उत्तराखंडच्या वन विभागाने हल्द्वानी शहरात राज्यातील पहिली सायकॅड बाग उभारली असून, ही संपूर्ण उत्तर भारतातील दुसरी सायकॅड बाग आहे. यापूर्वी अशीच बाग लखनऊ मध्ये नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आली होती.
सायकॅड म्हणजे काय?
सायकॅड ही वनस्पती फार प्राचीन काळातील असून ती मेसोझोइक युगात म्हणजेच डायनासोरच्या काळात अस्तित्वात होती. यामुळेच सायकॅडला ‘जिवंत जीवाश्म’ (Living Fossil) म्हणतात. ही वनस्पती दिसायला ताडाच्या झाडासारखी असते, पण तिची वाढ खूप हळू होते. याच कारणामुळे तिच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते.
सायकॅडची पुनरुत्पादन क्षमता कमी असल्याने आणि हवामान बदलासारख्या घटकांचा जास्त परिणाम यांच्यावर होतो. त्यामुळे ही वनस्पती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण आता या बागेमुळे सायकॅडच्या दुर्मिळ झाडांना वाचवता येणार आहे. तसेच, या वनस्पतींविषयी लोकांना माहिती मिळेल आणि त्यांचे महत्त्वही कळेल.
हल्द्वानीत उभारलेली सायकॅड बाग
हल्द्वानीतील ही सायकॅड बाग दोन एकरांपेक्षा जास्त जागेत उभारण्यात आली आहे. आणि या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) या संस्थेने आर्थिक मदत केली आहे. या बागेत सायकॅडच्या एकूण 31 वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात. भारतात सायकॅडच्या फक्त 14 प्रजाती आढळतात. त्यामधील 9 प्रजाती फारच महत्त्वाच्या मानल्या जातात.
या बागेत तुम्हाला Cycas andamanica, Cycas beddomei Cycas zeylanica ,Cycas pectinata आणि Cycas circinalis या भारतीय जाती पाहायला मिळतील. याशिवाय केरळमधील Cycas annaikalensis, ओडिशामधील Cycas orixensis, आणि आणखी काही दुर्मिळ जातीही येथे आहेत.
सायकॅडची वैशिष्ट्यं
सायकॅड वनस्पतींच्या मुळांमध्ये सायनोबॅक्टेरिया नावाचे सूक्ष्मजंतू असतात, जे हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन मातीला सुपीक करतात. त्यामुळे सायकॅड वनस्पतींना पर्यावरणीयदृष्ट्या खूप महत्त्व आहे.
उत्तराखंड वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संजीव चतुर्वेदी यांनी सायकॅड वनस्पतींविषयी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “सायकॅड ही पृथ्वीवरील वनस्पतींच्या सर्वात धोक्यात असलेल्या गटांपैकी एक आहे. मात्र या वनस्पती आता नष्ट होत चालल्या आहेत. त्यामुळे या बागेच्या माध्यमातून या वनस्पतींचे संरक्षण, अभ्यास आणि हवामान बदलाचा परिणाम समजून घेण्यावर भर दिला जाईल.”
सायकॅडचा वनस्पतींचा उपयोग अन्न, औषधे आणि सांस्कृतिक कार्यातही केला जातो. पण या वनस्पतींच्या आकर्षक दिसण्यामुळे अनेक वेळा त्यांची तस्करी केली जाते त्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे.
हल्द्वानीतील ही बाग केवळ वनस्पतींचे संरक्षण करण्यापुरती मर्यादित नाही. लोकांमध्ये सायकॅड वनस्पतींबद्दल जागरूकता वाढवी ही या मागचे मुख्य उद्दिष्ट आहे.