22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 7 मे 2025 च्या पहाटे 1 ते 1.30 च्या दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी कॅम्पवर क्षेपणास्त्र (मिसाईल) हल्ला केला. भारताच्या या मिशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं. लष्करातील दोन महिला अधिकाऱ्यांनी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती पत्रकार परिषदेत दिली. जाणून घेऊयात भारताच्या या मिशनचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं का ठेवलं?
‘ऑपरेशन सिंदूर’
पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर 15 दिवसानंतर भारताने लष्करी हल्ला करत प्रत्युत्तर दिलं. भारतीय लष्कर विभागाने 7 मे 2025 ला मध्यरात्री 1.51 वाजता त्यांच्या एक्स अकाऊंटवर सिंदूरच्या फोटोसह #Pahalgamterrorattack जस्टीस इज सर्व्ह जय हिंद अशी पोस्ट केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या मिशनचं नाव ठरवलं. या मिशनच्या नावावरुन भारताने पाकिस्तानला फक्त प्रतिहल्ल्याच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे. तर पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या मृत पर्यटकांना वाहिलेली ही श्रध्दांजली आहे.
OPERATION SINDOOR#JusticeServed
Target 1 – Abbas Terrorist Camp at Kotli.
Distance – 13 Km from Line of Control (POJK).
Nerve Centre for training suicide bombers of Lashkar-e-Taiba (LeT).
Key training infrastructure for over 50 terrorists.DESTROYED AT 1.04 AM on 07 May 2025.… pic.twitter.com/OBF4gTNA8q
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 7, 2025
भारतीय संस्कृती आणि सिंदूरचा संबंध
भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूरला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्यावेळी स्त्रीचं लग्न होतं त्यावेळी विधी दरम्यान नवऱ्याकडून त्या महिलेच्या भांगामध्ये सिंदूर भरलं जातं. केसाच्या भांगामध्ये सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र हे सामाजिकदृष्ट्या महिला विवाहित असल्याचे चिन्ह मानलं जातं.
मात्र, पारंपरिक समाजरचनेत पतीचं निधन होतं तेव्हा महिलेच्या केसातलं सिंदूर मिटवलं जातं. पारंपरिक समाजरचनेत गळ्यातलं मंगळसूत्र काढणं, हातातल्या हिरव्या बांगड्या फोडणं हे त्या महिलेच्या पतीचं निधन झाल्याचे काही ‘संकेत’ मानले आहेत .
पहलगाम हल्ल्यामध्ये 25 पुरुषांवर गोळीबार केला गेला. त्यामुळे 25 महिलांनी आपले पती गमावले. 25 कुटुंब उद्ध्वस्त झाली. या सगळ्या कुटुंबाची आठवण म्हणून या मिशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं गेलं.
लष्करी महिला अधिकाऱ्यांकडे नेतृत्व
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर भारतीय लष्कराकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग अशा दोन महिला अधिकाऱ्यांनी नेतृत्व केलं. या आधी कोणत्याही ऑपरेशननंतर महिला अधिकाऱ्यांनी प्रेस ब्रीफ दिलं नव्हतं. पहलगामच्या हल्ल्यात महिलांना वगळून पुरुषांना टार्गेट करण्यात आलं. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ करणं आणि लष्करातील महिला अधिकाऱ्यांनी प्रेस ब्रीफ देणं हा एक स्ट्रॅटेजिक निर्णय आहे. यातून एक स्ट्राँग मेसेजही जातो. कारण अजून भारताची तिन्ही सैन्य दले ही पुरुषप्रधान आहेत. त्यामुळं महिला अधिकाऱ्यांनी प्रेस ब्रीफ देणं हा मैलाचा दगड आहे. या कृतीतून भारतीय महिला किती कणखर आणि हिंमतवान आहेत हे भारताने अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं आहे.
हे ही वाचा : भारताचं ‘पाणी अडवा, पाकिस्तानची जिरवा’ धोरण
लष्कराच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्या मागचं कारण स्पष्ट केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “ पहलगाम इथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला हे प्रत्यूत्तर आहे. या मिशनच्या माध्यमातून या हल्ल्यात जीव गमावलेल्या निरपराध भारतीय बांधवांना आणि त्यांच्या कुटूंबियांना न्याय मिळाला आहे. यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे 9 तळ उद्दवस्त केले आहेत. गेल्या 3 दशकापासून पाकिस्तान सरकारने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागात दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधाही निर्माण करुन दिल्या आहेत. या संपूर्ण मिशनमध्ये पाकिस्तानी सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांपैकी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी गुप्तहेर संघटनेकडून संपूर्ण माहिती घेऊन हे मिशन राबवले आहे. दरम्यान 7 मे 2025 रोजी पहाटे भारताच्या तिन्ही सैन्य दलाने एकत्र येत हे मिशन राबवलं आहे. ”
कर्नल सोफिया कुरेशी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधल्या लष्कर – ए – तोयबा आणि जैश – ए – मोहम्मद या दोन दहशतवादी संघटनांचे उद्धवस्त केलेल्या अड्ड्यांची माहिती दिली.
मुझफ्फरबादमधल्या सवाई नाला इथला लष्कर – ए – तोयबाचा तळ उद्वस्त केला. या दहशतवादी तळावरच 20 ऑक्टोबर 2024 रोजी सोनमार्ग आणि 24 ऑक्टोबर 2024 रोजी गुलमार्ग आणि 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना याच तळावर प्रशिक्षण दिलं होतं.
मुझफ्फरबादमधल्याच जैश – ए – मोहम्मद संघटनेनं बिलाल तळावर हल्ला केला. या तळावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं. तसंच इथे दारुगोळा व अन्य सामुग्री साठवल्या जातात.
भारत पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषेपासून (Line of control) पासून 30 किमी अंतरावर असलेल्या कोटली इथल्या लष्कर – ए – तोयबाच्या गुलपूर (Gulpur) कॅम्पवरही हल्ला केला. या अड्ड्यावर 20 एप्रिल 2023 रोजी पूंछ इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आणि 9 जून 2024 रोजी यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या हल्ल्यातील दहशतवादीही याच तळावर असायचे.
याच ठिकाणी लष्कर – ए – तोयबाच्या 15 दहशतवाद्यांचं वास्तव्य असलेला तळही नष्ट केला.
भिंमबर इथल्या बरनाला तळावर जिथे शस्त्रास्त्रे, एलईडी्स आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं तो ही अड्डा उद्धवस्त केला.