कुंभमेळा हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पौराणिक परंपरा आहे. दर 12 वर्षांनी चार प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. यापैकी एक आहे प्रयागराज. 2025 मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन होणार आहे. 13 जानेवारी 2025 रोजी सुरू होणारा महाकुंभमेळा 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी संपेल.
कुंभमेळ्याचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व
कुंभमेळ्याचा इतिहास साधारणपणे 850 वर्षांचा आहे. कुंभमेळा “सागर मंथन” या पौराणिक घटनेशी जोडला जातो. पुराणांच्या कथेनुसार, जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले, तेव्हा अमृताने भरलेला कलश प्रकट झाला. या अमृत कलशावरून देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला. असे मानले जाते की या संघर्षादरम्यान समुद्र मंथनातून निघालेल्या कलशातील अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी पडले होते. त्यामुळे दर तीन वर्षांनी या चारपैकी एका ठिकाणी कुंभमेळा भरतो. दर 12 वर्षांनी हा मेळा पुन्हा पहिल्या ठिकाणी भरतो. यावेळी भक्त गंगा, यमुना, गोदावरी आणि क्षिप्रा या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आपल्या पापांपासून मुक्ती प्राप्त होते, असा समज हिंदू धर्मियांमध्ये आहे.
युनेस्कोकडून कुंभमेळ्याला महत्व
2017 मध्ये युनेस्कोने कुंभमेळ्याला ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा‘ म्हणून घोषित केले. यामुळे या जागतिक धार्मिक उत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे. कुंभमेळ्यात होणारे विविध कार्यक्रम, साधू-संतांची प्रवचने आणि पारंपरिक प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतात. म्हणूनच, कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून आपल्या देशाची ओळख दाखवणारा एक मोठा उत्सव आहे.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व
कुंभमेळ्यात सर्व वयोगटातील लोक, सर्व समाजातील आणि देशविदेशातील भक्त सहभागी होतात. यामध्ये साधू-संतांची प्रवचने, पारंपरिक प्रथा, आणि सांस्कृतिक कार्यक्रम भारतीय संस्कृतीच्या मुळांशी जोडलेले आहेत.
महाकुंभ 2025
प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ मेळ्याला प्रारंभ होईल आणि तो 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला समारोप होईल. 44 दिवस हा महा कुंभ मेळा चालणार आहे. यावेळी लाखो भक्त आणि साधू याठिकाणी येणार आहेत, नागा बाबा साधूंचे देखील या मेळाव्यात महत्त्वपूर्ण योगदान असते
हेही वाचा :प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्याच्या स्वच्छतेसाठी इस्त्रो आणि BARC संस्थाही सज्ज!