चार डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून आपण साजरा करतो. 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करत संपूर्ण बंदर उद्धवस्त केलं. या ऑपरेशनला ‘मिशन ट्रायडंट’ असं नाव देण्यात आलं. या विजयी घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 4 डिसेंबरला ‘नौदल दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.
भारताने हे युद्ध जिंकलं. या युद्धातल्या नौदलाच्या ‘मिशन ट्रायडंट’मुळे पाकिस्तानचे नौदल तळ पूर्ण उद्धवस्त झालं. एकूणच भारताच्या विजयामध्ये ऑपरेशन ट्रायडंटने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भारत – पाकिस्तान युद्ध
सन 1971 च्या अखेरीस भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण होऊ लागला. पाकिस्तान सरकारने 23 नोव्हेंबरला राष्ट्रीय आणिबाणी लादली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय नौदलाने लागलीच समुद्री सीमेच्या ओखा जवळ तीन विद्युत क्लास मिसाईल युद्धनौका तैनात केल्या. पाकिस्तान आणि आपली सागरी सीमा शेजारीच असल्याने या मार्गावरून हल्ला होऊ नये, याची काळची घेऊन ही पूर्वतयारी करुन ठेवली होती.
दिनांक 3 डिसेंबर 1975 साली पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला करून युद्धाला सुरूवात केली. त्यानंतर लागलीच भारताच्या नौदलाने ‘मिशन ट्रायडंट’ अंतर्गत 4 आणि 5 डिसेंबरच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला.
कराची बंदराची निवड का केली?
कराची हा पाकिस्तानी नौदलाचा प्रमुख तळ आहे. पाकिस्तान नौदलाच्या सर्व हालचाली या ह्याच तळावरुन व्हायच्या. संरक्षणाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या असलेल्या याच बंदरावरुन व्यापारही केला जायचा. त्यामुळे याठिकाणी पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्था खूप चोख होती. ही सुरक्षाव्यवस्था भेदून या बंदरावर हल्ला केल्यास पाकिस्तानचे ‘नौदल आणि समुद्री व्यापार’ असं दुहेरी नुकसान होईल. यामुळे पाकिस्तान कोलमडून पडेल याची जाण ठेवून या बंदरावर हल्ला करण्यात आला होता.
‘मिशन ट्रायडंट’ मधली युद्धसामुग्री
‘मिशन ट्रायडंट’ हे अँटी शिप मिसाईलचा वापर केलेलं पहिलं मिशन होतं. कमांडर बाब्रू भान यादव यांच्या नेतृत्वाखाली हे मिशन राबवलं गेलं. यासाठी नौदलाने वेस्टर्न नेव्हल कमांडर्सची स्ट्राईक टीम तयार केली. नोव्हेंबर महिन्यात गुजरात आणि कराची दरम्यानच्या ओखा इथल्या समुद्री तटाजवळ भारतीय नौदलाने आधीच विद्युत क्लास मिसाईल युद्धनौकेमार्फेत या तिन्ही टीम्सना तैनात केलं होतं. यासोबतच आवश्यकता पडली तर मोठ-मोठ्या मालवाहतूक जहाजांचीही व्यवस्था करुन ठेवली होती.
आयएनएस निपात, आयएनएस निर्घात आणि आयएनएस वीर अशा या तीन युद्धनौका होत्या. या तिन्ही युद्धनौकामध्ये प्रत्येकी 4 अशा 40 नॉटीकल माईल्सवर (समुद्री अंतर) हल्ला करण्याची क्षमता असलेल्या सोव्हिएत SS-N-2B Styx मिसाईल्स सज्ज करुन ठेवल्या होत्या.
यासोबतच आयएनएस किलटन आणि आयएनएस कटचल या दोन अर्नाळा क्लासमधल्या अँटी मिसाईल कार्वेट्स आणि आयएनएस पोशाक या जहांजासाठी, इंधन व अन्य वस्तूंचं दळणवळण करण्यासाठी विशेष जहाजांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
हल्ल्याची स्ट्रॅटेजी
भारतीय नौदल टीमने 4 डिसेंबरला पाकिस्तानच्या समुद्री तटापासून 250 नॉटीकल मैल अंतरावर आपल्या युद्धनौका स्थिर केल्या. पाकिस्तानी हवाई दलाकडे रात्रीच्या वेळी बॉम्ब हल्ले करण्याची सुविधा नसल्याची माहिती भारतीय नौदलाकडे होती. त्यामुळे रात्रीच्या सुमारास हल्ला करण्याचा निर्णय भारतीय नौदलाने घेतला होता. त्यानुसार रात्री 10.30च्या सुमारास भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या समुद्री हद्दीत प्रवेश करण्यास सुरूवात केली.
