आपला भारत देश हा मोठ्या संघर्षानंतर आणि अनेक बलिदानानंतर स्वतंत्र झाला. या प्रवासात भारताच्या राष्ट्रीय ध्वजानेही अनेक बदल पाहिले. पारतंत्र्याच्या काळातून स्वतंत्र भारताची ओळख निर्माण करेपर्यंत, आपला ध्वज एकूण 5 वेगवेगळ्या रुपांमध्ये पाहायला मिळाला. चला तर मग, याबद्दल जाणून घेऊया.
1906, कोलकाता इथे पहिला ध्वज फडकवला
7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाताच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये भारताचा पहिला ध्वज फडकवण्यात आला. हा ध्वज तत्कालीन ‘स्वदेशी’ चळवळीचे प्रतीक होता. या ध्वजामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन आडवे पट्टे होते. आणि मध्यभागी असलेल्या पिवळ्या पट्ट्यावर ‘वंदे मातरम्’ असं मोठ्या अक्षरात लिहिलेले होते. वरच्या लाल पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य यांची प्रतीके होती, तर खालच्या हिरव्या पट्ट्यावर आठ कमळांची चित्रे होती.
1907, मादाम कामांनी जर्मनीमध्ये फडकवलेला ध्वज
भारताचा दुसरा महत्त्वाचा ध्वज मादाम भिकाजी कामा यांनी 1907 साली जर्मनीतील स्टुटगार्ट इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता. मादाम कामा या परदेशातून ब्रिटीश राजवटीविरुद्ध काम करणाऱ्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होत्या.
या ध्वजाची रचना ही, ध्वजाचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा आणि खालचा पट्टा केशरी रंगाचा होता. मादाम कामा 1936 साली भारतात परतल्या, तेव्हा त्यांनी हा ध्वज आपल्यासोबत भारतात आणला.
1917 होमरूल चळवळीचा ध्वज
1917 साली लोकमान्य टिळक आणि डॉ. ॲनी बेझंट यांनी सुरू केलेल्या ‘होमरूल चळवळी’ने जोर धरला होता. याच चळवळीदरम्यान भारताचा तिसरा ध्वज फडकवण्यात आला. या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे आडवे पट्टे एकामागोमाग एक असे होते.
यावर कमळांऐवजी सात तारे होते. हे तारे आकाशातील सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावर मांडलेले होते.या ध्वजात ब्रिटिश राजवटीच्या प्रतीकाचे ‘युनियन जॅक’ चिन्हही एका कोपऱ्यात होते, जे स्वशासनाची मागणी करत ब्रिटिशांशी संबंध कायम ठेवण्याची इच्छा दर्शवण्यासाठी होते.
1921, गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असलेला ध्वज
1921 साली आंध्र प्रदेशातील बेझवाडा इथे काँग्रेसचे अधिवेशन झाले. याच अधिवेशनात पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक नवीन ध्वज तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. व्यंकय्या यांनी तयार केलेल्या ध्वजात त्यावेळी लाल आणि हिरवे असे दोन रंगाचे पट्टे होते. जे हिंदू आणि मुस्लिम या दोन मुख्य धर्मांचे प्रतीक होते. मात्र, गांधीजींनी सुचवले की, इतर सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढरा रंगाचा पट्टा समाविष्ट करा. तसेच,चरख्याचे चिन्हही या झेंड्यात घेण्यास सांगितले, जे देशाच्या प्रगतीचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक होते.
1931, तिरंगी ध्वज आणि चरखा
1929 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज’चा ठराव संमत झाला. यानंतर,1931 साली आज आपण पाहत असलेल्या तिरंग्याच्या रंगांची रचना मंजूर करण्यात आली. काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला ध्वज एका ठरावाद्वारे स्वीकारला. हाच त्यावेळी काँग्रेस पक्षाचा अधिकृत ध्वज बनला.
विशेष म्हणजे, आतापर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचे आणि गटांचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते. पण या ठरावाने या रंगांचा धर्मांशी असलेला अर्थ काढून टाकला. या रंगांना राष्ट्रीय एकात्मता आणि त्याग, शांतता, आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले.
1947, आजचा आपला गौरवशाली तिरंगा
1947 साली, भारत स्वतंत्र झाल्यावर, घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभाराचा आराखडा तयार करत होती. स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा, हा प्रश्नही चर्चेला आला. त्यावेळी, 1931 साली स्वीकृत झालेला ध्वज फक्त एका बदलासह स्वीकारण्यात आला.
चरख्याच्या जागी, सारनाथ येथील अशोकस्तंभावर असलेले ‘धर्मचक्र’ आले. हे चक्र प्रगती, गती आणि कायद्याचे प्रतीक आहे. अशा प्रकारे, वरती केशरी, मध्यभागी पांढरा आणि खाली हिरवा असे तीन रंग आणि मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला आपला आजचा तिरंगा अस्तित्वात आला. हा ध्वज 22जुलै 1947 रोजी अधिकृतपणे भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला.
