दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सी.पी.राधाकृष्णन यांचं उमेदवारीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं आहे.
सी.पी.राधाकृष्णन यांच्यासाठी पंतप्रधानांची पोस्ट
“सी.पी.राधाकृष्णन यांनी प्रदीर्घ काळापासून स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलेलं आहे. समाजाप्रती असलेलं समर्पण, नम्रता आणि बुद्धीमता हे गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. त्यांनी विविध पदांवर काम करताना नेहमीच सामुदायिक सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांनी तामिळनाडूमध्ये तळागाळात व्यापक काम केलं आहे. एनडीए कुटुंबाने त्यांना आमच्या युतीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे.” असे पंतप्रधानांनी लिहिले आहे.
तसेच “राधाकृष्णन यांना खासदार आणि विविध राज्यांच्या राज्यपाल पदाचाही भरपूर अनुभव आहे. संसदेतील त्यांचे भाषण, वादविवाद हे नेहमीच उपयुक्त ठरले आहेत. राज्यपाल पदाच्या कारकिर्दीत त्यांनी सामान्य माणसांना भेडसावणारे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिलेला आहे. कामांचा अनुभवांसह त्यांना कायदेविषयक आणि घटनात्मक बाबींचं ज्ञान आहे. मला विश्वास आहे की राधाकृष्णन हे एक प्रेरणादायी उपराष्ट्रपती असतील.” अशा पद्धतीने पंतप्रधानांनी सी.पी.राधाकृष्णन यांचं कौतुक केलं आहे.
In his long years in public life, Thiru CP Radhakrishnan Ji has distinguished himself with his dedication, humility and intellect. During the various positions he has held, he has always focused on community service and empowering the marginalised. He has done extensive work at… pic.twitter.com/WrbKl4LB9S
— Narendra Modi (@narendramodi) August 17, 2025
सी.पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास
सी.पी. राधाकृष्णन यांचं पूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन असं आहे. ते सध्या महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल आहेत. 31 जुलै 2024 रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार हाती घेतला. फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 पर्यंत ते झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. मार्च ते जुलै 2024 पर्यंत त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून काम सांभाळले.
राधाकृष्णन हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून ते कोइम्बतूर इथून तीनदा लोकसभेवर निवडून आले होते. आणि यापूर्वी त्यांनी तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही भूषवलं आहे.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपचे प्रयत्न
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी माध्यमांना सांगितलं की, “आम्ही विरोधी पक्षांशीही चर्चा करू. उपराष्ट्रपतीपदासाठी बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी आम्हाला त्यांचा पाठिंबाही मिळाला पाहिजे. आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. आताही, आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. आमच्या सर्व एनडीए सहकाऱ्यांनी सीपीराधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी आम्हाला पाठिंबा दिला आहे.”
दरम्यान, 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. मतदान आणि मतमोजणी ही एकाच दिवशी पूर्ण केली जाणार आहे.
उमेदवारांना 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि 25 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दिली आहे.