भारताने चीनकडून 150,000 मेट्रिक टन सोया तेलाची खरेदी केली आहे. भारत प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेकडून सोया तेलाची खरेदी करतो. पण चीनकडून सवलतीच्या दरात हे तेल मिळत असल्यामुळे भारतातील अनेक डीलर्सनी मोठ्या प्रमाणावर हे तेल खरेदी केलं आहे. चीनने मात्र, भारताला सवलतीच्या दरात हे तेल का दिलं ते समजून घेऊया.
चीन सोयाबीनचा सर्वात मोठा आयातदार
खरंतर चीनमध्ये सोया तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. सोयाबीनचा जगातला सर्वात मोठा आयातदार देश म्हणून चीनची ओळख आहे. मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आयात केल्यानंतर त्यापासून खूप जास्त प्रमाणात खाद्यतेलनिर्मिती केली गेली. मागणीपेक्षा जास्त तेलनिर्मिती झाल्यामुळे परिणामी, चीनला या तेलाची निर्यात करणं भाग पडलं. त्यामुळे एवढ्या जास्त प्रमाणातला तेलसाठा वेळेत संपवण्यासाठी हे तेल भारतातील खरेदीदारांना सवलतीच्या दरात दिलं जात आहे.
भारतातील खरेदीदारांचा फायदा
सप्टेंबर ते डिसेंबर 2024 दरम्यान भारतातील विक्रेत्यांना प्रती टन 15 ते 20 अमेरिकन डॉलरची सवलत दिली. दक्षिण अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या तेलापेक्षा हे तेल भारताला कमी दरात मिळालं.
चीनमध्ये सोयामील आणि सोयातेलाचं मागणीपेक्षा जास्त प्रमाणात उत्पादन घेतलं. हा साठा संपवण्यासाठी चीन हे तेल सवलतीच्या दरात भारतीय विक्रेत्यांना देत असल्याची माहिती जागतिक व्यापारी संस्थेच्या नवी दिल्लीतील डीलरने दिली आहे.
भारत हा अर्जेंटिना आणि ब्राझिलमधून प्रामुख्यांने सोयातेल आयात करीत असे. पण या दोन्ही देशांच्या तुलनेत चीनकडून स्वस्त दरात तेल मिळत असल्यामुळे, भारत आता चीनकडून सोयातेल खरेदी करत आहे. यापूर्वी चीन हा सोयातेल आणि पाम तेलाचा आयातदार देश होता. आता मात्र, तेलाची निर्यात करत आहे.
हे ही वाचा : भारताने का सुरू केली स्थूलतेविरोधात जनजागृती मोहिम
तेलाचे दर
डिसेंबरच्या तिमाहीत चीनने प्रति टन 1,140 अमेरिकन डॉलर या दराने सोयातेलाची विक्री केली. यामध्ये सोया तेलाची किंमत, विमा आणि मालवाहतूक या दराचाही समावेश होता. तर दक्षिण अमेरिकेतून भारताला हे तेल प्रति टन 1,160 अमेरिकन डॉलरला मिळत होतं.
याशिवाय तेल वाहतूकीचा कालावधीही कमी झाला. दक्षिण अमेरिकेतून या तेलाची भारतात आयात करताना सहा आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागतो. तर चीनमधून येणारा माल दोन ते तीन आठवड्यांत पोहोचतो. त्यामुळे चीनकडून तेल घेणं भारताला सोईस्कर होतं.
भारताची मागणी
भारत आपल्या वनस्पती तेलाच्या मागणीपैकी जवळजवळ दोन तृतीयांश मागणी खाजगी कंपन्यांद्वारे आयात करून पूर्ण करतो. प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियामधून पाम तेल, तसेच अर्जेंटिना आणि ब्राझील व्यतिरिक्त रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफूल तेल आणि सोया तेलाची आयात करतो.
भारतात आणि इतरत्र सोया तेल हे पाम तेलापेक्षा जास्त किमतीत विकलं जातं. पण चीनमध्ये जास्त उत्पादन झाल्यामुळे ते सवलतीच्या दरात विकलं जात आहे. भारतात वार्षिक खाद्य तेलाची मागणी इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे भारताला जर हे खाद्यतेल असेच सवलतीच्या दरात मिळत राहिलं तर भारत चीनकडून आणखी जास्त तेल खरेदी करू शकतो अशी प्रतिक्रिया मुंबईतील सनविन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संदीप बाजोरिया यांनी दिली.