न्यूयॉर्क सिटीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाकडून जोहरान ममदानी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर ‘डेमोक्रेटिक पक्षाने आपली मर्यादा ओलांडली आहे’ अशा शब्दात ट्रम्प यांनी या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने न्यूयॉर्क सिटीच्या महापौर पदाच्या उमेदवार निवडीवर भाष्य करावं असं काय घडलं, कोण आहे हा उमेदवार की ज्याच्या उमेदवारीवरच ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली? जाणून घेऊयात न्यूयॉर्कची महापौर निवडणूक ट्रम्पसाठी का महत्त्वाची आहे.
ममदानी हे कम्युनिस्ट आहेत.
डेमोक्रेटिक पक्षाकडून ममदानी यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर ट्रम्प यांनी ट्रुथ प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीली. यामध्ये त्यांनी लिहीलं की, “ममदानी हे 100 टक्के कम्युनिस्ट आहेत. ते महापौर होणं हे हास्यस्पद आहे. ते पुढे म्हणतात की, “तो चांगला दिसत नाही, त्याचा आवाज कर्कश आहे. तो हुशार नाही. त्याच्याकडे एओसी + 3 ( आर्थिक पत) आहे आणि पॅलेस्टिनी गटाचे नेतृत्व करणारे चक शुमर सुद्धा त्याच्याविरोधात कुरघोडी करतात.” अशा शब्दात ट्रम्प यांनी ममदानीच्या उमेदवारीवर टीका केली आहे.
मुळात एका महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प का भाष्य करतात? हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, ममदानी यांचा इस्रायलच्या गाझा पट्टीतल्या कारवायांना असणारा विरोध.
इस्रायल विरोधात ठाम भूमिका
ममदानी यांनी इस्रायलच्या गाझा पट्टीवरील हल्ल्यांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. जर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी न्युयॉर्क शहराला भेट दिली तर त्यांना अटक करू, असं आश्वासन ममदानी यांनी मतदारांना दिलं आहे. या त्यांच्या वक्तव्यामुळेच ते बातम्यांमध्ये चर्चेत राहिले होते.
ममदानी हे जर निवडून आले तर ते न्युयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि युगांडा+भारतीय+अमेरिकन अशा तीन देशांशी संबंधित महापौर असतील. कॉलेजमध्ये असताना त्यांनी पहिल्या स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाईन चॅप्टर या संस्थेची स्थापना केली. ममदानी यांच्या या भूमिकेमुळे ट्रम्प हे त्यांच्यावर टीका करतात.
कोण आहेत जोहरान ममदानी?
जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क सिटीमध्ये होणाऱ्या महापौर निवडणुकीमध्ये डेमोक्रेटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. न्यूयॉर्क सिटीच्या महापौर निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाचे दोन उमेदवार इच्छुक होते. एक होते माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि दुसरे जोहरान ममदानी. त्यामुळे पक्षांतर्गतच प्राथमिक निवडणूक झाली. या निवडणुकीत अँड्र्यू कुओमो यांना 36.4 टक्के मतं मिळाली. तर, जोहरान ममदानीला 43.5 टक्के मतं मिळाली. त्यामुळे अर्थातच ममदानी हे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार असणार आहेत. ममदानी यांची लोकप्रियता, त्यांची मतं ही संपूर्ण अमेरिकेत चर्चेचा विषय झाली आहेत. तर जाणून घेऊयात जोहरान ममदानी नेमके कोण आहेत? त्यांचा भारताशी काय संबंध आहे.
जोहरान ममदानींचा भारताशी संबंध
जोहरान यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1991 साली युगांडातील कंपाला इथे झाला. त्यांची आई ही भारतीय असून वडील युगांडातले रहिवासी होते. जोहरान यांची आई मीरा नायर या अमेरिकन भारतीय सिनेमा दिग्दर्शिका आहेत. सलाम बॉम्बे, मान्सून वेडिंग आणि द नेमसेक या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.
जोहरान यांचे वडील महमूद ममदानी हे एक शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक आहेत. ते एक राजकीय विश्लेषक आणि मेकेरेर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्चचे संचालक आहेत. जोहरान सात वर्षांचे असताना हे कुटुंब न्यूयॉर्क सिटीमध्ये स्थायिक झाले.
मीरा नायर यांनी डेन्झेल वॉशिंग्टन आणि सरिता चौधरी यांच्या भूमिका असलेल्या ‘मिसिसिपी मसाला’ या क्रॉस-कल्चरल प्रेमकथेचंही दिग्दर्शन केलं आहे . या सिनेमामध्ये इदी अमीनच्या राजवटीत युगांडातून भारतीयांची कशाप्रकारे हकालपट्टी केली हे दाखवलं आहे.
याच सिनेमाच्या वेळी सिनेमाच्या शूटिंगसाठी जागा शोधत असताना नायर यांची भेट मेहम्मूद ममदानी यांच्याशी झाली. मेहम्मूद हे इदी अमीनच्या राजवटीत युगांडा सोडावा लागलेल्यांपैकी एक होते. या भेटीनंतर त्या दोघांनी लग्न केलं आणि नंतर न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले.
क्वीन ऑफ कॅटवे या मीरा नायर यांच्या सिनेमामध्ये जोहरान यांनी सिनेमाच्या कास्टिंग आणि दिग्दर्शनात मदत केली आहे.
जोहरान ममदानींचं शिक्षण
जोहरान यांनी बँक स्ट्रीट स्कूल आणि ब्रॉन्क्स हायस्कूल ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेतलं आहे. बोडॉइन महाविद्यालयामधून त्यांनी आफ्रिकन स्टडीजमध्ये पदवी मिळवली. 2021 मध्ये क्वीन्समधल्या काही भागाचं नेतृत्व करण्यासाठी ममदानी हे न्यूयॉर्कच्या विधानसभेत निवडून आले होते. आणि आता ते महापौर पदाची निवडणूक लढवत आहेत.
जोहरान ममदानीच्या न्यूयॉर्क शहरासाठी काय योजना आहेत?
ममदानी यांचं तळागळातील लोकांशी असलेलं नातं आणि प्रचारातली त्यांची साथ याने संपूर्ण न्यूयॉर्कचं लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय मोफत बालसंगोपन, घरभाड्यामध्ये वाढ न करणे , मोफत बससेवा, परवडणारी घरं आणि श्रीमंतांसाठी जास्त कर अशी आश्वासनं ममदानी यांनी मतदारांना दिली आहेत. या सगळ्या आश्वासनांचे छोटे छोटे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आपल्या भारतात ज्याप्रमाणे प्रचारयात्रा काढल्या जातात, तशाच प्रचारयात्रा न्यूयॉर्कच्या रस्त्यावर दिसत आहेत. तरुण कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह ममदानी हे संपूर्ण न्यूयॉर्कमध्ये फिरत आहेत. घराघरात आणि दुकानांमध्ये जाऊन पाठिंबा मागत आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे, प्रचाराचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत.
न्युयॉर्क सिटीमधल्या महापौर निवडणूक आणि जोहरान ममदानी डेमोक्रेटिक पक्षाअंतर्गत निवडणुकीच्या निकालानंतर जोहरान ममदानी हे आता डेमोक्रिटेक पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. या निकालाच्या वेळी ममदानी म्हणाले की, “मी प्रत्येक ‘न्यूयॉर्कर’चा महापौर असेन. मला कोणी मतदान केलं असलं-नसलं तरी मी न्युयॉर्कमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचा नेता असणार आहे. महापौर म्हणून मी माझी जबाबदारी चोख बजावीन ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल.”