सर्वसाधारणपणे आपल्याला ए, बी, एबी आणि ओ हे चारच रक्तगट ठाऊक आहेत. मात्र, नुकताच भारतामध्ये सगळ्यात वेगळा रक्तगट एका माणसाच्या शरीरामध्ये आढळून आला आहे. समजून घेऊया हा रक्तगट कोणता आहे आणि हा रक्तगटा कसा तयार झाला?
कर्नाटकात आढळला वेगळा रक्तगट
कर्नाटकमधल्या कोलार जिल्ह्यात एका 38 वर्षीय महिलेवर हृदय शस्त्रक्रिया करायची होती. या शस्त्रक्रिये दरम्यान रक्ताची गरज लागणार होती, म्हणून तिच्या रक्ताची तपासणी केली. त्यावेळी तिचा रक्तगट ओ आरएच प्लस (O Rh +) असल्याचं समोर आलं. रक्तदानासाठी आलेल्या वेगवेगळ्या रक्तदातांच्या रक्ताशी हा रक्तगट मॅच झाला नाही. सामान्य रक्तगटाशी हा रक्तगट जुळत नसल्यामुळे डॉक्टरांनी या रक्तगटाला वैज्ञानिक भाषेत ‘पैनरिएटिव्ह’ म्हणून घोषित केलं.
रक्तगटाची विविध प्रयोगशाळेत तपासणी
या रक्तगटाच्या सखोल तपासणीसाठी डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बेंगळुरूमधल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठवले. तिथेही या रक्तगटाची माहिती मिळाली नाही. त्यामुळे मग हे नमुने जगातली सगळ्यात मोठी प्रयोगशाळा म्हणून ओळख असलेल्या युनायटेड किंगडममधल्या इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरेंस या प्रयोगशाळेत पाठवले.
या प्रयोगशाळेतल्या तपासणीमध्ये महिलेच्या रक्तातील नमुन्यांमध्ये एक नवीन एंटिजन आढळलं. हे एंटिजन माणसांच्या शरीरात नसते. हे एंटिजन महिलेच्या शरीरात कसं आलं याची आता तपासणी सुरू आहे. यासाठी तिच्या कुटुंबातील जवळपास 20 सदस्यांच्या रक्ताची चाचणी केली. मात्र, या सदस्यांचे रक्त ही महिलेच्या रक्त नमुन्यासोबत जुळले नाहीत. यावरुन हा रक्तगट पूर्णत: नवीन असल्याचं स्पष्ट झालं.
हे ही वाचा : तुम्हाला माहितेय का? आपले रक्तगट कसे ओळखतात?
‘क्रीब’ (CRIB) हे नाव कसं पडलं?
या रक्तगटाला नाव देण्याची पद्धत मात्र खूप रंजक आहे. संशोधकांनी या नवीन रक्तगटाची नोंद वेगळ्या वर्गवारीत केली आहे. हे नवीन एंटिजन रक्ताच्या ‘क्रोमर’ (CROMER) मध्ये आढळलं आहे. त्यामुळे क्रोमर या शब्दाचे पहिले दोन इंग्रजी आद्याक्षर – CR, रक्ताचा नमुना हा भारतातून आहे त्यामुळे I आणि भारतातल्या बेंगळुरूमधून आहे म्हणून B या आद्याक्षरांनी या रक्तगटाला नाव दिलं आहे.
त्यामुळे बेंगळुरूमधील ही महिला पहिली महिला असणार आहे जिचा रक्तगट CRIB असा आहे.
त्या महिलेला रक्ताची गरज लागली तर काय करणार?
जगासमोर एका नवीन रक्तगटाची माहिती उघड झाली. पण आता प्रश्न आहे त्या महिलेला जर रक्ताची गरज लागली तर ती कशी भागवणार? कारण हा एकमेव असा रक्तगट आहे. त्यामुळे तिला कोणाकडूनच रक्त घेता येणार नाही. त्यामुळे तिला रक्त कसं पुरवलं जाणार हा प्रश्न उरतो. यावर संशोधकांनी ‘ऑटोलॉगस ट्रांसफ्यूजन’ हा पर्याय सुचवला आहे.
‘ऑटोलॉगस ट्रांसफ्यूजन’ म्हणजे त्या महिलेलाच वेळोवेळी रक्तदान करुन ते स्वतःसाठी साठवावं लागणार आहे. भविष्यात जेव्हा तिला रक्ताची गरज लागेल तेव्हा, आधी काढून सुरक्षित ठेवलेलं तिचंच रक्त तिच्याकरता वापरता येईल.
मानवी शरीर रहस्यमय
हा नवीन रक्तगटाचा शोध ही वैज्ञानिक जगतासाठी मोठी बाब आहे. यावरुन मानवी शरीर अजूनही विकसीत होत असल्याचा प्रत्यय येतो. यामुळे रक्ताशी संबंधीत आजपर्यंत समोर न आलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.