आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या कुटुंबियांना मित्र-परिवारांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात गुंतले असतील. पण वैयक्तिक पातळीवर आपण खरंच स्वातंत्र्य आहोत का? हा प्रश्न आपण स्वत:ला किंवा आपल्या आप्तजनांना विचारतो का? स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच काय खायचं काय नाही हेही सरकार ठरवतंय अशी भावना आपल्यापैकी अनेकांची आहे. त्यामुळे ब्रिटिशांकडून देशाला स्वातंत्र्य मिळालंय पण एक व्यक्ती म्हणून आपण स्वतंत्र आहोत का? राजरोसपणे आपण आपल्याला जे हवंय ते करू शकतो का? स्वातंत्र्य आहे म्हणून एखादा त्याला हवं तसं वागू शकतो पण त्याचं हवं तसं वागणं इतरांकरता अन्याय्यकारक असेल तर.. ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ने काही जणांशी संवाद साधून त्यांच्याकरता स्वातंत्र्य काय आहे? हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे शेतमालाला योग्य भाव मिळणं. दुसऱ्या कोणावरही अवलंबून न राहता, स्वतःच्या कष्टाला योग्य मोल मिळालं की, खरं स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतं.” – दिलीप घागरे (वय – 56), शेतकरी, वैभववाडी
काही पुरुष रिक्षाचालकांना वाटतं की, आम्ही महिला रिक्षा चालकांनी त्यांच्या व्यवसायात घुसखोरी केली आहे. त्यामुळं कधीकधी काही त्रासही दिला जातो. रस्त्यात प्रसाधनगृह नसतात. प्रत्येक व्यक्तीला तिच्या मनाप्रमाणं कोणच्याही भीतीशिवाय काम, व्यवसाय करता आला पाहिजे. – मनिषा (वय- 35), रिक्षा चालक, ठाणे
आज 2025 मध्ये माझ्या व्यक्तिगत पातळीवर स्वातंत्र्य म्हणजे सध्याच्या राजकीय वादळातही स्वतःचा आवाज हरवू न देणे. लोकशाही फक्त मतदानापुरती न राहता प्रश्न विचारण्याची हिंमत, असहमती व्यक्त करण्याची मोकळीक आणि समानतेने जगण्याची संधी जिथे आहे ते खरे स्वातंत्र्य. स्वातंत्र्यासाठीचा लढा आजही चालूच आहे. बदल आहे ते त्याचे फक्त स्वरुप. 1947 पूर्वी स्वातंत्र्याच्या लढ्यात दंगली, आंदोलन, मोर्चे व बंदुकीचे शस्त्र हातात होते. आज संविधानासारख्या शस्त्राचा वापर माणूस म्हणुन जगण्यासाठी आणि स्वातंत्र टिकून ठेवण्यासाठी करावा लागणार आहे. – मयुरी लाड (वय – 27), नोकरदार, नवी मुंबई
सोशल मिडियाने लोकांचा खाजगीपणाच ठेवला नाहीये. सोशल मिडियापासून मुक्ती मिळाली पाहिजे. आर्थिक लुबाडणूक, ट्रोलींग करणे, नातेसंबंध बिघडणे, रील्सच्या नादात जीव गमावणारा तरुणवर्ग हे सर्व सोशल मिडियाची भेट आहे. – संजय सावंत (वय- 55), धारगळ, गोवा
“स्वत:साठी जगण्याचं स्वातंत्र्य हवं आहे.” – लविना गडकर (वय – 36) नोकरदार, विरार
राजकारणी लोक सध्या पिळवणूक करतात. गरीबांसोबत नोकरदारांनाही दाबलं जातं. कायदा फक्त गरीबांना लागू पैसेवाल्यांना लागू नाही. पैसेवाल्यांनी नियम मोडले तरी शिक्षा फारशी नाही. भ्रष्टाचार वरपासून झिरपत खाली येतो. राजकारण्यांकडून, मोठे अधिकारी त्यांच्याकडून लहान अधिकारी असा भ्रष्टाचाराचा क्रम लागतो. राजकारण्यांना शिस्त लागली तर स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने उपभोगता येईल. – शरद कांबळे (वय – 45), व्यावसायिक, कोल्हापूर
