लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी रविवारी सांगितले की, त्यांचे प्रशासन जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेले सियाचीन आणि गलवान खोरे हे केंद्रशासित प्रदेशातील नवीन पर्यटन आकर्षण म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहेत.
गुप्ता यांनी सांगितलं की, लडाख “स्वित्झर्लंडपेक्षा खूपच सुंदर आहे” आणि जगातील सर्वाधिक मागणी असलेले पर्यटन स्थळ म्हणून उदयास येण्याची क्षमता त्यात आहे.
“सियाचीन आणि गलवान हे पर्यटनाला चालना देण्यासाठी विकसित केले जात आहेत, त्यामुळे पर्यटकांना लडाखच्या सीमावर्ती प्रदेशांमधील मनमोहक नैसर्गिक सौंदर्यासोबतच धैर्य आणि त्यागाची भावना पाहण्याची एक अनोखी संधी मिळेल,” असे गुप्ता यांनी भारत विकास परिषदेने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात सांगितलं.
उपराज्यपालांनी लडाखमध्ये साहसी, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे वचन दिले. हा भाग पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास केंद्रशासित प्रदेशाला रोमांच, शांतता आणि श्रद्धा यांचे मिश्रण असलेले संपूर्ण पर्यटन पॅकेज म्हणून स्थान मिळेल.
लडाखचा काही मोजकाच भाग पर्यटनासाठी खुला आहे. इथल्या निसर्गासोबतच इथली संस्कृती, समृद्ध वारसा आणि परंपरा देशी आणि परदेशी पर्यटकांना भुरळ घालतात.
“केंद्र सरकारच्या सक्रिय पाठिंब्याने प्रशासन पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, दळणवळण सुधारण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे जेणेकरून जगभरातील पर्यटकांना लडाखचे अतुलनीय आकर्षण अनुभवता येईल,” असंही उपराज्यपालांनी आपल्या भाषणात म्हटलं.
लडाखच्या सांस्कृतिक वारशाचे आणि संवेदनशील पर्यावरणाचे रक्षण करताना त्यांचे प्रशासन सर्वसमावेशक वाढ, सुधारित पायाभूत सुविधा आणि चांगल्या सेवांसाठी वचनबद्ध आहे, यावर उपराज्यपालांनी भर दिला.
“आमचे ध्येय एक शाश्वत आणि सक्षम लडाख निर्माण करणे आहे,” असा विश्वास उपराज्यपालांनी दिला.