तुम्ही जर रोज लोकलने प्रवास करत असाल आणि तिकीट काढण्यासाठी QR कोडचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता लवकरच मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी QR कोडचा वापर करता येणार नाही.
QR कोड सेवा बंद का होत आहे?
रेल्वेकडून 2016 मध्ये यूटीएस ॲप सुरू करण्यात आले. याचबरोबर, प्रवाशांची सोय व्हावी आणि तिकीट काढण्यासाठी होणारी गर्दी कमी व्हावी यासाठी QR कोडची सुविधा सुरू केली होती. हे QR कोड स्कॅन करून मोबाईलवर तिकीट काढता येत होतं. यामुळे तिकीट खिडकीवर रांगेत उभं राहण्याचीही गरज नव्हती. पण काही हुशार प्रवाशांनी याचा गैरवापर सुरू केला.
या लोकांनी स्टेशनवरील QR कोडचे फोटो त्यांच्या मोबाईल आणि स्मार्टवॉचमध्ये सेव्ह करून ठेवले. इतकंच नाही, तर काही बेकायदेशीर वेबसाइटवरही हे फोटो सहज उपलब्ध आहेत. जेव्हा तिकीट तपासनीस (TTE) तिकीट मागतो, तेव्हा हे विनातिकीट प्रवासी धावत्या ट्रेनमध्येच तो सेव्ह केलेला फोटो वापरून तिकीट काढतात. काही जण तर फक्त तो फोटो दाखवून तपासनीसांना फसवायचा प्रयत्न करतात. यामुळे रेल्वेला तिकीटातून मिळणारं उत्पन्न कमी होतं आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गात 30 स्टेशन असून तिथे 100 – 125 असे क्यूआर कोड आहेत.
मध्य रेल्वेही मागे नाही
पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाचा विचार मध्य रेल्वेनेही सुरू केला आहे. मध्य रेल्वेने तर ही सुविधा तात्काळ बंद करण्यासाठी रेल्वे बोर्डाला पत्रही पाठवले आहे. जर ही सेवा बंद झाली तर, याचा परिणाम म्हणजे, मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पुन्हा तिकीट खिडकीच्या रांगेत उभं राहावं लागेल.
यावर काही उपाय आहे का?
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि फसवणूकही थांबवण्यासाठी यावर एक चांगला उपाय आहे. रेल्वे स्टेशनवर फोटो काढता येणारे ‘स्टॅटिक’ QR कोड लावण्याऐवजी, डिजिटल स्क्रीनवर ‘डायनॅमिक QR कोड’ वापरता येतील.
हा डायनॅमिक QR कोड काही सेकंदांनी किंवा मिनिटांनी आपोआप बदलत राहील. त्यामुळे कोणीही त्याचा फोटो सेव्ह करून ठेवू शकणार नाही आणि धावत्या ट्रेनमध्ये तिकीट काढण्याची किंवा फसवणूक करण्याची शक्यता पूर्णपणे बंद होईल. या उपायामुळे प्रवाशांची गैरसोय देखील होणार नाही आणि रेल्वेचे नुकसानही होणार नाही.
सध्या तरी हा निर्णय विचाराधीन आहे. जर रेल्वेने ही सेवा पूर्णपणे बंद केली, तर प्रवाशांची अडचण वाढू शकते. पण जर त्यांनी ‘डायनॅमिक QR कोड’चा पर्याय स्वीकारला, तर ही समस्या कायमची सुटू शकेल.
यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही, पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी स्टॅटिक QR कोडची सेवा रद्द करण्यात आली आहे.