महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीसाठी राज्यभरात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदा मतदान केंद्रात वाढ केली आहे. त्यासाठी 2 – 2 किलोमीटर अंतरावर मतदान केंद्र उभारले आहेत. शहरामध्ये अनेक गृहसंकुलामध्ये आणि क्लबहाऊस मध्ये मतदान केंद्र सुरू केले आहेत.
राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीत 96 हजार 653 मतदान केंद्र होती. यामध्ये 3 हजार 533 मतदान केंद्राची वाढ करुन यावर्षी राज्यात 1 लाख 186 एकुण मतदान केंद्र सुरु आहेत.
ठाण्यात एकुण 639 मतदान केंद्र आहेत. यापैकी 36 मतदान केंद्र हे ठाण्यातील मोठ-मोठ्या सोसायट्यामध्ये उभे केले आहेत.
मतदान केंद्र कमी असल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे रांगेत उभं राहून खूप वेळ वाट पाहावी लागते. मतदान केंद्र घरापासून दूर अंतरावर असेल तर मतदार त्याठिकाणी जायला कंटाळा करतात. यासगळ्यावर विचार केल्यावर अनेकानेक लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावं आणि मतदान केंद्र हे त्यांच्या सोईनुसार असावं, यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी लोकसभा निवडणुकीपासून अधिकाधिक मतदान केंद्र उभं करण्याचं योजिलं. त्यानुसार ठिकठिकाणी मतदान केंद्रांची व्यवस्था करून जनतेला मतदानाचं आव्हान केलं आहे, अशी माहिती ठाणे उपजिल्हाधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.
मतदान केंद्रावर वीज, पाणी, स्वच्छतागृह अशी सगळी व्यवस्था असणं आवश्यक आहे. अनेक सोसायट्यांच्या पार्किंग एरियामध्ये ही व्यवस्था असते त्यामुळे त्या ठिकाणी केंद्र निर्माण करणं ही सोयीचं झालं आहे.
अगदी सोसायटीच्याच आवारात मतदान केंद्र असल्यामुळे अनेक रहिवासी आनंदी झाले आहेत. सोसायटीमध्ये मतदान केंद्र सुरू करुन देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य सुद्धा सोसायटीमधल्या नागरिकांनी केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे जास्तीत जास्त लोक मतदान करतील असा विश्वास ही नागरिकांनी व्यक्त केला आहे.