शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी तमिलगा वेत्री कझगम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेता विजय यांच्या रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅली दरम्यान संध्याकाळी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये 39 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी झाले आहेत.
कोर्टाचा सतर्कतेचा इशारा दुर्लक्षित
सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यात टीव्हीके पक्षाकडून दाखल केलेल्या याचिकेवर मद्रास हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. राजकीय पक्षांच्या रॅली आणि सभांना परवानगी देताना त्यासाठी सर्व पक्षांना समान विशेष मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिले होते. या मार्गदर्शक तत्वांसह संबंधित पक्षाकडून सार्वजनिक मालमत्तेच्या संभाव्य नुकसानासाठी ठेवी घेण्या संदर्भातही तरतूद करावी असंही स्पष्ट केलं आहे. तसेच, अशा गर्दीच्या ठिकाणी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जबाबदारी म्हणून गर्भवती महिलांना आणि अपंग व्यक्तिंना न येण्याचं आवाहन करावं असं ही सुचवलं होतं.
तथापी, शनिवारच्या या रॅलीमध्ये अनेक महिला आपल्या लहान बालकांनाही सोबत घेऊन आल्या होत्या. अशाच एका बालकांचाही मृत्यू या चेंगराचेंगरीत झाल्याची घटना आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेला कोण जबाबदार आहे हा प्रश्न आता उपस्थित होतो. एवढी गर्दी अपेक्षित होती का?, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूरेशी प्रशासकीय यंत्रणा, पोलिस यंत्रणा सक्षम नव्हती का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
चेंगराचेंगरीला टीव्हीके नेता विजय जबाबदार पोलिसांचा आरोप
करुर इथल्या रॅलीला पक्षाचे संस्थापक, नेते विजय हे सात तास उशिरा आल्यामुळे गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली त्यामुळे घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली अशी माहिती तमिळनाडूचे पोलिस प्रमुख जी. वेंकटरमण यांनी दिली आहे.
करूर इथल्या रॅलीसाठी विजय चंद्रशेखर हे दुपारी 3 वाजता पोहोचणार होते. मात्र, प्रत्यक्षात ते संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचले. त्यामुळे रॅलीच्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली. घटनास्थळी प्रत्यक्षात 27 हजार लोकं उपस्थित होते. आयोजकांना फक्त 10 हजार लोकं अपेक्षित होते. या सर्व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ 500 पोलिस कर्मचारी तैनात केले होते.
“टीव्हीकेच्या आधीच्या रॅलींमध्ये गर्दी कमी होती, पण यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती,” अशी कबुली पोलिस अधिकारी वेंकटरमण यांनी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
वेंकटरामण यांनी या दुर्घटनेमागे लॉजिस्टिक बिघाड आणि सोशल मीडियावरील फार आधिची वेळ दिल्याचे कारण ही पुढे केलं आहे. त्यांनी सांगितलं की, टीव्हीकेच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत रॅलीला अधिकृत परवानगी असूनही, नेता विजय मात्र दुपारी 12 वाजता पोहोचेल असं जाहीर करून अनपेक्षित गर्दी झाली. त्यामुळे दुपारच्या उन्हात अनेक कार्यकर्ते लोकं, ताटकळत उभे होते. त्यांच्यासाठी पुरेशा अन्नाची आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली नव्हती. अशी सगळी परिस्थिती पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिली.
हे ही वाचा : राजकीय पक्षांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करा- मद्रास उच्च न्यायालय
पोलिसांच्या लाठीचार्जमुळे परिस्थिती चिघळली टीव्हीकेचा आरोप
टीव्हीके पक्षाने करूर इथल्या रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीला पोलिस यंत्रणाच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. याविरोधात टीव्हीके पक्षाने कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात असं म्हटलं आहे की, या संपूर्ण प्रकरणामागे कोणाचा तरी हात आहे. हे जाणूनबुजून घडवलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरिय समितीकडून चौकशी व्हावी आणि दोषीला समोर आमावं अशा मागणी केली आहे. दरम्यान, घटनास्थळी अचानक दगडफेक सुरू झाली आणि पोलिसांनी लाठीचारज करायला सुरूवात केली. त्यामुळे लोक घाबरले आणि पळू लागले त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली असं माहिती टीव्हीके पक्षाकडून दिली जाते.
विजय यांचं दु:खदायक ट्विट
या संपूर्ण घटनेमुळे माझं मन खूप दु:खी झालं आहे, मला असह्य वेदना होत आहेत. हा माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासातला काळा क्षण आहे, अशी पोस्ट अभिनेता, नेता विजय यांने त्याच्या सोशल मीडियावर केली आहे.
या चेंगराचेंगरीत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना टीव्हीके पक्षाकडून 20-20 लाख रुपयांची आणि जखमी झालेल्यांना 2 – 2 लाख रुपयाची मदत देऊ केली आहे.
तर तामिळनाडू सरकारकडून चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना 1 लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली आहे.
जमावाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस यंत्रणा आणि टीव्हिके पक्षावरही आहे
माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या घटनेसाठी पोलिस यंत्रणा आणि टीव्हीके पक्ष नेता अशा दोघांनाही जबाबदार धरलं आहे. ते म्हणाले की, करूर इथल्या सभेच्या स्थळावर चेंगराचेंगरी होणं ही सरकारचं आणि पोलिस यंत्रणेचं अपयश आहे. त्यांच्या दुर्लक्षपणामुळे हे घडलं आहे. घटनास्थळी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे लोकं भयभीत झाले. यंत्रणेने सुरळीत वीज पुरवठा केला जाईल याची दक्षता बाळगली पाहिजे होती. पोलिसांनी टीव्हीकेच्या मागच्या चार सभांच्या गर्दीचा आढावा घेऊन त्यानुसार पुरेशी तयारी करायला हवी होती. शिवाय टीव्हीके पक्षांनेही चार सभांच्या वेळी जो अनुभव आला त्यानुसार सभेचं नियोजन केलं पाहिजे होतं. शेवटी जमलेल्या जमावाची आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पक्षावर ही असते.