“माझं कुटुंब हेच माझं स्वातंत्र्य आहे.” – शांता केरेकर (वय – 40) गृह मदतनीस, विरार
सोशल मिडियावर कोणत्याही व्यक्तीला टारगेट करुन त्याच्यावर चिखलफेक करु नये. प्रत्येकाला स्वतःची मते असतात.अर्थात हे लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणते. राजकारण्यांबाबत नाही. त्यांनी बोलताना नीट भान ठेऊनच बोलावं. – सुषमा देसाई (वय – 75) निवृत्त शिक्षिका, मुंबई
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे पाहिजे तितका वेळ झोपायला मिळणे.” – जिॲना लोपीस (वय – 13) विद्यार्थीनी, विरार
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे, माझ्या आयुष्यातील निर्णय घेण्याची क्षमता, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास माझ्यात असणं. भावनिक, आर्थिक किंवा व्यावहारिक गरजांसाठी नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता, स्वतःच्या पायावर उभं राहणं. मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो आणि त्यातून नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो.” – अभिषेक कुलकर्णी (वय – 28) खाजगी नोकरी, मुंबई
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे जगात कुठेही प्रवास करण्याचं स्वातंत्र्य. नवीन संस्कृती, नवीन लोक आणि नवीन ठिकाणं अनुभवता येणं. जगाला आपलं घर मानता येणं, हेच खरं स्वातंत्र्य आहे.” – अविनाश जाधव, (वय – 31) टुरिस्ट गाईड, मुंबई
“मला माझ्या पालकांशी हव्या त्या विषयावर काहिही न लपवता बोलता येणं हे माझ्यासाठी स्वातंत्र्य आहे. शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या बोर्डामध्ये जो फरक केला जातो तो करू नये. कोणत्याही अडथळ्याशिवाय समान शिक्षण घेता येण्याचं स्वातंत्र्य हवं आहे. मनासारखे कपडे घालून वावरण्याचे सुरक्षित वातावरण हवे, हे माझ्यासाठी स्वातंत्र्य आहे.” – लिओना रॉड्रिग्ज (वय -17), विद्यार्थिनी, विरार
“स्वातंत्र्य… हे खरं तर घरापासूनच सुरू होतं. आजही मी महिला म्हणून असलेली जबाबदारी झटकून घराबाहेर पडू शकत नाही. आज माझी तब्येत ठीक नाही. ऑफिसमध्ये काम महत्त्वाचं आहे स्वतःला प्रायोरीटी देऊन मी कुटुंबाची, ऑफिसची जबाबदारी झटकू शकत नाही. घरापासूनच स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते. स्वातंत्र्याचे धडे प्रत्येक आईने तिच्या मुलीवर लहानपासूनच बिंबवले पाहिजेत. प्रायोरीटी ओळखून वागणं हा स्वार्थ नाही, तर स्वातंत्र्य आहे.” – प्रज्ञा वाळुंज, (वय- 32) नोकरदार, ठाणे
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या संध्याकाळी सगळ्या जबाबदाऱ्यांपासून स्वत:साठी वेळ काढून घराबाहेर पडणं. कुठेतरी वडापावच्या गाडीवरून वडापाव खायला घेणं आणि मग मैत्रिणींसोबत गप्पा मारायला बसणं.” – शैला गोन्साल्विस (वय- 64), निवृत्त कर्मचारी, विरार
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या नोकरीच्या बंधनात अडकण्यापेक्षा मला हवं ते आवडीचं काम सुरू करता यावं आणि गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा कमवता येणं, हेच खरं स्वातंत्र्य आहे. यामुळे मला स्वतःसाठी आणि माझ्या आवडीनिवडींसाठी वेळ मिळेल.” – शुभम चव्हाण (वय 22), विद्यार्थी, बदलापूर
