घर घ्यायचं असेल तर किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला ठाऊक असेलच. बजेट, घर कुठे घ्यायचं तो भाग ठरवणं, मग ती जागा बघायला जा, ती इमारत अधिकृत आहे की अनधिकृत, तिथे सगळ्या सोई-सुविधा आहेत का, कागदपत्र नीट आहेत ना हे सगळं तपासावं लागतं. इतक्या सगळ्या खटाटोपानंतर मनाजोगं घर मिळेलच असं क्वचित होतं.
पण आता या सगळ्या अडचणी संपणार आहेत. आणि हो, यामध्ये तुम्हाला AI म्हणजे आर्टिफिशियल इंटिलीजन्सची मदत होणार आहे. आता सगळ्याच क्षेत्रात AIचा शिरकाव होत आहे तर रियल इस्टेट क्षेत्र तरी यापासून कसं दूर राहणार? या ॲपचं वैशिष्ट्य असं की, हे जगातलं पहिलं ॲप आहे, जिथे घर सुचवण्यापासून ते खरेदी करेपर्यंत सगळ्या प्रक्रिया या एकाच ॲपच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहेत.
चंदीगडला लॉन्च झालं AI प्रॉपर्टी ॲप
लोकांना राहायला घर घेणं सोपं व्हावं, ते शोधताना त्रास होऊ नये म्हणून चंदीगडच्या 23 वर्षाच्या आगमन भाटियाने हे AI वर आधारित प्रॉपर्टी ॲप तयार केलं आहे. ‘मि.प्रोपटेक’ असं या ॲपच नाव आहे.
आगमन भाटिया आणि त्याचे वडील केएस भाटिया यांनी मिळून हे ॲप विकसित केलं आहे. केएस भाटिया यांची पंपकार्ट ही ऑनलाईन मार्केटिंगची कंपनी आहे.
हे ही वाचा : एआयमुळे अनेक नोकऱ्यांवर गदा येणार हे वास्तव!
ॲपला सरकारचं प्रोत्साहन
या ॲपचं उद्धघाटन पंजाबचे राज्यपाल आणि चंदिगड केंद्रशासित प्रदेशाचे गव्हर्नर गुलाब चंद कटारिया यांनी केलं. ॲपच्या अनावरण सोहळ्यात गव्हर्नर गुलाब चंद कटारिया यांनी कौतुक करत या ॲपला प्रोत्साहन दिलं. हे अॅप भारताच्या डिजिटल भविष्याचे प्रतिबिंब असल्याचं वक्तव्य कटारिया यांनी केलं.
‘मिस्टरप्रोपटेक’ हे भारताच्या डिजिटल इंडिया, स्कील इंडिया, स्टार्ट अप इंडिया या सगळ्या योजनांचं द्योतक आहे.
मिस्टर प्रोपटेक कसं काम करते?
रियल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रोपटेक हे झोमॅटो आहे असं म्हणतात. या अॅपच्या माध्यमातून घर घेऊ इच्छिणाऱ्या किंवा संपत्ती खरेदी करु इच्छिणाऱ्यांना 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात निवासी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या मालमत्ता शोधण्याची, तुलना करण्याची आणि बुक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करुन देते.
यासाठी हे अॅप आर्टिफिशियल इंटेलिजेंस, 4K व्हर्च्युअल वॉकथ्रू आणि ओरा नावाच्या इन-अॅप एआय असिस्टंटचा वापर करते.
ओरा या AI असिस्टंट मध्ये रिअल-टाइम आणि स्थानिक माहिती गोळा केली जाते. तर 4K व्हर्च्युअल वॉकथ्रूच्या माध्यमातून घरबसल्या थेट तुम्हाला आवडलेल्या घरात तुम्ही फिरु शकता. याच्या माध्यमातून तुम्हाला त्या घराचे मोजमाप, घराचा व्ह्यू पाहता येऊ शकते. तुम्हाला जर हे घर खरेदी करायचं असेल किंवा किंमती संदर्भात चर्चा करायची असेल तर तुम्ही थेट बिल्डर्सशी गुगल मीट कॉल सुद्धा करु शकता. यावरुनच तुम्ही पेमेंट आणि कागदपत्रांचं सुरक्षित हस्तांतरण ही करु शकता.
हे ही वाचा : कीर्तिगा रेड्डी यांनी सुरू केलं ‘एआय किरण’ – भारतीय महिलांसाठी एक अनोखा प्लॅटफॉर्म
मुंबई, बँगलोर सारख्या शहरात होणार लॉन्च
हे अॅप 27 मे रोजी चंदीगडला लॉन्च झालं आहे. होमलँड, नोबल, द झिर्क यासारख्या कन्ट्रक्शन कंपन्या या अॅपशी जोडलेल्या आहेत. पुढच्या दोन महिन्यात हे अॅप मुंबई, बँगलोर, सूरत या शहरातही लॉन्च होणार आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत दुबई इथेही सुरू होणार आहे. तर 2028 पर्यंत आशिया आणि मध्य पूर्वेतल्या अनेक देशांमध्ये या अॅपची सुविधा सुरु करण्याचं आगमन भाटिया यानं योजलं आहे.
यामुळे एखादी वास्तू खरेदी करायला काही महिने लागायचे ते आता काही तासात खरेदी करु शकाल.
या AI अॅप कंपनीचे सह-संस्थापक के.एस.भाटिया यांनी सांगितलं की, या अॅपच्या माध्यमातून रियल इस्टेटमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेकदा घर खरेदी करताना ब्रोकरेज द्यावा लागतो, काही वेळेस घरांसंबंधित खरी माहिती उपलब्ध नसते, इमारत अधिकृत अनधिकृत आहे का, सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत का अशा महत्त्वपूर्ण माहिती खरेदीदाराला दिली जात नाही. ही सगळी माहिती मिळवून खातरजमा करुन घर घ्यायला कधी महिने तर कधी वर्ष लागतात. त्यामुळे या सगळ्या लोकांना मदत व्हावी म्हणून या अॅपची निर्मिती केली आहे.