दिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणामुळे लहान मुलांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत. अनेक लहान मुलांना श्वास घेताना अडचणी येत आहेत. तर काही जणांना ब्राँकायटिसचा आजार होत आहे. यामुळे दिल्लीमध्ये लहान मुलांच्या नेब्युलायझर्स विक्रिमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या संदर्भात दिल्लीतल्या मॉम्स वॉरियर्स या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे.
श्वसनाचे विकार
दूषित हवेमुळे दिल्ली व आजुबाजूच्या राज्यामध्ये अनेक आजारांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच श्वास घेताना खूप त्रास होत आहे. यासोबतच लहान मुलांमध्ये अस्थमाचा त्रास वाढीला लागला आहे. अस्थमा म्हणजे फुफ्फुसांकडे जाणाऱ्या श्वासनलिकेला सूज येते. त्यामुळे जळजळ होऊन खोकला होतो. याबद्दल अनेक आरोग्य संस्थानी चिंता व्यक्त केली आहे.
लहान मुलांवर श्वसनासंबंधीत वाढत्या तक्रारींवर ‘वॉरियर्स मॉम्स’ या संस्थेने संशोधन केलं आहे. या संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार दिल्लीतल्या विविध मेडीकलमधून दररोज साधारण 20 नेब्युलायझर्स हे लहान मुलांसाठी विकत घेतले जात आहेत.
नेब्युलायझर्सच्या विक्रीत वाढ
जागतिक हवा प्रदूषणामध्ये दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण दिल्लीमधल्या मेडीकलमधून दिवसाला जवळपास 100 ग्राहक औषध खरेदीसाठी येतात. त्यापैकी 30 ग्राहक हे नेब्युलायझर्स खरेदी करतात. त्यातले 10 नेब्युलायझर्स हे लहान मुलांसाठी खरेदी केले जातात. पूर्व दिल्लीमध्येही दिवसाला 40 नेब्युलायझर्सची विक्री होते. त्यापैकी लहान मुलांकरता 13 नेब्युलायझर्सची विक्री होते. उत्तर दिल्लीमध्ये दिवसाला 50 पैकी 17 लहान मुलांच्या नेब्युलायझर्सची विक्री होते. तर मध्य दिल्लीमध्ये 27 पैकी 9 नेब्युलायझर्सची विक्री होते.
दिल्लीतल्या हवेतील गुणवत्ता खालावत असल्यामुळे, अनेक लहान मुलांना या संकटाला तोंड द्यावं लागत आहे. अनेक कुटुंबांना तर पैशांअभावी नेब्युलायझर्स, इनहेलर्स आणि श्वसनाच्या अन्य आजारांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी करता येत नाही.
मूलभूत हक्कांचं उल्लंघन
या वाढत्या प्रदूषणांमुळे नागरिकांना स्वच्छ हवा न मिळणं हे नागरिकांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन आहे असं मत ‘वॉरियर्स मॉम्स’ च्या सहसंस्थापक भावरीन कंधारी यांनी व्यक्त केलं आहे. यापेक्षाही दुर्दैवी आहे ते म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे अनेक लहान मुलं औषधांपासून वंचित राहत आहेत.
श्वसनासोबत अन्य आजारांचा सुळसुळाट
हवा प्रदूषणांमुळे केवळ श्वसनाचेच आजार होत नाहीत. तर अस्थमा, हार्ट अटॅक आणि नपुंसकत्व येण्याची शक्यता असते.
टोबॅको, सिगारेट, हुक्का यांच्या धुम्रपानांमुळे आपल्या फुफ्फुसाचं जितकं नुकसान होतं तितकचं नुकसान या प्रदुषित हवेमुळे होतं, असं मत कोकिळाबेन हॉस्पीटलचे डॉ. रवी दोसी यांनी मांडलं आहे.
या हवा प्रदूषणामुळे मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. मेंटल डिसऑर्डर नैराश्य येणं, एन्झायटी होते. मेंदूचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सेरोटीनची निर्मिती होत नाही. त्यामुळे वारंवार मूड स्वींग्ज होत राहतात, चिडचिड होते. या अशा दीर्घ काळ वातावरणामुळे अल्झायमर, विसराळूपणाचा (मेमरी लॉस) आजार होण्याचीही शक्यता आहे. तसेच डोळे आणि त्वचेवरही या प्रदूषणाचा खूप मोठा नकारात्मक परिणाम होतो.
या प्रदूषणात आपली काळजी कशी घ्याल?
सरकारी पातळीवर कितीही उपाययोजना केल्या तरी हवेची गुणवत्ता सुधारण्यास अपयश येत आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
हायड्रेशन : या प्रदूषित हवेपासून स्वत:च आरोग्य जपण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावशील मार्ग आहे तो म्हणजे शरीरात पाण्याची योग्य पातळी राखणं. अधिकाधिक पाणी पिणं. प्रदूषणामुळे अनेक दूषित वायू हवेद्वारे आपल्या शरीरात गेलेले असतात. अशावेळी जास्तीत जास्त पाणी प्यायल्याने हे दूषित घटक मूत्राद्वारे शरीराबाहेर पडतील.
नाकपुड्यांना तेल लावणे : हा ही अगदी सोपा उपाय आहे. घराबाहेर पडताना आपल्या नाकपुड्यांना स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं तेल लावून बाहेर पडावं. यामुळे हवेतील प्रदूषित घटक हे नाकपुड्यातच अडकून राहतील. ते नाकाद्वारे श्वसननलिकेतून शरीरात प्रवेश करु शकत नाहीत.
घरातील आद्रता वाढवणे : टेबलटॉप फाऊंटन्स आणि ह्युमीडीफायर्स उपकरणांच्या मदतीने आपण घरामध्ये आद्रतेचं प्रमाण वाढवू शकतो. याने धुळीतले प्रदूषित घटक आणि कोरडेपणा कमी होऊन आपल्याला श्वास घेण्यास स्वच्छ हवा मिळू शकते.
इनडोअर प्लांट्स : अलीकडे घरामध्ये ही वाढू शकतील अशी झाडं लावली जातात. या इनडोअर झाडांमुळे हवेचं शुद्धीकरण होण्यास मदत होते. स्पायडर प्लांट्स, स्नेक प्लाट्ंस आणि पीस लिलीज अशी इनडोर झाडं केवळ घराची शोभाच वाढवत नाहीत तर हवा सुद्धा शुद्ध करतात.
इनडोअर एअर प्युरीफायर्स : एअर प्युरीफायर्समध्ये असलेल्या हेपा (HEPA Filters) फिल्टर्समुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते. हवेतील धुलीकण, धुम्रपानाचं धूर, गाड्यांमधून निघणारा धूर, हवेतील अन्य दूषित घटकांपासून संरक्षण करण्यासाठी एअर प्यूरीफायर्सच्या माध्यमातून एक संरक्षक लेयर तयार केला जातो. दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये काही दिवसांपासून घरांमध्ये एअर प्यूरीफायर्स गरज भासत आहे.