प्रत्येक धर्मामध्ये काही धार्मिक स्थळं खूप महत्त्वाची मानली जातात. आणि या स्थळांना आयुष्यात एकदा तरी भेट द्यायची इच्छा त्या धर्माचं पालन करणाऱ्यांची असते. अशा संधींची श्रद्धाळू वाट पाहत असतात. शीख धर्मियांकरता हेमकुंड साहिब, ख्रिस्ती आणि ज्युईश धर्मियांकरता जेरुसेलम आणि इस्लाम धर्मियांकरता मक्का या पवित्र जागा मानण्यात येतात. हिंदूमध्ये चार धाम, बारा ज्योतिर्लिंग, अमरनाथ, वैष्णोदेवी, जगन्नाथपुरी, शृंगेरी, कांची, मिनाक्षी मदुराई, शबरीमल्ला, तिरुपती बालाजी, द्वारका ही काही स्थानं अतिशय पवित्र मानली जातात. आयुष्यात एकदा तरी या धार्मिक स्थळांना भेट देण्याची हिंदू धर्मियांची इच्छा असते. यातल्या चार धाम आणि अमरनाथ यात्रेला अतिशय महत्व आहे. कारण काही मर्यादीत काळातच या ठिकाणी जाता येतं. बाकी स्थळांना वर्षभर भेट देता येते.
चार धाममध्ये कोणती तीर्थ क्षेत्रे येतात?
चार धाममध्ये यमुना नदीचे उगमस्थान यमुनोत्री, गंगा नदीचे उगमस्थान गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांचा समावेश होतो. उत्तराखंड राज्यातील गढवाल प्रांतात ही ‘चार धाम’ येतात. चारधाम यात्रेची सुरवात यमुनोत्रीच्या दर्शनाने होते. दुसऱ्या क्रमांकावर गंगोत्री येतं. त्यानंतर केदारनाथाचे दर्शन घेऊन बद्रीनाथाचे दर्शन घेतात. उत्तराखंड राज्यात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. गंगा आणि यमुना या नद्या हिंदू धर्मियांकरता पवित्र मानल्या जातात. भारतातील या सर्वात मोठ्या नद्यांनी लाखो हेक्टर प्रदेश सुपिक केला आहे. या नद्यांवर भारताच्या उत्तर प्रांतातील नागरिकांचे जीवनमान आणि अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळेच कदाचित या नद्यांना एवढे धार्मिक महत्व असावे. केदारनाथ इथं शिवलिंग आहे. हे मंदिर एक हजार वर्ष प्राचीन आहे. चार धाम सोबतच पंच केदार आणि बारा ज्योतिर्लिंगामध्येही केदारनाथचा समावेश होतो. महाभारतातील युद्धानंतर भावांची हत्या केल्याच्या पापमुक्तीसाठी पांडव शंकराच्या दर्शनाला निघाले. काशीलाही शंकराचे दर्शन न झाल्याने पांडव शिवाच्या शोधात हिमालयात गेले. तिथं भगवान शंकराने पांडवांची भेट टाळण्यासाठी बैलाचे रुप घेतलं आणि भूमीत अंतर्धान पावू लागले. त्यावेळी भीमानं बैलरुपी शिवाचे वशिंड (गायी-बैलाच्या पाठीवरील उंच भाग) हातात पकडले. आणि हेच ‘वशिंड’ केदारनाथमध्ये भगवान शंकर म्हणून पुजण्यात येते. बद्रीनाथ इथं विष्णूचे देवस्थान आहे आणि केदारनाथ इथल्या देवस्थानात शिवलिंग आहे. बद्रीनाथं इथली विष्णूची मूर्ती अलकनंदा नदीत मिळणाऱ्या शाळीग्राम दगडात घडवण्यात आल्याचं अभ्यासक सांगतात. शाळीग्राम या दगडात विष्णूचा अंश असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. पद्मासनात ध्यानस्थ बद्रीनाथाची मूर्ती ‘तप्त कुंड’ या गरम पाण्याच्या कुंडाजवळील गुहेत होती. सोळाव्या शतकात गढवालच्या राजानं मंदिर बांधून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आजही हे मंदिर आहे.
चार धाम यात्रा मर्यादीत वेळेतच का?
यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चारही स्थान बर्फाच्या उंच पर्वतांवर आहेत. समुद्रसपाटीपासून 2 हजार 700 मीटरहूनही जास्त उंचावर ही ठिकाणं आहेत. अती थंडी, कमी आर्द्रता, ओझोनचं प्रमाण कमी, सूर्याची अतीनील किरणं, हवेचा कमी दाब आणि ऑक्सिजन कमी पातळी इथं असते. उन्हाळ्यातही ही परिस्थिती असते. हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टी होते. बोचरं थंड वारं आणि बर्फाची वादळं येत असतात. उन्हाळ्यातील वाहनमार्गही खडतर आहे. देशाच्या इतर भागात उन्हाळा असतो, त्यावेळीही या भागात बर्फ असतोच. अशा परिस्थितीत हिवाळ्यात इथं येणं शक्यच नसतं. त्यामुळं उन्हाळ्याच्या काळात एप्रिल-मे महिन्यात ही देवस्थान जनतेला दर्शनाला खुली करण्यात येतात आणि हिवाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधी साधारण ऑक्टोबर महिन्यात ही देवस्थान दर्शनाकरता बंद करण्यात येतात. या देवस्थानांचे दरवाजे दर्शनाकरता उघडण्याच्या प्रथेला ‘कपाट खोलना’ म्हणतात.
कसे जायचं?
चार धामांकरता सर्वात जवळचं रेल्वे स्थानक ऋषीकेश आहे. तिथून रस्त्याने ही स्थानं जोडलेली आहेत. https://www.heliyatra.irctc.co.in/ आयआरसीटीसी हेलीयात्रावर बुकिंग करून हेलिकॉप्टरने या ठिकाणी जाता येतं.
यमुनोत्री – ऋषीकेशहून यमुनोत्री साधारण 216 किमी अंतरावर आहे. यमुनोत्रीपर्यंत वाहनाने जाता येते. समुद्रतळापासून 3,233 मीटर उंचीवर हे मंदिर आहे. तिथून 220 किमी अंतरावर गंगोत्री आहे.
गंगोत्री – ऋषीकेशहून गंगोत्री 260 किमी अंतरावर आहे. समुद्रतळापासून 3,415 मीटर उंचीवर गंगोत्री आहे. गंगोत्रीपर्यंत आपण वाहनाने जाऊ शकतो. तिथून साधारण 18 किमी अंतरावर गोमुख आहे. इथं ग्लेशियरमधून गंगेचा उगम होतो. तिथं जाण्याकरता अवघड ट्रेक असून विशेष परवानगी लागते.
केदारनाथ – समुद्रतळापासून 3,584 मीटर उंचीवर केदारनाथ आहे. ऋषीकेशपासून 227 किमीवर केदारनाथ आहे. शेवटचे साधारण 18 किमी अंतर पायी, पालखीत किंवा खेचरावर बसून जावं लागतं.
बद्रीनाथ – समुद्रतळापासून 3,100 मीटर उंचीवर बद्रीनाथ आहे. ऋषीकेशहून बद्रीनाथ 287 किमी अंतरावर आहे. जोशीमठपर्यंत वाहनाने जाता येतं. जोशीमठपासून 3 किमी अंतर पायी किंवा खेचरावर बसून बद्रीनाथला जावं लागतं.
यात्रेबाबतची माहिती आणि रजिस्ट्रेशन
उत्तराखंड पर्यटन विभागाच्या https://uttarakhandtourism.gov.in/ या वेबसाईटवर आपल्याला चार धाम यात्रेची सविस्तर माहिती मिळते. ही देवस्थाने कोणत्या दिवशी दर्शनाला खुली होणार आहेत, याच्या तारखा वेबसाईटवर दरवर्षी ‘चारधाम कपाट ओपनिंग डेटस्’ या टायटलवर स्क्रोल होताना दिसतात. हिंदूच्या यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ सोबतच शीख धर्मस्थळ हेमकुंड साहिबची दारं कधी उघडणार याचीही तारीख इथं दिलेली असते. हेमकुंड साहिबही हिवाळ्यात बंद असतं. तुम्ही जायचं ठरवलं आणि या ठिकाणी निघालात असं इतर स्थळांप्रमाणे इथं करता येत नाही. इथं जाण्यापूर्वी तुम्हांला वर दिलेल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं सक्तिचं आहे. वेबसाईटवर रजिस्ट्रेशनचं बटण दाबल्यावर तुम्हांला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल. यात तुम्हांला सर्वात आधी एकटे जात आहात, कुटुंब आहे की टूर ऑपरेटरसोबत जात आहात, भारतीय आहात की परदेशी नागरिक या गोष्टींची माहिती द्यावी लागते. आरोग्य तपासणी प्रमाणपत्र, यात्रेदरम्यान सोबत घ्यावयाच्या वस्तू, कागदपत्रे या सर्वाची माहिती सविस्तर माहिती सरकारकडून या वेबसाईटवर देण्यात येते. सरकारच्या या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन आणि परवानगीपत्र घेऊनच या ठिकाणांना भेटी देता येतात.