अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच ‘एस्ट्रोनॉट क्लास’ ची घोषणा केली आहे. ही निवड NASA च्या 60 वर्षांहून अधिकच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी ऐतिहासिक ठरली आहे, कारण या तुकडीत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. अंतराळ संशोधनात महिलांना समान संधी देण्याच्या दिशेने नासाचे हे मोठं पाऊल आहे.
नव्या तुकडीची आकडेवारी
NASA ने 8,000 हून अधिक अर्जदारांमधून एकूण 10 जणांची निवड केली आहे.
या 10 जणांमध्ये 6 महिला आणि 4 पुरुष आहेत.
या नव्या टीममध्ये शास्त्रज्ञ, इंजिनियर्स, मेडिकल डॉक्टर्स आणि अनुभवी टेस्ट पायलट अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे.
हे सर्वजण आता अमेरिका आणि जगाला चंद्रावर तर, भविष्यात मंगळ ग्रहावर घेऊन जाण्याच्या मोठ्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
पुढील 2 वर्षांची ट्रेनिंग आणि भविष्यातील मिशन
नव्याने निवड झालेल्या या ‘टॉप 10’ उमेदवारांना आता पुढील दोन वर्षे कठोर प्रशिक्षण घ्यावे लागेल. या प्रशिक्षणानंतरच ते अंतराळात जाण्यासाठी पात्र ठरतील.
NASA चे सध्याचे कार्यकारी प्रशासक (Acting Administrator) शॉन डफी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “या 10 जणांपैकी एक व्यक्ती भविष्यात मंगळ ग्रहावर पाऊल ठेवणारा पहिली व्यक्ती बनू शकते.”
चीनसारखे देश अंतराळात अमेरिकेच्या नेतृत्वाला आव्हान देत असले तरी, अमेरिकाच चंद्रावर अंतराळवीर उतरवण्याच्या शर्यतीत जिंकेल, असा ठाम विश्वास NASA ने व्यक्त केला आहे.
नव्या तुकडीतील काही ‘खास चेहरे’
या तुकडीत अनेक देशातील ‘बेस्ट अँड ब्राईटेस्ट’ लोक निवडले गेले आहेत.
अॅना मेनन (Anna Menon) :
या माजी SpaceX इंजिनियर आहेत. NASA मध्ये निवड होण्यापूर्वीच, त्या गेल्या वर्षी एका खासगी मिशनमध्ये (Polaris Dawn) अंतराळात जाऊन आल्या आहेत. इतकेच नाही तर, त्यांच्या पतीची देखील 2021 च्या तुकडीतून NASA मध्ये निवड झाली होती. हे दोघं आता सक्रिय अंतराळवीरांच्या यादीत असलेले चौथे विवाहित जोडपे आहेत.
लॉरेन एडगर (Lauren Edgar):
या यू.एस. जिओलॉजिकल सर्व्हेमध्ये (USGS) काम करत होत्या. त्यांना मंगळ ग्रहाच्या भूगर्भशास्त्राचा चांगला अनुभव आहे. त्यांनी मंगळावरच्या ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ प्रकल्पावरही काम केलं आहे.
एअर फोर्स मेजर कॅमेरॉन जोन्स आणि एअर फोर्स मेजर अॅडम फुरमन हे दोघेही मिलिटरी पायलट आहेत आणि त्यांनी अनेक लढाऊ विमाने चालवली आहेत.
याशिवाय, नौदलाचे अधिकारी नेव्ही लेफ्टनंट कमांडर आणि एक मेडिकल डॉक्टर अॅनेस्थेसियोलॉजिस्ट यांचाही या तुकडीत समावेश आहे.
NASA च्या इतिहासातील एक खास टीम
1959 मध्ये ‘मर्क्युरी सेव्हन’ या पहिल्या तुकडीची निवड झाल्यापासून आजपर्यंत NASA ने केवळ 370 लोकांनाच अंतराळवीर म्हणून निवडले आहे. ही खूप छोटी पण खास लोकांची टीम आहे.
आता निवड झालेले हे 10 जण, सध्या कार्यरत असलेल्या 41 सक्रिय अमेरिकन अंतराळवीरांच्या टीममध्ये सामील होतील. NASA आता सर्वांसाठी समान संधी देत आहे. तसंच, महिलांनाही अंतराळ संशोधनात मोठे स्थान मिळाले आहे.