जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगावमध्ये बंजारा समाजाचं प्राबल्य आहे. आपल्या गावातून शंभर टक्के मतदान होण्यासाठी बंजारा समाजातील काही महिलांनी कंबर कसली आहे. गावात या महिला त्यांच्या बोलीभाषेत गाण्याच्या माध्यमातून मतदारांना साकडं घालत आहेत.
नायगावची मुख्य भाषा बंजारा
साधारण अडिच हजाराच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या नायगावमध्ये गावकऱ्यांचा बंजारा बोलीभाषेतच आपापसांत संवाद असतो. बहुतांश लोकांना मराठी भाषा येत नाही. त्यामुळं मराठी भाषेतलं मतदान जागृती अभियान त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही. भाषेच्या अडचणीमुळं त्यांना मतदानाचं महत्व, त्यांचे राजकीय अधिकार याबद्दलही फारशी माहिती नाही. आपल्या गावातील लोकांनी शंभर टक्के मतदान करायला हवं असं इथल्या काही लोकांची तीव्र इच्छा आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशाचं पालन नाही
नायगाव आणि आजूबाजूच्या गावातील लोक ऊसतोडणी कामगार म्हणून पंढरपूर, सोलापूर आणि कर्नाटकात जातात. एकदा गेले की मग तीन महिन्यांनी ते परत गावाकडं येतात. निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचा आदेश दिला आहे. मात्र कंत्राटदारांनी या कामगारांसोबत आधीच कंत्राट केलं आहे. रोजंदारीवर हे लोक काम करतात. सुट्टी दिली नाही आणि मतदानाला यायचं असेल तर 2-3 दिवस खाडे होणार. हातावर पोट असलेल्या या लोकांना हे नुकसान परवडणारं नाही.
ऊसतोड कामगार मतदानापासून दूर नको राहा
“ऊसतोड कामगार घरात काही इमरजन्सी असेल तरच गावी येतात. 20 नोव्हेंबरला विधानसभा मतदानाच्या दिवशी जर ऊसतोडीचं काम करणारे लोक गावात नसतील तर याचा फटका मतदानाला बसणार. मतदानाचं महत्त्व लोकांना पटावं म्हणून आम्ही काही महिलांनी गावातील लोकांशी बोलायचं ठरवलं” असं या महिला गटातील माधुरी चौहान यांनी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’शी बोलताना सांगितलं.
आपल्या संस्कृतीचा लोकशाहीसाठी वापर
पण नुसतं घरोघरी जाऊन मतदान करा असं बोलण्यापेक्षा, आपल्या बंजारा संस्कृतीच्या माध्यमातून संवाद साधला तर लोकांना गोष्टी पटतील हे माधुरी आणि त्यांच्या सोबतच्या महिलांना जाणवलं. बंजारा समाजाला त्यांची पारंपरीक गाणी आणि नृत्य याबद्दल अभिमान आहे. मग त्यांनी लगेचच आपल्या बंजारा बोलीभाषेत मतदान जागृतीचं गाणं लिहून काढलं. हे गाणं चालीत बसवून पारंपरीक बंजारा पोषाख परिधान करून घरोघरी जायला सुरूवात केली. गावातील गल्ल्यांमधून जाताना, गावकऱ्यांच्या दारात या महिला ही गाणी सादर करतात.
एवढंच नाही तर या महिलांनी पारंपरीक पोषाखात गाणी म्हणतानाचे व्हिडियो रेकॉर्ड करून ऊसतोड कामगारांना मोबाईलवर पाठवलेत. रोज नवनवीन प्रकारे या महिला प्रयत्न करत आहेत.
गावातून शंभर टक्के मतदानाचं ध्येय
मतदान हा आपला हक्क आहे. लोकशाही बळकटीकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद देत असल्याचं, गावातील एक नागरीक अविनाथ राठोड यांनी सांगितलं. आमच्या गावातून शंभर टक्के मतदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दूरदर्शनचे काही व्हिडियो आम्ही पाहिले. त्यातून आम्हांला गाण्यांच्या माध्यमातून जनजागृतीची कल्पना सुचल्याची माहिती राठोड यांनी दिली.
मुलांचाही सहभाग
गावातील महिलाच नाहीतर मुलांनीही शाळेच्या शिक्षकांसोबत मतदार जागृती अभियानात सहभाग घेतला आहे. बंजारा भाषेसोबतच मराठीतही गाणी म्हणत गावात मतदार जनजागृती अभियान सुरू आहे.
कोरोना काळातील अभियान
या गावात बंजारा भाषेत जनजागृती करणाऱ्या महिलांचे दोन गट आहेत. सध्या एक गट ऊसतोडणीच्या कामावर गेला आहे. या दोन्ही गटांनी कोरोना काळात गावकऱ्यांना लसीकरणाचे महत्त्वही बंजारा भाषेतील गाण्यांद्वारे पटवले होते. त्याचा खूप चांगला फायदा झाला.