जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळं जगच हादरुन गेलं होतं. ज्या खोऱ्यांतून पर्यटकांच्या हसण्या- खेळण्याचे, गप्पांचे आवाज यायचे, त्याच खोऱ्यातून 22 एप्रिलला बंदूकीच्या गोळ्यांचे आवाज आले आणि खोऱ्यात पूर्ण शांतता पसरली.
पर्यटकांवरील हा दहशतवादी हल्ला अतिशय भयानक होता. या हल्ल्यामुळे भारताच्या दहशतवाद विरोधातल्या लढाईच्या आक्रमकतेला आणखीन धार आली. यावेळी केवळ दहशतवादाविरोधातच नाही तर, या सीमापार दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधातही आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय या घेतला गेला. ‘पाकिस्तानला जशास तसं उत्तरं दिलं जाईल’ हे प्रत्यक्ष कृतीतून भारताने साऱ्या जगाला दाखवून दिलं. यातून भारताने पाकिस्तानविरोधात पुकारलेल्या आक्रमक धोरणाच्या निर्णयाचे पडसाद दिसून आले.
भारताने उचलेलं पहिलं आक्रमक पाऊल
गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातील दहशतवादी हे परदेशी होते. ते लष्कर-ए-तोय्यबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. संयुक्त राष्ट्रसंघाने या संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे. पाकिस्तानातील मुरीदके इथे या संघटनेचं मुख्यालय आहे.
या दहशतवादी हल्ल्याच्या तपासामध्ये या दहशतवाद्यांनी चिनी बनावटीची एके-47 आणि अमेरिकन बनावटीची एम4 कार्बाइन असॉल्ट रायफल्स वापरल्याचं समोर आलं.. त्यांना पाकिस्तानमध्येच प्रशिक्षण दिलेलं होतं. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून त्यांनी घुसखोरी केली होती. यासाठी त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने पाठिंबा दिला होता तर अधिकतर मदत ही पाकिस्तानच्याच गुप्तचर संस्था आयएसआयने त्यांना मदत केली होती. या दहशतवाद्यांची नावं सुलेमान, जिब्रान आणि हमजा अशी होती.
या दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा थेट संबंध असल्याचे ठोस पुरावे समोर आल्यावर भारताने तातडीने काही राजनैतिक आणि आर्थिक निर्णय घेतले. “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही” या उक्तीची पुन्हा आठवण करुन देत भारताने सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली. याशिवाय पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध पूर्णत: थांबवले. तसेच राजनैतिक पातळीवर पाकिस्तानी दुतावासातील राजदूतांना आणि अन्य महत्त्वपूर्ण पातळीवरील अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगितलं. तसेच इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील भारतीय राजदूतांना आणि अधिकाऱ्यांना भारतात परत बोलावून घेतलं.
एवढंच नाही तर भारतात जे – जे पाकिस्तानी नागरिक व्यवसाय वा उपचारासाठी आणि अन्य कारणांसाठी तात्पुरता व्हिसा घेऊन आले होते त्यांचेही व्हिसा रद्द केले. अशा सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याच्या सूचना दिल्या. अशापद्धतीने भारताने पाकिस्तान विरोधात कठोर धोरण अवलंबत सर्व संबंध तोडले.
हे ही वाचा : ‘टेरर आणि टॉक्स एकत्र चालणार नाहीत’ पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडक इशारा
‘ऑपरेशन सिंदूर’ मार्फत प्रत्युत्तर
भारताने गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानसोबत शांततेचं धोरण अवलंबिलेलं होतं. मात्र, जम्मू-काश्मीर सीमाभागातील पाकिस्तानच्या कुरापतींना आळा घालता येत नव्हता. शस्त्रसंधीचं उल्लंघन ही तर नित्याचीच बाब होती. निषेध व्यक्त करणं, शांतता राखणे आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवणं हाच फेरा वेळोवेळी फिरत असे.
मात्र, उरी हल्ल्याला प्रत्युतर देण्यासाठी 2016 सालचा सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 सालचा बालाकोट एअरस्ट्राईकवरुन भारताचं पाकिस्तान विरोधातलं बदलत असलेल्या आक्रमक धोरणाची प्रचिती येत आहे. पहलगाम इथला हल्ला हा संपुर्णत: पाकिस्तानपुरस्कृत होता हे स्पष्ट होतं. तरिही, भारताने केवळ दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीर आणि अन्य ठिकाणांवर अचूक हल्ले करत यशस्वीरित्या ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं.
‘ऑपरेशन सिंदूर’ पाकिस्तानच्या जिव्हारी लागलं
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील केवळ दहशतवादी स्थळांनाच लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. तर दहशतवाद्यांचे सुसज्ज स्थळ हे पूर्ण बेचिराख केले. हा हल्ला पाकिस्तानच्या खूप जिव्हारी लागला. त्यांनी हा हल्ला भारत – पाकिस्तान दरम्यानची लढाई आहे या भावनेने भारताली सीमाभागातील राज्यांवर हल्ला करण्यास सुरूवात केली. यामध्ये त्यांनी तुर्कस्तान, चीन आणि अमेरिका बनावटीची शस्त्रास्त्रे वापरली. पण भारतानेही तितक्याच आक्रमकपणे या हल्ल्यांना परतावून लावलं. भारताने केवळ बचावाची आणि स्व-संरक्षणाची भूमिका घेतली नाही तर पाकिस्तानातील हवाई क्षेत्र बेचिराख करुन पाकिस्तानी लष्करांच्या पायाभूत सुविधांची नासाडी केली.
भारताची माघार न घेण्याची भूमिका आणि वाढत असलेल्या आक्रमकतेपुढे शेवटी पाकिस्ताननेच नरमाईची भूमिका घेतली. पाकिस्तानकडूनच ही युद्धसदृष्य परिस्थिती थांबवण्याची विनंती केल्यावर भारतीय लष्कारांनी या कारवाया थांबवल्या. पण यापूर्वी जे राजनैतिक आणि आर्थिक निर्बंध लादलेले ते मात्र भारताने रद्द केले नाहीत.
यापुढे, भारतीय भूमीवर केला जाणारा कोणताही दहशतवादी हल्ला हा युद्धाचाच प्रकार मानला जाईल; आणि मग पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यातून भारताची आक्रमक भूमिका स्पष्ट झाली आहे.
हे ही वाचा : चिनी डिव्हाईसमुळे पहलगाम हल्ल्यातल्या मास्टरमाइंटला शोधण्यात यश
‘ऑपरेशन सिंदूर संपलं की सुरू आहे?’
भारताचं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अजून संपलेलं नाहीये. भारतीय लष्कराने हे त्याचवेळी स्पष्ट केलं होतं. जोपर्यंत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात नाही तोवर हे ऑपरेशन सिंदूर संपणार नाही. त्यामुळे या ऑपरेशन अंतर्गत आजही जम्मू-काश्मीर, देशांच्या सीमावर्ती भागात आणि अन्य ठिकाणीही सुरक्षा यंत्रणेकडून शोधमोहिम राबवली जात आहे. त्यानुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरमधील दाचिगाम जंगलांमध्ये तीन दहशतवाद्यांना मारण्यात आलं.
या सगळ्या घटनांवरुन भारताने आता पाकिस्तानसोबत ‘धोरणात्मक संयम’ ऐवजी ‘आक्रमक संरक्षणाची’ भूमिका वा धोरण राबवत असल्याची प्रचिती येत आहे.