डिसेंबर 2024, मणिपूर हिंसाचारादरम्यान इंफाल पूर्व, चुराचंदपूर, चंदेल आणि कांगपोकपी या भागात लष्कराने शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत लष्कराने 29 शस्त्रे जप्त केली होती. या शस्त्रांसोबत सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरविणारं डिव्हाईससुद्धा आढळलं होतं.
2024 च्या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला एका ड्रग्ज तस्करीच्या शोध मोहिमेमध्येही लष्करांना हे सॅटेलाईट डिव्हाईस सापडलं होतं. हे डिव्हाईस एलॉन मस्क यांच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरविणारं स्टारलिंक डिव्हाईस असल्याचं उघड झालं. पण भारतात स्टारलिकं डिव्हाईसला अधिकृत परवानगी दिली नव्हती, त्यामुळे हे भारतात आलं कसं यावरुन चर्चा झाल्या.
मात्र, आता याच स्टारलिंक डिव्हाईसला भारतात सेवा पुरविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीयांना अधिक सुलभरित्या जलद इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे.
इंडियन नॅशनल स्पेसची मान्यता
भारताचे अंतराळ नियामक, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) ने स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (SSCPL) ला देशात सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी मान्यता दिली आहे. एलोन मस्कच्या स्टारलिंकची उपकंपनी असलेली ही कंपनी हाय-स्पीड ब्रॉडबँडच्या मार्फत सेवा पुरविण्यासाठी Gen1 लो अर्थ ऑर्बिट (LEO) या सॅटेलाइटचा वापर करणार आहे.
ही परवानगी पाच वर्षांसाठी किंवा Gen1 च्या ऑपरेशनल मर्यादा जितकी असेल तोपर्यंत वैध असेल. जर Gen1 ची ऑपरेशनल मर्यादा पाच वर्षांच्या आधी संपली तर ही मान्यता स्थगित केली जाईल. तरिही, सेवा सुरू करण्यापूर्वी स्टारलिंकला इतर सरकारी विभागांकडून सर्व आवश्यक मान्यता, परवाने आणि मंजुरी मिळवणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : स्टारलिंक डिव्हाईस नेमकं काय असते?
काय आहे Gen1?
Gen1 नेटवर्कमध्ये 4,408 उपग्रहांचा समावेश आहे जे 540 ते 570 किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती फिरतात. भारतात सुमारे 600 Gbps ची एकत्रित डेटा क्षमता प्रदान करणे अपेक्षित आहे. जे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात जेथे पारंपारिक ब्रॉडबँड उपलब्ध नाही अशा ठिकाणी जलद आणि विश्वासार्ह इंटरनेट सेवा पुरवतील.
सहजगत्या इंटरनेटची उपलब्धता
भारताच्या अवकाश क्षेत्राला खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याच्या आणि देशभरात डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या प्रयत्नातला हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. शहरी आणि ग्रामीण भागांमधील डिजिटल दरी कमी करण्यासाठी सॅटेलाइट इंटरनेटची मदत होईल. तसेच भारताच्या डिजिटल इंडिया मिशनला आणखीन वेग येईल.
स्टारलिंकच्या प्रवेशामुळे लाखो भारतीयांसाठी इंटरनेट सहजगत्या उपलब्ध होईल. घरे, व्यवसाय, शाळा आणि आपत्कालीन सेवांमध्येही या इंटरनेटची सेवा पुरवून डिजिटलायझेनचा आणखीन स्तर उंचावता येईल.
IN-SPACE ने म्हटले आहे की, स्टारलिंकच्या कामकाजावर कडक नजर ठेवली जाईल. राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचणार नाही यावर लक्ष दिलं जाईल. आज अनेक देश हे डिजिटल क्रांतीमध्ये एक पाऊल पुढे राहण्यासाठी LEO सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. त्यामुळे देशाच्या संरक्षणाची पुर्ण खबरदारी बाळगत याचा वापर करता येईल. या निर्णयामुळे आता भारतही सॅटेलाइट इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशांच्या यादीत सहभागी झाला आहे.
1 Comment
l544cb