भारतात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन डिसेंबर 2024 मध्ये सुरू होणार आहे. ही ट्रेन डिझेल किंवा विजेवर चालणार नाही, तर हायड्रोजन ऊर्जेवर म्हणजेच पाण्यापासून वीज तयार केली जाईल आणि त्यावर ही ट्रेन चालणार आहे.
भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत स्वतःला “net zero carbon emitter” बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही ट्रेन कुठून कुठ पर्यंत धावेल, ट्रेनचा मार्ग, वेग आणि या ट्रेनमध्ये काय विशेष आहे, या सर्व गोष्टींबद्दल जाणुन घेऊया.
देशातील ही पहिली हायड्रोजनचलित ट्रेन असणार आहे. यात पाण्याचे वीजेत रुपांतर होईल. याकरता हायड्रोजन फ्युएल सेल ऑक्सिजनशी संयोग साधून वीज तयार करतात आणि या प्रक्रियेत फक्त पाण्याची वाफच बाहेर पडते यामुळे प्रदूषण अजिबात होत नाही. हा पर्यावरणपूरक वीज निर्मितीचा उपयोग भारतातील रेल्वेगाड्यांचे भविष्य बदलू शकेल.
हायड्रोजन का?
भारतीय रेल्वेने हवा प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने ही हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. हायड्रोजन फ्युएल सेल वापरल्यामुळे पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड चा धूर बाहेर टाकला जात नाही, तर पाण्याची वाफ बाहेर टाकली जाते आणि त्यामुळे हवेच प्रदूषण होतं नाही. म्हणूनच पर्यावरणपूरक ही ट्रेन आहे.
हायड्रोजन चलित ट्रेन पर्यावरणपूरक असण्याबरोबरच, डिझेल इंजिनपेक्षा 60% कमी आवाज करतात. तसचं देशभर 35 हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची योजना भारतीय रेल्वेची आहे.
या हायड्रोजन रेल्वेची चाचणी हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर होणार आहे आणि यामधील अंतर हे 90 किलोमीटर इतकं आहे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, नीलगिरी माउंटन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे आणि भारतातील इतर सुंदर आणि दूरदूरच्या प्रदेशांमधील हेरिटेज माउंटन या मार्गांवर सध्या ही ट्रेन चालवण्याचा विचार केला जात आहे.
हायड्रोजन ट्रेन तासाला 140 किमी अंतर साध्य करेल अशी अपेक्षा आहे. यामुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायक प्रवास करता येईल. प्रत्येक हायड्रोजन इंधन टाकीमुळे ट्रेन 1,000 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
हायड्रोजन फ्युएल सेल हे हायड्रोजन गॅसला ऑक्सिजनशी रासायनिक प्रतिक्रिया करून त्याचे विजेत रूपांतरित करतात. ही वीज ट्रेनच्या इंजिनला पॉवर देते या प्रक्रियेत फक्त पाणी आणि वाफ तयार होते म्हणजेच कोणतेही हानिकारक गॅस किंवा प्रदूषण होत नाही. या रासायनिक प्रक्रियेसाठी ट्रेनला दर तासाला सुमारे 40,000 लिटर पाणी लागणार आहे. त्यासाठी लागणारं पाणी साठवण्याकरता व्यवस्था केली जाणार आहेत.
एक हायड्रोजन ट्रेन तयार करण्यास अंदाजे खर्च हा 80 कोटी इतका आहे. ट्रेन चालवण्यासाठी हायड्रोजन साठवण सुविधा आणि विशेष इंधन भरण्याचे स्टेशन्स यांसारख्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणांचे काम सुरू आहे. हायड्रोजन फ्युएल सेल्स आणि प्लांट्सची यशस्वी चाचणी झाली असून, त्यांना मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे 2030 पर्यंत ‘net-zero target’ साध्य करण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. या हायड्रोजन ट्रेनमुळे इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल.
चाचणी पूर्ण झाल्यानंतर भारतीय रेल्वे देशभर हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखत आहे. 2025 पर्यंत 35 हायड्रोजन ट्रेन विविध मार्गांवर धावतील. या ट्रेनचा वेग आणि प्रवाशांची क्षमता ही इतर डिझेलवर चालणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत सारखीच असणार आहे.
शून्य प्रदूषण, कमी आवाज आणि अधिक वेग असणाऱ्या हायड्रोजन ट्रेन प्रकल्पामुळे भारतील रेल्वेने पर्यावरणपूरक रेल्वे वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.