सोमवारी दिनांक 28 जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. जम्मू आणि काश्मीरमधील लिडवास या भागात लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ही कारवाई केली.
या कारवाईनंतर मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक जण हाशिम मुसा उर्फ सुलेमान होता. हाच हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं मानलं जातं. इतर दोघांची ओळख यासिर आणि अबू हमजा अशी आहे. हे तिघेही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंधित परदेशी नागरिक होते.
दहशतवाद्यांचा माग
22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यापासून, काश्मीरमधील सुरक्षा कर्मचारी हाय अलर्टवर आहेत. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतरही या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास सुरूच होता.
14 दिवसांपूर्वी लष्करांना जम्मू-काश्मीर भागामध्ये संशयास्पद डिव्हाईसच्या हालचाली आढळून आल्या. चिनी अल्ट्रा रेडिओ कम्युनिकेशन असं हे डिव्हाईस होतं. लष्कर – ए – तोयबाच्या दहशतवाद्यांकडून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी या डिव्हाईसचा वापर केला जात होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं नियोजन आणि अंमलबजावणी दरम्यानही याच डिव्हाईसचा वापर केला गेला होता.
मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर हे डिव्हाईस बंद केलं होतं. त्यामुळे दहशतवाद्यांचा मागोवा काढता आला नव्हता. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी हे डिव्हाईस पुन्हा सुरू केल्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांचं अचूक स्थान – दाचिगाम वनक्षेत्र – शोधता आलं.
तीन दहशतवाद्यांना पकडणे
जम्मू आणि काश्मीरमधील दाचिगाम जंगलांमधलं दहशतवाद्यांचं नेमकं ठिकाण गाठून त्यांना पकडण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी अनेक तुकड्या तैनात केल्या होत्या. या जंगलाच्या दोन बाजू आहेत. एक बाजू दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामकडे पसरलेली आहे. तर दुसरी बाजू गंदरबल जिल्ह्याला जोडणारी आहे.
दहशतवाद्यांचा पत्ता लागताच, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सोमवारी त्या भागात ड्रोन सोडून दहशतवाद्याचं राहण्याचं ठिकाण आणि हालचालींची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रीय रायफल्स (आरआर) आणि पॅरा स्पेशल फोर्सेसचे कमांडो हे महादेव टेकडीवर जाऊन हे ऑपरेशन पूर्ण केलं.
लष्कराच्या दोन्ही पथकाने सकाळी 11.30 च्या सुमारास दहशतवाद्यांना घेराव घातला. एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, 45 मिनिटांनंतर, चकमकीच्या ठिकाणापासून दोन किलोमीटरच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. दुपारी 12:45 वाजता, दहशतवाद्यांचे मृतदेह ओळख पटवण्यात आली.
सूत्रांनी इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, तिन्ही दहशतवादी हे झोपलेले होते. ते पूर्णत: बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला करुन त्यांचा खात्मा केला.
चकमकीच्या ठिकाणी शस्त्रे, भांडी
ऑपरेशन महादेव अंतर्गत सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून शस्त्रे देखील जप्त केली. प्राथमिक माहितीनुसार ही शस्त्रास्त्रे अमेरिकेत तयार केलेली आहेत. यामध्ये कार्बाइन, एक एके-47, 17 रायफल ग्रेनेड आणि इतर साहित्य जप्त केलं आहे.
रायफल ग्रेनेड हे रायफलच्या बॅरल किंवा ग्रेनेड लाँचरमधून डागलेले स्फोटक उपकरणं आहेत. याच्या साहय्याने 200 मीटरपेक्षा जास्त अंतरावर हल्ला करता येतो. या घातक शस्त्रास्त्रांवरुन हे दहशतवादी आणखीन भयानक हल्ला करण्याच्या तयारीत असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या शस्त्रांस्त्रासह त्यांची वापरातली भांडी आणि अन्य सामान ही आढळलं.
ऑपरेशन महादेव हेच नाव का?
भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे राबवलेल्या या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन महादेव असं दिलं आहे.
ही कारवाई महादेव शिखराजवळ घडली. महादेव शिखर हे झबरवान पर्वतरांगांचा भाग आहे आणि तिचे सामरिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. काश्मिरी लोककथेत असे म्हटले आहे की भगवान शिव अमरनाथ गुहेत पोहोचण्यासाठी याच मार्गाने गेले होते, जिथे त्यांनी देवी पार्वतीला अमर कथा (अमरत्वाची कहाणी) सांगितली. याही ऑपरेशनचं नाव केवळ प्रतीकात्मक नाही तर रणनीतिदृष्ट्या देखील महत्त्वाचं आहे.