संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यांच्या जागांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत आसन क्रमांक 1 हे कायम ठेवण्यात आले आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांना आसन क्रमांक दोन आणि तीन देण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात, प्रियंका गांधींचं स्थान चौथ्या रांगेत निश्चित करण्यात आलं आहे. प्रियंका गांधी या 517 क्रमांकाच्या आसनावर बसतील. काँग्रेस नेते आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधीं हे 498 क्रमांकाच्या आसनावर बसतील. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या दोघांच्या जागांमध्ये 19 आसनांचं अंतर आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव 355 क्रमांकाच्या आसनावर आणि तृणमूल काँग्रेसचे नेता सुदीप बंदोपाध्याय 354 आसनक्रमांकावर बसतील. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल हे राहुल गांधींच्या शेजारी 497 क्रमांकाच्या आसनावर बसणार आहेत.
सुधारित यादीनुसार, समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांना दुसऱ्या रांगेतील 357 क्रमांकाचे आसन मिळाल्याने त्यांचे स्थान बदलले आहे. याच रांगेत डिंपल यादव या 358 क्रमांकाच्या आसनावर बसणार आहेत. सुरुवातीला रिकाम्या असलेले आसन क्रमांक 4 आणि 5 देखील नवीन यादीत भरलेले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आसनक्रमांक 58 बदलून त्यांना आता आसनक्रमांक 4 देण्यात आला आहे. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.