“नेहमी नवऱ्याचा, मुलांचा विचार न करता जे हवं ते करता यावं हेच माझ्यासाठी स्वातंत्र्य आहे. मनसोक्त फिरता येणं, फिरायला बाहेर गेल्यावर तिथे जे आवडतं ते तिथेच बसून खाण्याची मोकळीक हवी आहे. एक व्यक्ति म्हणून स्वच्छंदपणे, मोकळेपणाने घराबाहेर पडून फिरायचं आहे.” – डिलीमा लोपीस, (वय – 39) गृहिणी, विरार
आज 2025 मध्ये वैयक्तिक पातळीवर आपलं स्वातंत्र्य अनुभवतोय असं मला वाटतं. आजच्या सगळ्यात प्रभावी सोशल मीडिया वर आपण फार मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. विचार मांडू तर शकतोच पण मतांचे खंडण मंडण पण प्रभावी होते. पूर्वी मक्तेदारीची कवाडं मोडत प्रभावशाली पद्धतीने स्वतःला मांडणारे अनेक लोक या स्वातंत्र्यामुळेच नावारूपाला येत आहेत. ज्यांनी त्यात सातत्य टिकवलं त्यांना स्वतःला प्रभावी पणे सिद्ध करता येत आहे. माझ्या मते निडर होऊन व्यक्त होणे हेच स्वातंत्र्य आहे. – माधुरी निकुंभ (वय – 35), नोकरदार, उल्हासनगर
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या रूढी आणि परंपरेच्या बाहेर जाऊन विचार करता येणं. माझ्या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता यावं यासाठी त्यांना योग्य शिक्षण देता येणं.” – हर्षदा चव्हाण (वय – 48) गृहिणी, बदलापूर
“माझ्या मनाप्रमाणे जगायला मिळणं, स्वातंत्र्याच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. यातून एखादा व्यक्ती घडू शकतो किंवा बिघडूही शकतो. स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा लहानपण आठवतं. तरुण झाल्यावर अनेक गोष्टींवर बंधनं येतात. आज मी आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वातंत्र्य असून मला जिथे फिरायचं आहे जे करायचं आहे ते करु शकतो.” – अमेय भोसले (वय 33) नोकरी, मुंबई
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे रात्रीच्या वेळेस कधी emergency साठी बाहेर जावं लागलं किंवा एकटीने कधी प्रवास करावा लागला तर सुरक्षित वाटले पाहिजे. मनात कसली भीती न ठेवता जगता येणं.” – ऋतुजा जाधव (वय 25), नोकरी, मुंबई
“माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे घरातील किंवा समाजातील लोकांच्या दबावाखाली न येता स्वत:चे निर्णय घेता येणं. लग्न करायचं नसेल किंवा एकटं राहायचं असेल, नोकरी बदलण्याबद्दल इतरांचा दबाव सहन न करता स्वतःच्या मनाचं ऐकणं.” – रागिणी पाटील (वय 24), नोकरी, मुंबई
आम्हाला असाइनमेंटसाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर राहावं लागतं. कामाचं ठिकाण ते घर शहराची दोन टोकं असतात. सुरक्षेसाठी जवळ पेपर स्प्रे ठेवतो. अशा कोणत्याही हत्याराशिवाय कितीही वाजता मोकळेपणानं फिरता येणं हे आमच्याकरता स्वातंत्र्य असेल. – निधी (वय – 18), फॅशन डिझायनिंग विद्यार्थिनी, वाशी, नवी मुंबई
देश स्वतंत्र झाला पण प्रजा स्वतंत्र झाली नाही. प्रत्येकाला जे पटत नाही ते बोलण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. प्रत्येकाला जे आवडत ते कधीही खाण्याचा अधिकार असावा, कोणतीही बंदी नसावी. – सुनील परब (वय – 50), व्यावसायिक, ठाणे