सुरूवातीला आयएनएस निर्घातने पाकिस्तानी युद्धनौका पीएनएस खैबरवर मिसाईल हल्ला करत ती पूर्ण उद्धवस्त केली. भारताने ‘हवाई हल्ला’ करत मिसाईल डागल्याचा पाकिस्तानी सैन्यांचा समज झाला. या पहिल्या मिसाईल हल्ल्यामुळे पीएनएस खैबरच्या पहिल्या बॉयलर रूमला आग लागली.
मात्र, हा ‘हवाई हल्ला’ नसून भारतीय नौदल आपल्या दारात येऊन पोहोचल्याची जाणीव पाकिस्तानला उशीराच झाली. या संदर्भातली माहिती पाकिस्तान हेड क्वार्टरला पोहोचेपर्यंत आयएनएस निर्घातवरुन या युद्धनौकेच्या दुसऱ्या बॉयलरवरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे पूर्ण युद्धनौका नामशेष झाली. एकूण 222 नौसेनिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
रात्री 11 वाजता ‘आयएनएस निपात’ने पाकिस्तानच्या ‘एमवी विनस चॅलेंजर’ या मालवाहतूक जहाजावर आणि पीएनएस शाह जहाज युद्धनौकेवर मिसाईल हल्ला केला. एमवी विनस चॅलेंजर या कार्गो शीपमधून पाकिस्तानी सैन्यांना दारूगोळा पोहोचविला जात होता. दारूगोळ्यांने भरलेल्या या जहाजावर हल्ला करताच पूर्ण जहाज क्षणभरात नाहीसे झाले.
त्यानंतर 11.20 ला आयएनएस वीरने पीएनएस मीहाफिजवर हल्ला केला. या जहाजावरून पाकिस्तानी हेड ऑफिसला सूचना पाठविण्याआधीच ती पाण्यात पूर्णत: बुडून गेली. यामध्ये 33 नौसैनिकांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आयएनएस निर्घातने कराची हार्बर पासून 14 नॉटिकल मैल अंतरावरून किमारी ऑइल साठ्यावर हल्ला केला. या साठ्यावर एकूण दोन मिसाईल्स डागल्या. त्यातील एक मिसाईल फेल गेली. पण दुसऱ्या मिसाईलने लक्ष्य गाठत सर्व इंधनाचे साठे नामशेष केले.
या संपूर्ण हल्ल्याची माहिती पाकिस्तान नेव्हल ऑफिसला मिळाल्यावर त्यांनी बचाव पथक पाठवले. पण तोपर्यंत पीएनएस मीहाफिज पूर्ण नामशेष झाली होती. खैबर युद्धनौकेवरुनच काही नौसैनिकांना वाचविण्यात त्यांना यश आलं.
पाकिस्तानचे प्रत्युत्तर
या हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या ओखा बंदरावरील दारूसाठ्यांवर, मिसाईल बोटीच्या जेट्टीवर आणि इंधन भरण्याच्या स्थळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याचा भारतीय नौदलाला अंदाज असल्यामुळे नौदलांने आधीच महत्त्वाच्या युद्धनौका, मिसाईल नौका या बंदरावरून स्थलांतर केले होते. मात्र, या बंदरावरील इंधनाच्या साठ्यावर हल्ला केल्यामुळे ऑपरेशन पायथन तीन दिवस पुढे ढकलावं लागलं होतं.
या मिशन ट्रायडंटमध्ये पाकिस्तानच्या नौदलाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. मात्र, या संपूर्ण हल्ल्यामध्ये भारतीय नौदलाचं काहीच नुकसान झालं नाही. नौदलाचं एक यशस्वी ऑपरेशन म्हणून ‘मिशन ट्रायडंट’ गणलं जातं. त्यामुळेच या यशाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर नौदल दिन साजरा केला जातो.