एआय तंत्रज्ञानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. आता अनेक जण एआय वापराला सरावलेले आहेत. सुरुवातीला एआय तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचं वक्तव्य केलं जायचं. याला छेद देत एआय तंत्रज्ञानामुळे आपलं काम किती व्यवस्थितरीत्या, कमी वेळेत आणि उत्तम गुणवत्तेने करु शकतो हे सगळ्यांनी पटवून घेतलं. आणि कार्यालयातल्या नेहमीच्या कामामध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढू लागला.
तंत्रज्ञान, जाहिरात, माध्यम, कला ते आरोग्य, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा शिरकाव झालेला आहे. आणि आता खरंच एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येत आहे हे वास्तव दिसू लागलं आहे.
एआयच्या वाढत्या वापरापासून आपण आपलं करिअर आपलं क्षेत्र कसं सुरक्षित ठेवू शकतो या विषयावर ‘द हिंदू’ ने वेबिनार आयोजित केलं होतं. या वेबिनारच्या पॅनेलमध्ये सिद्धार्थ शिवशैलम, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस; अलोसिस जॉर्ज, वरिष्ठ अभियांत्रिकी व्यवस्थापक, TROOP; आणि कल्याण मंगलपल्ली, उदयोन्मुख तंत्रज्ञान सल्लागार यांचा समावेश होता.
विविध क्षेत्रामधील एआयचा वापर
आयटी सेवा, बीपीओ, डिजिटल उत्पादन, पुरवठा साखळी, तंत्रज्ञान आणि स्टार्ट-अप्स यासारख्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेत आणि रोजगार निर्मितीत मोठं योगदान दिलं आहे. डिजिटल क्रांतीमुळे कामगारांची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढली. हा बदल भारताच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा ठरला.
डिजिटल युगानंतर आज एआयचं युग आहे. या युगात जागतिक पातळीवर एआय वर आधारित अनेक नोकऱ्यांची निर्मिती होत आहे. पण या नोकऱ्या टिकवण्यासाठी एआयचा मर्यादित वापर करणे गरजेचं आहे.
2022 पासून काही विशिष्ट क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञानाने आपलं पक्कं स्थान निर्माण केलं आहे. एआयवर आधारित नवीन व्यावसाय मॉडेल्स आणि कामाच्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे नकळतच त्यांचा एआयवरच अवलंबित्व वाढत चाललं आहे. जसं की, भाषातरांच्या क्षेत्रामध्ये एआयचा वापर खूप होतो. काळाच्या ओघात हे भाषांतर केवळ तांत्रिक न होता त्यामध्ये त्या-त्या भाषेचं नैसर्गिक रुप प्राप्त होत आहे, असं मत ट्रूपचे वरिष्ठ अभियांत्रिकी व्यवस्थापक अलोसिस जॉर्ज, यांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा : एआय तंत्रज्ञानामध्ये बौद्धिक क्षमता नाही !
एआयचा काळजीपूर्वक वापर
एआय तंत्रज्ञान विकसित होताना याचा परिणाम केवळ कमी कौशल्य प्राप्त असलेल्या नोकरदारांवर होणार नाही. तर उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तिच्या नोकऱ्यांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र हा बदल हा परिणाम रातोरात किंवा झटक्यात होणार नाही. तर एआय तंत्रज्ञानाचा ज्या गतीने विकास केला जाईल त्यानुसार त्याचा योग्य प्रमाणे वापर करता यावा, त्यानुसार नवीन कौशल्यावर आधारित नव्या संधी, नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. अशा पद्धतीने बाजारातील नोकरी क्षेत्रात संक्रमण घडून येईल.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस शिवशैलम म्हणाले की, कोणतीही आयटी कंपनी ही कोड (कम्प्युटर भाषा) तयार करण्यासाठी पूर्णत: या एआय तंत्रज्ञानावर विसंबून नसते. या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. पण तो कोड विकसीत करण्यासाठी माणसाची आवश्यकता असतेच. कारण अजूनही पूर्णत: अशा एआय तंत्रज्ञानावर अवलंबून राहू असा या तंत्रज्ञानाचा विकास अजून झाला नाही.
आजच्या या टप्प्यावर, एआय हे आपल्या कामाच्या प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवते.. यामुळे आपल्या नोकऱ्या जरी पूर्णपणे सुरक्षित नसल्या तरी, एआयच्या वापरामुळे आपलं काम हे जलदगतीने पूर्ण होते. त्यामुळे कमी वेळेत अधिक जास्त काम, उत्पादन करता येते.
उदाहरणार्थ, एआयचे टूल्स हे सॉफ्टवेअर सिस्टमच्या कामाच्या विकासाला गती देतात. याचा अर्थ तुम्ही कमी वेळात जास्त संकेतस्थळांची वा पेजची निर्मिती करु शकता. त्यासंबंधित अन्य कामही वेगाने करु शकता. थोडक्यात, एआय सध्या नोकऱ्यांना धोका निर्माण करण्याऐवजी आपण करत असलेल्या कामाचा वेग वाढवत आहे.
उद्योगक्षेत्रही एआय तंत्रज्ञानावपर आधारित ऑटोमेशनचा वापर करीत आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांनी या ऑटोमेशन मशीनच्या वेगाशी स्पर्धा करण्याऐवजी या मशीन हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास करणं गरजेचं आहे. मानवी बुद्धी, मानवी भावनिक क्षमता, समस्या सोडवण्याच्या मानवी क्षमता याचा उपयोग प्रत्यक्ष कामामध्ये करता आला पाहिजे.
त्यामुळे एआय सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवत असलं तरिही रोजगारावर असलेल्या संभाव्य संकटाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. त्यामुळे रोजगार निर्मितीतील बदलांचा आढावा घेऊन त्यानुसार आपले कौशल्य विकसीत करणं अत्यावश्यक आहे.