांभाळलं.
तुलिका मान आणि अमृता मान
जुडोपटू तुलिका मानची आई अमृता मान, या एक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या करिअर आणि कुटुंबाला सांभाळण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली.
ड्युटीच्या मध्येही त्या आपल्या मुलीला शाळेतून घ्यायला जात असत आणि मग तिला पोलीस स्टेशनला आणत असत. पण हे वातावरण तुलिकासाठी योग्य नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला एका जुडो क्लबमध्ये दाखल केलं. जेणेकरून ती आपला वेळ गुन्हेगारांमध्ये नाही, तर खेळाच्या मैदानावर घालवेल.
Indian Express शी बोलताना अमृता यांनी सांगितलं की, तुलिकाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी त्यांनी अनेक कठीण निर्णय घेतले. कर्ज काढलं, आपली बचत खर्च केली, पण कधी हार मानली नाही.
आज 25 वर्षांची तुलिका पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. आपल्या आईच्या मेहनतीला अभिमानाने उत्तर देत आहे. कठीण काळात अमृता आजही तुलिकाची सपोर्ट सिस्टम म्हणून उभ्या राहतात.
अशाच प्रत्येक खेळाडूंच्या यशामागे त्यांच्या आई- वडिलांचा अफाट त्याग, समर्पण आणि विश्वास असतो.