राष्ट्रध्वजाची निर्मिती कुठे केली जाते
आपल्या भारत देशाचा गौरवशाली तिरंगा फक्त एकाच ठिकाणी अधिकृतपणे बनवला जातो. कर्नाटकातील हुबळी शहरातील बेंगेरी इथली कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ (Karnataka Khadi Gramodyog Samyukta Sangh – KKGSS) ही संस्था देशातील सर्व तिरंग्यांची निर्मिती करते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने KKGSS ला तिरंग्याची निर्मिती करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
KKGSS संस्थेची स्थापना नोव्हेंबर 1957 मध्ये झाली. महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रेरित होऊन, खादीला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. सुरुवातीला त्यांनी खादी कपड्यांची निर्मिती केली.
जवळपास पाच दशकांनंतर, 2005-06 साली, या संस्थेला अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळाली. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडून (Bureau of Indian Standards – BIS) त्यांना राष्ट्रध्वज तयार करण्याचे प्रमाणपत्र मिळाले आणि त्यानंतर KKGSS ने राष्ट्रध्वज निर्मितीला सुरुवात केली. आज, KKGSS ही देशातील एकमेव अशी संस्था आहे, जिथे भारतीय राष्ट्रध्वज भारतीय ध्वज संहिते (Flag Code of India) नुसार तयार करण्यात येतो. या केंद्रात सर्व महिला कर्मचारी काम करतात.
हेही वाचा : 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून का निवडला?
तिरंगा निर्मितीची प्रक्रिया
आपल्या राष्ट्रध्वजासाठी फक्त हाताने कातलेले आणि हाताने विणलेले खादीचे कापड वापरलं जाते. हे कापड KKGSS च्याच बागलकोट जिल्ह्यातील तुळसगेरी येथील युनिटमध्ये तयार केलं जातं. खादीचे कापड बेंगेरी युनिटमध्ये आणल्यावर, ते तीन वेगवेगळ्या लॉटमध्ये विभागलं जातं. त्यानंतर ते केशरी, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांमध्ये रंगवले जाते आणि रंगांची अचूकता आणि टिकाऊपणा यावर विशेष लक्ष यावेळी दिलं जातं.
पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी, निळ्या रंगाचे 24 आऱ्यांचे अशोकचक्र अत्यंत काळजीपूर्वक प्रिंट केले जाते. हे चक्र दोन्ही बाजूंनी अचूकपणे छापले जाते, जेणेकरून ध्वज कोणत्याही बाजूने फडकला तरी तो सारखाच दिसेल.
रंगवलेले आणि अशोकचक्र छापलेले कापड कापून योग्य आकारात आणले जाते. त्यानंतर, हे तीन पट्टे एकत्र शिवले जातात. शिलाईमध्ये अचूकता राखण्यासाठी विशेष प्रकारच्या मशीनचा वापर केला जातो, ज्यामुळे ध्वज नियमांनुसार तयार होतो.
तयार झालेला प्रत्येक ध्वज 18 ते 19 वेळा कठोर गुणवत्ता तपासणीतून जातो. रंगांचा टिकाऊपणा, कापडाची मजबुती, दोरा, लांबी-रुंदीचे प्रमाण आणि अशोकचक्राची अचूकता यासारख्या अनेक गोष्टी तपासल्या जातात. थोडा जरी दोष आढळल्यास, तो ध्वज नाकारला जातो. KKGSS च्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 10% ध्वज या कठोर तपासणीत नाकारले जातात.
राष्ट्रध्वजाचे विविध आकार आणि नियम
भारतीय ध्वज संहितेनुसार, राष्ट्रध्वज वेगवेगळ्या आकारांमध्ये तयार केला जातो. KKGSS संस्था एकूण 9 वेगवेगळ्या आकारांचे ध्वज तयार करते:
सर्वात लहान आकार बैठकीच्या ठिकाणी किंवा कॉन्फरन्स टेबलावर ठेवता येतो: 6x 4 इंच
व्हीआयपी गाड्यांसाठी: 9 x 6 इंच
राष्ट्रपतींच्या विमानासाठी आणि रेल्वेसाठी: 18 x 12 इंच
इमारतींवर फडकवण्यासाठी: 5.5 x 3 फूट
शहीद जवानांच्या पार्थिवासाठी: 6 x 4 फूट
संसद भवन आणि अन्य सरकारी इमारतींसाठी: 9 x 6 फूट
लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवनसाठी: 12 x 8 फूट
अन्य मोठ्या सरकारी इमारतींसाठी सर्वात मोठा आकार: 21 x 14 फूट
कर्नाटकातील बेंगेरी येथील KKGSS ही संस्था केवळ एक उत्पादन केंद्र नसून, ती आपल्या देशाच्या अस्मितेचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक बनली आहे.